गुरुपौर्णिमा मराठी निबंध | Guru Pornima Essay In Marathi |

प्रस्तुत निबंध हा गुरुपौर्णिमा आणि गुरूचे महत्त्व स्पष्ट करणारा आहे. गुरुचे महात्म्य कळण्यासाठी विद्यार्थ्यांना गुरुपौर्णिमा हा मराठी निबंध (Guru Pornima Essay In Marathi) लिहावा लागतो. या निबंधातून गुरुविषयी असणाऱ्या सर्व संकल्पना नक्कीच स्पष्ट होत जातील.

गुरुपौर्णिमा मराठी निबंध | Guru Pornima Marathi Nibandh |

भारतीय संस्कृतीत आई, वडील आणि गुरू हे देवासमान मानले गेले आहेत. आई – वडील जन्म देतात मात्र जीवनाला सार्थक दिशा देण्याचे काम मात्र गुरू करत असतो. त्याचीच प्रचिती म्हणून गुरु – शिष्य ही परंपरा भारतात प्राचीन काळापासून चालत आलेली आहे.

प्रत्येक वर्षी आषाढ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला गुरुपौर्णिमा संबोधले जाते. ज्या व्यक्तींना आपण गुरु मानत असू, आणि ज्यांच्यामुळे आपल्या जीवनाला आकार मिळत गेला त्यांच्याप्रती आदर, कृतज्ञता आणि सन्मान व्यक्त करण्याचा हा एक समर्पक दिवस आहे.

भारतात शिक्षक आणि गुरू यांमध्ये नेहमीच फरक करण्यात आलेला आहे. शिक्षक हा पुस्तकी ज्ञान देतो तर गुरू हा जीवनाचे आत्मिक आणि पारमार्थिक ज्ञान देत जीवनच बदलून टाकतो. अशा गुरूप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी गुरू पौर्णिमेच्या दिवशी गुरूवंदन, गुरूपूजन आणि गुरूआरती केली जाते.

गुरुपौर्णिमा साजरी करताना नेहमी स्वतः शिष्य बनून सेवा करावी. व्यक्तिमत्त्वातील स्व बाजूला ठेवून गुरुप्रती संपूर्ण निष्ठा आणि समर्पण दाखवावे. विशिष्ट व्यक्तीला गुरू मानले नसल्यास आपले जीवन ज्यांनी घडवले अशा महान लोकांप्रती कृतज्ञता व्यक्त करावी.

गुरू – शिष्य परंपरेत गुरूने शिष्यांसाठी जो जीवनमार्ग सांगितलेला असतो त्याचे आचरण करणे हे शिष्याचे परम कर्तव्य असते. प्रेम, साधना, प्रार्थना आणि समर्पण अशा अनेक मार्गांनी गुरू हा शिष्याचे जीवन बदलण्याचा प्रयत्न करीत असतो.

प्रत्येक महान व्यक्तीसाठी गुरूंनी केलेलं कार्य हे अनमोल असेच आहे. स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस, श्री कृष्ण आणि ऋषी संदिपनी, श्री राम आणि ऋषी वशिष्ठ, अर्जुन आणि गुरू द्रोणाचार्य, अशी काही महान उदाहरणे देता येतील ज्यांद्वारे आपल्याला गुरूचे महत्त्व कळून येते.

महर्षी व्यास यांना आद्य गुरू मानले जाते. महर्षी व्यास यांचा जन्म याच दिवशी झाल्याने काही जण गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा असे देखील संबोधतात. भगवान बुद्धांनी देखील आत्मज्ञानानंतर याच दिवशी सारनाथ येथे आपले पहिले प्रवचन दिले गेल्याचा इतिहास आहे.

सध्या अध्यात्मिक अधिष्ठान लयाला जात असल्याचे सर्वत्र दिसत आहे. त्यामुळे नकली आणि कामचलाऊ बाबा, भोंदू महाराज यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे स्वतःच समर्पित वृत्तीने आणि मनोभावे खऱ्या गुरूची ओळख करून घेणे आवश्यक झाले आहे.

प्रेम, प्रार्थना आणि भक्ती जागृत होण्यासाठी गुरूपौर्णिमेचा हा दिवस सर्वांसाठी एक अध्यात्मिक आणि अलौकिक जीवनाची सुरुवात घेऊन येवो. सर्वांना गुरूकृपा लाभो आणि सर्वांचे भले होवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

तुम्हाला गुरुपौर्णिमा हा मराठी निबंध (Guru Pornima Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment