माझी आजी – मराठी निबंध | Majhi Aaji Marathi Nibandh

प्रस्तुत लेख हा माझी आजी (Majhi Aaji Marathi Nibandh) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. आजीचे गुण स्पष्ट करणारा हा निबंध म्हणजे आपल्या आजीविषयी असणारे स्वतःचे मत व्यक्त करायचे असते.

माझी आजी निबंध मराठी | My Grandmother Essay In Marathi |

माझ्या आजीचे नाव लक्ष्मी मोतीराम पाटील असे आहे. आमच्या कुटुंबातील आजी हीच माझी सर्वात जास्त आवडती व्यक्ती आहे. आजीने माझ्या बालपणापासून माझा खूप लाड केलेला आहे. सध्या देखील तिचा अनुभव आणि तिचे विचार माझ्या आयुष्यात मला खूप उपयोगी पडतात.

माझी आजी माझ्या जन्मापूर्वी आमच्या मूळगावी राहायची. माझ्या जन्मानंतर माझ्या संगोपनासाठी म्हणून आजी आमच्या घरी राहायला आली. माझ्या आजीला माझे वडील सुधीर आणि माझे काका संतोष असे दोन मुलगे आहेत. दोघांच्याही कुटुंबात आजीचा सहवास सर्वांनाच प्रिय आहे.

आजीच्या संस्कारांमुळेच माझे काका आणि वडील हे जबाबदार व्यक्ती म्हणून घडलेले आहेत. माझे आजोबा हे तरुणपणी नेहमी कामानिमित्त बाहेर असायचे. त्यामुळे दोघा मुलांना तिने उत्तम संस्कारित करून वाढवलेले आहे. पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्याने तिला लोकांच्या सहवासाची सतत सवय लागलेली होती.

कधीकधी आजी काकांकडे तर कधी आमच्याकडे राहत असते. आजोबा आणि काकांचे कुटुंब हे गावी राहत असल्याने ती अधूनमधून गावी जात असते. ती आमच्या घरी आल्यावर मात्र मला खूप आनंद होतो. ती घरी आल्यावर मला शालेय साहित्य, घड्याळ किंवा गोष्टींची पुस्तके अशा भेटवस्तु नक्की घेऊन येत असते.

माझ्या आजीचे शिक्षण सातवीपर्यंत झालेले आहे. तिला लिखाण आणि वाचन हे उत्तमरित्या करता येते. या वयातही तिला घरकामाची अत्यंत आवड आहे. घर कामातून वेळ मिळाल्यावर माझा नकार असतानाही ती माझा अभ्यास घेण्याचा प्रयत्न करते. परंतु मी तिला तिच्या शाळेतील अनुभव विचारत असतो.

आजीला सतत कोणते ना कोणते काम करावेसे वाटत असते. तिला कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचा खूप छंद आहे. ती मलाही कधीकधी तिच्या कामात ओढून घेते आणि काम पूर्ण करते. ती पूर्वीपासून उत्तमरित्या स्वयंपाक बनवत आलेली आहेच. त्यामुळे कधीकधी आवड म्हणून एखाद्या वेळचा सर्व स्वयंपाक तीच बनवते.

माझी आजी समर्पित भावाने कुटुंबाची काळजी करत असते. तिला वायफळ गप्पा मारायला आवडत नाहीत. ती सतत काहीतरी नवीन शिकण्याचा आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करत असल्याने तिच्या बोलण्यात सतत एक उत्साह जाणवत असतो. तिच्या जगण्यात आजही सजगता आणि नीटनेटकेपणा हे गुण  आढळतात.

घरकाम, कलाकुसरीच्या वस्तू बनवण्याचा छंद आणि अधूनमधून अध्यात्मिक पुस्तकांचे वाचन अशा सवयी माझ्या आजीला आहेत. त्यामुळे घरात तिचा अनुभव नेहमी उपयोगी पडतोच शिवाय प्रत्येकाच्या मनात तिच्याबद्दल कमालीचा आदर आहे. सतत समंजसपणा आणि निःस्वार्थी भाव जपत असल्याने माझी आजी मला खूप प्रिय आहे.

तुम्हाला माझी आजी हा मराठी निबंध (Majhi Aaji Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment