माझे आजोबा – मराठी निबंध | Majhe Ajoba Marathi Nibandh

प्रस्तुत लेख हा माझे आजोबा (Majhe Ajoba Marathi Nibandh) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. आजोबांचे गुण स्पष्ट करणारा हा निबंध म्हणजे आपल्या आजोबांविषयी असणारे स्वतःचे मत व्यक्त करायचे असते.

माझे आजोबा निबंध मराठी | My Grandfather Essay In Marathi |

प्रत्येक व्यक्तीला स्वतःचे आजोबा खूप प्रिय असतात. लहानपणी घराबाहेर पडण्याची परवानगी नसल्याने सर्वांनीच आजोबांसोबत खूप सारा वेळ व्यतित केलेला असतो. सर्वांप्रमाणेच मलादेखील माझे आजोबा खाऊ देतात, फिरायला नेतात, भेटवस्तू आणतात, गोष्टी सांगतात, त्यामुळे माझे त्यांच्यासोबतचे नाते अत्यंत घट्ट बनलेले आहे.

माझ्या आजोबांचे नाव सखाराम दिनानाथ मोरे असे आहे. त्यांचे सध्याचे वय ६५ वर्षे आहे. त्यांनी बँकेत तब्बल तीस वर्षे नोकरी केली आणि निवृत्ती घेऊन त्यांना आता सहा वर्षे पूर्ण झालेली आहेत. सध्या ते वाचन आणि संगीत असे छंद जोपासत आहेत परंतु त्यांचा बहुतांशी वेळ नातवंडांना खेळवण्यातच जातो.

मला गोष्टी ऐकायला आणि नियमित वाचन करायला खूप आवडते. या दोन्ही सवयी मला आजोबांमुळेच जडलेल्या आहेत. ते आम्हाला दररोज एक गोष्ट सांगतात. त्यांच्याकडे पुस्तकांचा भरपूर साठा आहे. त्यातील काही पुस्तकांचे वाचन ते माझ्याकडून करवून घेतात.

कधीकधी ते आम्हाला बँकेतील मजेशीर प्रसंग सांगत असतात. ते ऐकून आम्हाला गंमत वाटते. काहीवेळा माझ्याकडून वागण्यात आणि बोलण्यात चुका झाल्यास ते व्यवस्थित स्वतःचे उदाहरण देऊनच मला समजवून देखील सांगतात. त्यामुळे घरातील कोणाही व्यक्तीपेक्षा मी जास्तीत जास्त वेळ आजोबांसोबत व्यतित करतो.

आमच्या आजोबांना एकूण तीन मुलगे आहेत. त्या तिघांचाही परिवार अत्यंत मजेत जगत आहे. सध्या आजी आणि आजोबा आमच्या जुन्या घरी राहतात. ते दोघे अजूनही अगदी स्वस्थ जगत आहेत. आमचे घर त्यांच्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावर असल्याने मी कधी तिकडे तर कधी इकडे वडिलांकडे राहत असतो.

सुट्टी दिवशी पूर्णवेळ मी आजोबांसोबत असतो. ते मला शेजारील बागेत आणि वेगवेगळ्या निसर्गरम्य ठिकाणी फिरायला नेतात. आम्ही दोघे डबा घेऊनच बाहेर पडतो. मग दिवसभर अगदी मज्जा करत सहल असल्याप्रमाणे वाटते. कधीकधी माझे चुलत भाऊ – बहिण देखील आमच्यासोबत फिरायला येत असतात.

माझे आजोबा थोडे विनोदी स्वभावाचे आहेत. मी खोड्या केल्यावर कधीकधी रागवतात परंतु बहुतेकदा अत्यंत मनमिळाऊ स्वभावाचे असतात. आमच्या आणि माझ्या काकांच्या घरी ते अधूनमधून फेरफटका मारत असतात. त्यावेळी चांगल्याच मजेशीर गप्पा रंगतात आणि सहपरिवार भोजनाचा कार्यक्रम सुध्दा घेतला जातो.

त्यांचा मित्रपरिवार जास्त नाहीये. ते मोजक्याच तीन ते चार जणांच्या संपर्कात नेहमी असतात. त्याव्यतिरिक्त कुटुंबासोबत वेळ घालवणे, फिरायला जाणे, संगीत ऐकणे आणि वाचन करणे यामध्ये त्यांचा जास्तीत जास्त वेळ जात असतो. ते कमालीचे शिकाऊ व्यक्ती असल्यासारखे सतत नवीन काहीतरी जाणून घ्यायचा प्रयत्न करतात.

ते या वयातही सहजरीत्या मोबाईल आणि संगणक वापरू शकतात. ऑनलाईन बँकिंग आणि शॉपिंग या गोष्टी त्यांना खूप आवडतात. “सतत शिकत राहणे”, त्यांचा हा गुण मला खूप काही शिकवतो. मीही माझ्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक क्षणी काही ना काही जाणून घ्यायचा प्रयत्न करत असतो.

एकंदरीत माझे आजोबा हे विनोदी स्वभावाचे आणि स्वावलंबी व्यक्तिमत्त्व आहे. माझे वडील आणि दोन्ही काका यांच्यात सुध्दा त्यांचे अनेक गुण उतरलेले दिसून येतात. “पेराल तेच उगवते”, या म्हणीप्रमाणे त्यांचे संस्कार हे आमच्या सर्व कुटुंबात रुजलेले आहेत. त्यामुळे माझ्यासाठी सध्या तरी माझे आजोबाच हे आदर्श व्यक्ती आहेत.

तुम्हाला माझे आजोबा हा मराठी निबंध (Majhe Ajoba Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment