स्वातंत्र्यलढ्यातील एक जहाल व्यक्तिमत्त्व, लेखक – संपादक, कर्मयोगी बाळ गंगाधर टिळक यांच्या जीवनाविषयी विद्यार्थ्यांना माहिती होण्यासाठी लोकमान्य टिळक हा मराठी निबंध (Lokmanya Tilak Essay In Marathi) लिहावा लागतो.
लोकमान्य बाळ गंगाधर टिळक – मराठी निबंध | Lokmanya Tilak Marathi Nibandh
“स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच!” असे इंग्रजांना ठणकावून सांगणारे आणि लोकमान्य या उपाधीने प्रसिद्ध असणारे टिळक हे एक थोर भारतीय स्वातंत्र्यसेनानी, राजकारणी, लेखक आणि संपादक होते.
लोकमान्य टिळकांचे संपूर्ण नाव बाळ गंगाधर टिळक असे होते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ रोजी रत्नागिरीतील टिळक आळीत एका ब्राह्मण कुटुंबात झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव, तालुका दापोली हे टिळकांचे मूळ गाव होय.
लोकमान्य टिळकांनी इ. स. १८८१ साली केसरी व मराठा ही वृत्तपत्रे सुरू केली. यापैकी केसरी हे मराठीतून तर मराठा हे इंग्रजीमधून प्रसिद्ध होत होते. सुरुवातीला आगरकर केसरीचे व टिळक हे मराठाचे संपादक होते.
इ. स. १८८४ मध्ये टिळक व आगरकरांनी डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली. या संस्थेतर्फे १८८५ मध्ये फर्ग्युसन महाविद्यालयाची स्थापना करण्यात आली. परंतु त्यापुढे टिळक आणि आगरकर या दोघांमध्ये वैचारिक मतभेद झाले.
टिळकांचे अग्रलेख हा केसरी वृत्तपत्राचा आत्मा होता. महाराष्ट्रात १८९६ साली मोठा दुष्काळ पडला होता. टिळकांनी त्यांच्या वृत्तपत्रांमार्फत शेतकऱ्यांना आणि समाजातील इतर घटकांना कर्तव्याची जाणीव करून दिली.
स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी लढताना जहालवाद व मवाळवाद असे दोन मतप्रवाह होते. लोकमान्य टिळक हे जहालवादी नेते होते. स्वातंत्र्यासाठी संघर्ष करा, मतभेद असल्यास आंदोलन करा, अशा मतावर लोकमान्य टिळक कायमच ठाम राहिले.
लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल यांचे राजकीय धोरण आणि स्वभाव एकसारखेच असल्याने या तिघांना लाल-बाल-पाल असे संबोधले जात असे.
लोकमान्य टिळक हे अतिशय द्रष्टे विचारक, लेखक, शिक्षक आणि संपादक तर होतेच शिवाय त्यांचा संस्कृत, गणित आणि खगोलशास्त्र या विषयांतील गाढा अभ्यास देखील होता. मंडालेच्या तुरुंगात लिहलेला “गीतारहस्य” हा त्यांचा ग्रंथ खूपच प्रसिद्ध झाला.
लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाला सुरुवात केली, तसेच महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या शिवजयंती उत्सवाला व्यापक स्वरूप दिले. अशा या थोर महापुरुषाचा मृत्यू दिनांक १ ऑगस्ट १९२० रोजी पुणे येथे झाला.
तुम्हाला लोकमान्य टिळक – मराठी निबंध (Lokmanya Tilak Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये लिहून कळवा…धन्यवाद!