माझा वाढदिवस – मराठी निबंध | My Birthday Essay In Marathi |

प्रत्येक व्यक्तीचा वाढदिवस हा त्याच्यासाठी अविस्मरणीय प्रसंग असतो. विद्यार्थ्यांना अशाच एका न विसरणाऱ्या वाढदिवसाच्या संपूर्ण घटनेचे वर्णन माझा वाढदिवस या निबंधात (My Birthday Essay In Marathi) करायचे असते.

वाढदिवस हा एक प्रसंग असल्याने प्रत्येकाच्या आयुष्यात तो वेगवेगळ्या प्रकारे घडत असतो. त्यासाठी पुढील मुद्द्यांच्या आधारे तुम्ही निबंध लिहू शकता…

• वाढदिवसाची तारीख
• दिवसभरातील उपक्रम
• एखादा अविस्मरणीय क्षण/प्रसंग
• वाढदिवस कसा साजरा केला
• इतर (भेटवस्तू, शुभेच्छा, केक)
• वाढदिवशी जीवनात केलेला एखादा बदल

माझा वाढदिवस मराठी निबंध | Maza Vadhdivas Marathi Nibandh |

माझे नाव रोहन. प्रत्येक वर्षी 10 डिसेंबर या दिवशी माझा वाढदिवस असतो. डिसेंबर महिना सुरू झाल्यापासूनच वाढदिवसाची चाहूल मला लागलेली असते. मी माझ्या मित्रांना आणि नातेवाईकांना बळजबरीने 10 तारखेची आठवण करून देत असतो.

माझे वडील वाढदिवस साजरा करण्यासाठी खूप आग्रही असतात. वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक वर्षी वाढदिवस साजरा करायचा असे जणू ठरलेलेच असते. या वर्षी अनाथालयात जाऊन तेथील मुलांना वह्या वाटप करण्याचा कार्यक्रम वडिलांनी आयोजित केला होता.

सकाळी मी लवकर उठलो. सर्व आप्तेष्ट आणि मित्र मंडळींनी माझ्या वाढदिवसाचे शुभेच्छा संदेश मला मोबाईलवर पाठवले होते. काहींनी मला कॉल करून शुभेच्छा दिल्या. माझी अंघोळ आणि इतर कामे आवरल्यानंतर आईने मला ओवाळले आणि मी शाळेत गेलो.

मी वाढदिनी नवीन कपडे घातलेली असल्याने शाळेत लगेच सर्वांना कळाले की माझा वाढदिवस आहे. शाळेत गेल्यावर माझ्या सर्व वर्गमित्रांनी आणि वर्गशिक्षकांनी मला शुभेच्छा दिल्या. मीही शाळेत चॉकलेटचा पुडा घेऊन गेलो होतो. सर्व शिक्षकांना आणि वर्गमित्रांना मी चॉकलेट वाटप केले.

आमची शाळा सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत असते. दोन वाजेपर्यंत मी घरी आलो. त्यानंतर माझे वडीलसुद्धा घरी लवकर आले. आमच्या शहरातच एक लहान मुलांचे “आश्रय अनाथालय” आहे. तेथे मी आणि माझे बाबा गेलो. तेथे सर्व मुलांना वह्या आणि पेन वाटप केले. प्रत्येक वर्षी माझ्या वाढदिनी कोणतातरी एक सामाजिक उपक्रम माझे बाबा आयोजित करतात.

तेथील मुलांना स्वतःचे कोणी नातेवाईक नसल्याने त्यांचे जीवन पाहून मला त्यांच्याप्रती करुणा जाणवली. माझ्या थोड्याशा मदतीतून त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमलले होते. तोच क्षण माझ्या वाढदिवशी अविस्मरणीय क्षण होता. त्यानंतर आम्ही सर्व नातेवाईकांना वाढदिवसाचे निमंत्रण देऊन घरी आलो.

सायंकाळी सर्व नातेवाईक जमा झाले. सर्वजण चांगल्या थाटामाटात आले होते. काहींनी मला भेटवस्तू आणल्या होत्या. माझ्या भावंडांनी वाढदिवसाची सर्व सजावट केली. ठिक आठ वाजता माझ्यासमोर केक ठेवण्यात आला. सर्व स्त्रियांनी मला ओवाळले आणि त्यानंतर केक कापण्यात आला.

वाढदिवस झाल्यानंतर सहभोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. सहभोजन झाल्यानंतर सर्वजण आपापल्या घरी निघून गेले. प्रत्येक वर्षी जो सामाजिक उपक्रम किंवा मदत माझ्यातर्फे केली जाते, त्यामुळेच खऱ्या अर्थाने माझा वाढदिवस महत्त्वपूर्ण आणि अविस्मरणीय बनत जातो. आता प्रतिक्षा पुढच्या वाढदिवसाची!

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला माझा वाढदिवस हा निबंध (My Birthday Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment