खो-खो मराठी निबंध | Kho Kho Marathi Nibandh |

प्रस्तुत लेख हा माझा आवडता खेळ खो-खो (Majha Avadta Khel – Kho Kho Marathi Nibandh) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात खो खो खेळाविषयी सर्व माहिती देण्यात आलेली आहे तसेच स्वतःला हा खेळ का आवडतो याचेही वर्णन करण्यात आलेले आहे.

माझा आवडता खेळ – खो खो मराठी निबंध | My Favourite Game – Kho Kho Essay In Marathi

खो-खो हा पारंपारिक भारतीय मैदानी खेळ आहे. कोणत्याही साधनांशिवाय खेळला जाणारा हा खेळ शरीरासाठी अत्यंत लाभदायी आहे. मैदानात दोन खांब रोवून हा खेळ शरीराच्या चपळतेवर खेळला जातो. हा खेळ खेळल्याने धावगती आणि सजगता असे गुण विकसित होतात.

लहानपणी आपण जसे पकडापकडी खेळतो त्याप्रमाणेच खो-खो हा खेळ खेळला जातो. फक्त त्यामध्ये नियम आणि अटी लागू केल्या जातात. दोन संघांत हा खेळ खेळला जातो. या खेळात प्रत्यक्ष मैदानात नऊ खेळाडू आणि राखीव तीन खेळाडू असे एकूण बारा खेळाडू असतात.

खो-खो हा खेळ प्राचीन काळापासून खेळला जात असल्याने याची नक्की सुरुवात कधी झाली हे सांगता येणे अशक्य आहे. विसाव्या शतकाच्या सुरुवातीला या खेळाचे नियम ठरवण्यात आले. इ. स. १९५९-६० साली विजयवाडा, आंध्रप्रदेश येथे खो-खो ची पहिली राष्ट्रीय स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.

खो-खो खेळात वेळेनुसार दोन भाग पडतात. दोन्ही भागांत दोन्ही संघांना पाठलाग व बचाव करण्याची संधी मिळत असते. दोन खांबांच्या मध्ये पाठलाग करणाऱ्या संघाचे आठ खेळाडू बसलेले असतात आणि एक खेळाडू विरोधी संघातील खेळाडूंना शिवण्यासाठी धावणार असतो. विरोधी संघातील तीन खेळाडू स्वतःचा बचाव करण्यासाठी धावत असतात.

बचाव करणाऱ्या खेळाडूंची धावगती आणि त्यांचे मैदानातील स्थान ओळखून पकडणारा खेळाडू हा आपल्या संघातील बसलेल्या खेळाडूंना पाठीवर थाप मारून “खो” असा तोंडाने उच्चार करून उठवत असतो. खो मिळालेला खेळाडू आता पकडण्यासाठी धावणार असतो.

बचाव करणाऱ्या खेळाडूंना धावण्याबद्दल कोणतेही निर्बंध नसतात. पकडणारा खेळाडू मात्र आपली धावण्याची दिशा खांबाला शिवल्याशिवाय बदलू शकत नाही. एका खेळाडूला शिवल्यास एक गुण अशा प्रकारे संघाची गुणमोजणी केली जाते. दोन्ही डावांच्या शेवटी ज्या संघाचे गुण जास्त असतील तो संघ विजयी ठरतो.

आमच्या शाळेत खो-खो या खेळाचे उत्तम प्रशिक्षण मिळते. तसेच शाळेत शालेय आणि आंतरशालेय खो-खो स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. मी इयत्ता पाचवीत असल्यापासून खो-खो हा खेळ खेळत असल्याने सध्या मी बऱ्यापैकी या खेळात तरबेज झालेलो आहे.

मला खो-खो खेळातच माझी कारकीर्द घडवायची आहे. मला माझ्या बाबांचा खेळासाठी खंबीर पाठिंबा आहे. शाळेतील खेळाचे प्रशिक्षक पाटील सरांचे देखील मला भरपूर सहाय्य लाभते. मी दररोज एक ते दोन तास मिळून व्यायाम आणि खो-खो खेळाचा सराव करत असतो.

खो-खो खेळाचे नियम अत्यंत सहज समजणारे असे आहेत. तसेच हा खेळ अत्यंत उत्कंठा निर्माण करणारा खेळ आहे. हा खेळ खेळायला सुरुवात केल्यापासून माझी रोगप्रतिकारक शक्ती कमालीची वाढली आहे. खो-खो हा खेळ खूपच उत्साहात आणि चपळतेने खेळला जात असल्याने खो-खो हाच माझा आवडता खेळ आहे.

तुम्हाला माझा आवडता खेळ खो-खो हा मराठी निबंध (Kho Kho Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment