जागतिक योग दिन – मराठी निबंध | Jagatik Yog Din Nibandh Marathi |

प्रस्तुत लेख हा जागतिक योग दिन या विषयावर आधारित मराठी निबंध (Jagatik Yog Din Nibandh Marathi) आहे. या लेखात योग दिनाचे महत्त्व, रूपरेखा आणि तो कधी व कसा साजरा केला जातो याबद्दल चर्चा करण्यात आलेली आहे.

जागतिक योग दिन निबंध मराठी | World Yoga Day Essay In Marathi |

एकात्मता, एकता, एकात्मिकता अशा विविध संकल्पना योगाबद्दल सांगता येतील. सर्व सजीवसृष्टी ही एकमेकांशी जोडली गेलेली आहे, त्याचा प्रत्यक्ष अनुभव म्हणजे योगा! मानवी जीवनात योगाचा अत्युच्च अनुभव होण्यासाठी योगप्रचार आणि योगाविषयी जनजागृती होणे गरजेचे आहे.

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये २१ जून हा दिवस ‘जागतिक योग दिन’ म्हणून साजरा करण्यात यावा असा प्रस्ताव संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मांडला. एकूण १९३ देशांपैकी १७५ देशांनी या प्रस्तावाला होकार दिला. सविस्तर चर्चेनंतर या प्रस्तावाला डिसेंबर २०१४ मध्ये संपूर्णपणे मान्यता प्राप्त झाली.

२१ जून २०१५ रोजी पहिला ‘जागतिक योग दिन’ संपूर्ण जगभरात साजरा करण्यात आला. तेव्हापासून प्रत्येक वर्षी २१ जून या दिवशी योग दिन अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. तसेच योगासने, योगजीवन, योगदृष्टी, योग साधना अशा योगाविषयीच्या विविध संकल्पना या दिवशी प्रसारित केल्या जातात.

जागतिक योग दिनानिमित्त दरवर्षी विशिष्ट रूपरेखांचे आयोजन करण्यात येते. रूपरेखा समजून घेऊन त्यामागील उद्देश जाणून घेतला जातो आणि वर्षभर त्याचे पालन करण्यात येते. आरोग्यासाठी योग, शांततेसाठी योग, हृदयासाठी योग, कौटुंबिक योग, कल्याणकारी योग, मानवतेसाठी योग अशा मागील काही वर्षांतील रूपरेखा आहेत.

योग दिनाची माहिती सर्वांना व्हावी व त्यानिमित्ताने जनजागृती व्हावी अशा उद्देशाने योग दिनाचे महत्त्व प्रसारमाध्यमांद्वारे सर्वत्र पसरवले जाते. सोशल मीडिया व इंटरनेटचा वापर करून योग दिनाचे संदेश सर्वत्र पोचवले जातात. जागोजागी योग दिनाचे मोठमोठे फलक लावले जातात.

योगचिकित्सा, योगासने, प्राणायाम, ध्यान, सूर्यनमस्कार अशा सर्व बाबींची माहिती सर्वांना व्हावी, त्यासाठी शाळा, महाविद्यालये, सरकारी कार्यालये इत्यादी ठिकाणी योगाची व्याख्याने व प्रात्यक्षिके सादर केली जातात. पुढील पिढ्यांना मार्गदर्शक ठरू शकेल अशा पद्धतीने योगाचे महत्त्व सांगितले जाते.

वर्षातील सर्वात मोठा दिवस म्हणून २१ जून या दिवसाचे महत्त्व आहे. या दिवशी सूर्योदय लवकर होऊन सूर्यास्त उशिरा होत असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरू होते. त्यामुळे याच दिवशी योग दिन साजरा होत असल्याने त्याचे भौगोलिक, सांस्कृतिक आणि अध्यात्मिक मूल्य वाढते.

भारतात योगा पूर्वीपासून प्रचलित आहे. अध्यात्मिक क्षेत्रात विशेष गती करावयाची असल्यास योगदृष्टीचा विचार आचरणात आणला जातो. संपूर्ण जगभरात योगप्रचार झाला तर सद्य आणि भावी मानवी पिढ्यांना योगा जीवन पद्धती ही सकारात्मक आणि शांततापूर्ण जीवनासाठी सहाय्यक ठरू शकेल.

तुम्हाला जागतिक योग दिन हा मराठी निबंध (Jagatik Yog Din Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment