माझा आवडता छंद – चित्रकला मराठी निबंध । Drawing Essay In Marathi |

काही विद्यार्थ्यांना चित्रकलेत छंद असतो. शाळेत असताना चित्रकलेच्या स्पर्धेत ते सहभागी देखील होतात. त्यापैकी काही विद्यार्थी चित्रकलेत कारकीर्द करण्याचे ठरवतात. चित्रकलेची संपूर्ण माहिती होण्यासाठी त्यांना चित्रकला विषयावर माझा आवडता छंद चित्रकला (My Hobby Drawing Essay In Marathi) हा निबंध लिहायला लावतात.

चित्रकला मराठी निबंध | Chitrakala Marathi Nibandh

लहानपणी आमच्या शाळेशेजारी एक चित्रकार राहत असे. त्याची चित्रे पाहून मलाही चित्रकलेचा छंद जडला. त्याला मी चित्रकलेबद्दल खूप काही विचारत असे. तो जी चित्रे काढत असे तशीच चित्रे काढण्याचा मी प्रयत्न करत असे.

चित्र काढताना मी अत्यंत सुखदायी अनुभव करतो. त्यावेळी अत्यंत मग्न अवस्थेत असल्यामुळे मला संपूर्ण जगाचा विसर पडतो. त्यामुळे चित्रकला हाच माझा आवडता छंद आहे. चित्रकलेचा सराव करत राहणे हेच चांगला चित्रकार बनण्याचे तंत्र आहे, हे आता मला समजले आहे.

शाळेत जेव्हा चित्रकलेच्या स्पर्धा असतात तेव्हा मी सहभाग घेतोच. सुरुवातीला माझा प्रथम क्रमांक येत नसे पण आता प्रथम तीनमध्ये तरी मी असतोच! हे सर्व वारंवार करत असलेल्या सरावामुळे शक्य झाले आहे. शाळेतील चित्रकलेचा तास म्हणजे माझा आवडता तास असतो.

मागच्या वर्षी मी जिल्हास्तरीय स्पर्धेत सहभागी झालो होतो. तेव्हापासून तर माझा आत्मविश्वास आणखीनच दुणावला आहे. मला तेथे पारितोषिक मिळाले नाही परंतु परीक्षक म्हणून आलेल्या राज्यातील प्रसिध्द चित्रकाराने माझी प्रशंसा केली आणि माझ्या चित्रातील उणीवा सांगितल्या.

आमच्या शाळेतील कला शिक्षक पाटील सर हे देखील खूप छान शिकवतात. त्यांनी माझ्या रंगकलेवर खूप मेहनत घेतली आहे. आम्हाला प्रत्येक आठवड्याला एक चित्र काढायचे असते. त्यामध्ये आम्हाला श्रेणी मिळते. मी नेहमीच उत्तम चित्र काढण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मला बहुतेक वेळा अ श्रेणी मिळते.

आमच्या घरी बाबा आणि चुलते मला खूप मदत करतात. त्यांची सहाय्यता मला नेहमीच उपयोगी ठरते. दोन वर्षांपूर्वी माझे बाबा मला मुंबईला चित्रप्रदर्शनी बघायला घेऊन गेले होते. तो अनुभव अगदी अविस्मरणीय होता. माझे पण चित्र एके दिवशी तशा प्रदर्शनीत असावे असे मला तेव्हापासून वाटत आहे.

चित्रकलेत दोन प्रकार पडतात, रेखाटन आणि रंगकला! दोन्हींपैकी कोणत्याही एका क्षेत्रात पारंगत होऊन एखादा व्यक्ती महान चित्रकार बनू शकतो. चित्रकला शिकण्यासाठी खूप खोल निरीक्षण आणि सरावाची गरज असते. निरीक्षण वाढल्याने जीवन जगण्याची आणि त्याबरोबर चित्रकलेची देखील समज वाढते.

चित्रकला म्हणजे समोरील नजारा बघून रेखाटन काढणे नसते. सुरुवातीला सराव म्हणून आपण ते करू शकतो परंतु खूप खोल अर्थाने ती स्वतःची अभिव्यक्ती असते. आपले मन आणि अस्तित्व जसे आहे तेच आपण चित्रात उतरवतो. आत्तापर्यंत सात वर्ष झाली मला चित्रकलेचा छंद आहे आणि भविष्यात तेच माझे जीवन असणार आहे.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला माझा आवडता छंद – चित्रकला हा निबंध (My Hobby Drawing Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा.

Leave a Comment