मदर टेरेसा – मराठी निबंध! Mother Teresa Essay In Marathi |

मदर टेरेसा या थोर समाजसेविका होत्या. त्यांना शांततेचे नोबेल पारितोषिक मिळालेले आहे तसेच त्यांचा भारतरत्न आणि पद्मश्री देऊन देखील सन्मान करण्यात आला आहे. अशा या थोर स्त्रीबद्दल माहिती होण्यासाठी त्यांच्या जीवनावर विद्यार्थ्यांना शालेय जीवनात निबंध लिहावा लागतो. मदर टेरेसा निबंध ( Mother Teresa Essay ) व्यवस्थितरित्या मांडला गेला पाहिजे. जीवनातील प्रसंग आणि केलेले कार्य हे वास्तववादी स्वरूपात लिहावे लागते. चला तर मग पाहूया कसा लिहाल, मदर टेरेसा यांच्या जीवनावर निबंध!

मदर टेरेसा निबंध ! Marathi Nibandh – Mother Teresa |

मदर टेरेसा यांचे संपूर्ण नाव अगनेस गोंझा बोयाजू ( Anjezë Gonxhe Bojaxhiu ) असे होते. त्यांचा जन्म 26 ऑगस्ट 1910 रोजी मसेदोनियातील स्कॉप्जे येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव निकोला बोयाजू तर आईचे नाव द्रना बोयाजू ( Nikollë and Dranafile Bojaxhiu ) होते. अगनेस फक्त 8 वर्षांची असताना वडील निकोला यांचे निधन झाले. वडिलांच्या अकाली निधनाने सर्व जबाबदारी आईवर येऊन पडली.

मदर टेरेसा यांच्या आई धार्मिक वृत्तीच्या होत्या. त्या चर्चमध्ये प्रार्थनेसाठी नियमित जात असत. अगनेस तिची आई आणि बहिणीबरोबर चर्चमध्ये धार्मिक गीत गायनासाठी जात असे. आईचे धार्मिक आणि समाजसेवी वृत्तीचे संस्कार लहानग्या अगनेसवर होत होते. केवळ 12 वर्षांचे वय असताना येशूची समाजसेवी आणि परोपकारी शिकवणीचा तिच्यावर प्रभाव पडला. तिने तीच शिकवण पुढे प्रसारित करण्याचा निर्णय घेतला.

पुढे काही वर्षानंतर अगनेसचा संबंध “सिस्टर्स ऑफ लोरेटो” या नन समुदायाशी आला. त्यावेळी त्या फक्त 18 वर्षाच्या होत्या. समाजसेवेचे कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी अगनेसने घर सोडले आणि त्या आयर्लंडला गेल्या. इंग्रजी माध्यमातूनच सर्व शिक्षण आणि धर्मप्रसार होत असल्याने इंग्रजी भाषा शिकणे अनिवार्य होते. त्यामुळे तिथे गेल्यावर त्यांनी इंग्रजी भाषा शिकली. त्यानंतर एका संस्थेतून त्यांनी नन होण्याचे सर्व ट्रेनिंग पूर्ण केले. ते ट्रेनिंग पूर्ण झाल्यानंतर त्यांना सिस्टर मेरी टेरेसा असे नाव देण्यात आले.

नन झाल्यानंतर त्यांनी आपले संपूर्ण जीवन गरीब आणि असहाय्य लोकांची सेवा करण्यासाठी वाहून घेण्याचा निर्णय घेतला. मदर टेरेसा 1929 साली इतर काही ननसोबत भारतात आल्या. दार्जिलिंग येथे त्यांनी नन म्हणून प्रथमतः प्रतिज्ञा घेतली. त्यानंतर त्यांना कोलकाता येथे शिक्षिका म्हणून पाठवण्यात आले. कोलकाता येथे डबलिनच्या सिस्टर लोरेंटो यांनी संत मैरी स्कूलची स्थापना केली होती. या शाळेत मदर टेरेसा गरीब मुलांना शिकवत असत. अत्यंत कमी वेळात त्या सर्व मुलांच्या आवडत्या शिक्षिका झाल्या. शिक्षण देण्याचे कार्य त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे केले.

मदर टेरेसा या अत्यंत संवेदनशील मनाच्या होत्या. कोलकाता येथे त्याकाळी दुष्काळ आणि गरिबीमुळे लोकांचे हाल होत होते. ते पाहून मदर टेरेसा यांना खूप दुःख झाले. त्यांनी त्यानंतर आपले संपूर्ण जीवन गरीब, आजारी आणि असहाय्य लोकांच्या सेवेसाठी व्यतित करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे मदर टेरेसा यांनी पटना येथील होली फॅमिली हॉस्पीटलमधुन नर्सिंगचे प्रशिक्षण पुर्ण केले.

पुन्हा 1948 साली कोलकाता येथे येऊन गरिबांच्या आणि पीडितांच्या सेवेत स्वतःला झोकून दिलं. पुढे 1950 मध्ये त्यांनी “मिशनरी ऑफ चॅरीटी” ची स्थापना केली. मदर टेरेसा यांच्या या संस्थेचा उद्देश केवळ गरीब, रूग्ण, आणि पीडितांची सहाय्यता करणे आणि त्यांच्यात जगण्याची आस निर्माण करणे हाच होता. या संस्थेव्यतिरिक्त त्यांनी आश्रमही स्थापन केले. या आश्रमात गरीब आणि आजारी रूग्णांवर उपचार केले जात असत आणि अनाथ व बेघर मुलांची मदत केली जात असे.

भारत सरकारने त्यांचे जनहितार्थ कार्य पाहून “पद्मश्री” आणि त्यानंतर “भारतरत्न” या दोन पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. पुढे 1979 मध्ये त्यांना मानव कल्याणार्थ केलेल्या उत्कृष्ट कार्याकरीता शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. याशिवाय 1985 साली त्यांना मेडल ऑफ फ्रीडम अवार्डने देखील गौरवान्वित करण्यात आले.

वृद्धापकाळात त्यांची प्रकृती ढासळत गेली. 1983 व 1989 साली त्यांना दोन हृदय विकारांच्या झटक्यांचा सामना करावा लागला. या प्रतिकूल परिस्थितीत देखील त्यांनी समाजसेवेचे कार्य सुरूच ठेवले. 1997 ला मदर टेरेसा यांनी मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या प्रमुख पदावरून निवृत्ती घेतली. 5 सप्टेंबर 1997 रोजी त्यांची प्राणज्योत मालवली आणि त्या अनंतात विलीन झाल्या.

मदर टेरेसा मराठी निबंध ( Mother Teresa Essay In Marathi ) तुम्हाला कसा वाटला याबद्दल नक्की तुमचा अभिप्राय कळवा…

Leave a Comment