खेळ जीवनात खूप आवश्यक आहे. आयुष्यभर एखादा खेळ छंद म्हणून खेळत राहिलात तर नक्कीच एक आरोग्यपूर्ण जीवन तुम्ही जगू शकता. त्यामुळे खेळाचे महत्त्व लहानपणीच कळाले तर मुले खेळात पारंगत तर होतीलच शिवाय शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या कणखर बनतील.
शालेय विद्यार्थ्यांना या विषयावर लिहताना खेळाचे आणि शारीरिक हालचालीचे फायदे माहीत असणे गरजेचे आहे. जास्त पसारा न करता मुद्देसूद मांडणी आवश्यक आहे. चला तर मग बघुया कसा लिहावा ‘खेळाचे महत्व’ किंवा ‘शालेय जीवनात खेळाचे महत्त्व’ हा निबंध!
Importance of Sports – Marathi Essay | शालेय जीवनात खेळाचे महत्त्व !
खेळ खेळणे किती हितकर असते याची जाणीव लहानपणापासून प्रत्येक मुलाला झाली पाहिजे. खेळामुळे शरीराचा आणि पर्यायाने मनाचा सर्वांगीण विकास शक्य होतो. लहानपणी शरीर कोमल आणि नाजूक असते. अशा शरीराला तंदुरुस्त आणि मजबूत बनवण्यासाठी खेळ आवश्यक असतो.
खेळाची सुरुवात कौशल्यपूर्ण असणे काही गरजेचे नसते. कौशल्य हळूहळू अनुभवातून वाढत जाते. एकदा कौशल्य आल्यास तुम्ही त्या खेळात पारंगत बनत जाता. वैयक्तिक खेळ आणि सांघिक खेळ असे दोन प्रकारचे खेळ आहेत ज्यातून तुम्ही तुमचा प्रकार आणि आवड ओळखू शकता.
शरीराचे आणि बुद्धीचे कार्य कसे चालते हे अगोदर समजून घेतले पाहिजे. बुद्धीला ज्या चालना मिळतात त्याद्वारे शरीर हालचाल करीत असते. मन यामध्ये सहाय्यकारी ठरत असते. त्यामुळे जेव्हा खेळ खेळला जातो तेव्हा मन, बुद्धी आणि शरीर या तिन्ही गोष्टींचा वापर होत असतो. खेळामुळे व्यक्तीच्या गुणांची वाढ होत असते.
खेळामुळे जीवनच एक खेळ बनून जाते. संघर्ष आणि विजय हे गुण आत्मसात केले जातात. साहसी वृत्ती आणि नेतृत्वगुण वाढीस लागतो. कुठल्याही संकटाशी सामना करण्याचे धैर्य अंगी बाणवले जाते. एकत्र मिळून एखादे काम पूर्ण करणे सहज शक्य होते. त्यामुळे शरीर क्रियाशील आणि कार्यक्षम बनते.
असे जीवनातील सुप्त गुण वाढीकरिता खेळ आवश्यक आहेच. कुठलाही खेळ तुम्ही छंद म्हणून आयुष्यभर खेळू शकता. शरीरातील सर्व अनावश्यक ग्रंथींचे शरीरातून घामावाटे बाहेर पडणे आवश्यक असते नाहीतर शरीर रोगी बनत जाते. खेळामुळे घाम येतो आणि नैसर्गिकरित्या शरीरशुद्धी केली जाते.
सर्व आजारांवर उपाय म्हणजे शारीरिक हालचाल! खेळात बौद्धिक आणि मानसिक कौशल्ये गरजेची असतातच परंतु शारीरिक क्षमता देखील वापरली जाते ज्यामुळे परिपूर्ण आरोग्य प्राप्त होते आणि कुठलाच शारीरिक आणि मानसिक आजार जवळ फिरकत नाही.
एका सुंदर आणि सशक्त शरिरातच सुंदर मन वास करत असते. हा सुविचार तुमच्याबद्दल खरा ठरवायचा असेल तर खेळ खेळायला सुरुवात करा. डॉक्टर असे म्हणतात की, जेवढा ऑक्सिजन तुमच्या शरीरात जास्त असेल तेवढे तुम्ही निरोगी असता आणि शरीरही व्यवस्थित कार्य करते. खेळामुळे दम लागतो आणि साहजिकच श्वसनक्रिया वेगाने घडत जाते. शरीरात ऑक्सिजन जास्त प्रमाणात घेतला जातो.
पूर्वी भारतात पारंपरिक आणि मैदानी खेळ खेळले जायचे. ज्यामध्ये कुस्ती, कबड्डी, खो – खो यांचा समावेश असायचा. त्यावेळी शेती आणि कष्टाची कामे असल्याने सर्वजण खेळ खेळू शकत नसत. परंतु आज प्रत्येक खेळ व्यावसायिकदृष्ट्या खेळला जातो. अनेक प्रकारचे खेळ आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळले जातात.
आज भारतात क्रिकेट, हॉकी, कबड्डी, फुटबॉल हे खेळ मोठ्या आवडीने खेळले जातात. तसेच वैयक्तिक खेळही खेळले जातात ज्यामध्ये बॅडमिंटन, धावणे, पोहणे, लांब आणि उंच उडी, भाला आणि थाळी फेक, कुस्ती, बॉक्सिंग इत्यादी आणि अनेक खेळ राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर खेळले जातात.
ऑलिम्पिक स्पर्धा ही अनेक खेळांना वाव देत असते. ज्यामध्ये सर्व देशांचे खेळाडू आपली दावेदारी स्पष्ट करत असतात. आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक खेळ व्यवसाय आणि करिअर म्हणून बघितला जाऊ लागला आहे. त्यामुळे खेळाचे महत्त्व आणखीनच वाढले आहे. निर्मल आनंद आणि आरोग्य प्राप्तीसाठी प्रत्येक व्यक्तीने एक तरी खेळ खेळावाच!
nice