माझी शाळा – मराठी निबंध | Majhi Shala Nibandh Marathi |

शिक्षणाचा फायदा आणि महत्त्व हे आज सर्वजण जाणतात. अशा शिक्षणाची सुरुवात शाळेपासून होत असते. लहानपणी काही कळत नसताना आपले पालक आपल्याला शाळेत नेऊन सोडतात. तिथे शिक्षक आणि नवनवीन मित्र – मैत्रीण भेटत असतात. शिक्षणाबरोबरच आयुष्याचे विविध पैलू आपल्याला त्यामधून कळत जातात. अशा शाळेबद्दलचे विचार किंवा अनुभव हे निबंध स्वरूपात शालेय जीवनात लिहायला लावतात. 

Essay On My School in Marathi (200 Words)

माझी शाळा अनंतपुर गावात मध्यभागी वसलेली आहे. माझ्या शाळेचे नाव नूतन विद्यालय असे आहे. शाळेची टुमदार इमारत, सदाहरित बाग आणि सुसज्ज मैदान अशी शाळेची रचना आहे.

शाळेत एकूण दहा इयत्ता आहेत आणि पंचवीस वर्ग आहेत ज्यामध्ये प्राध्यापक वर्गकक्ष, प्राचार्य कक्ष, प्रयोगशाळा, सांस्कृतिक भवन आणि विद्यार्थी वर्ग समाविष्ट आहे. शाळेला चाळीस शिक्षकांची मान्यता आहे तरी जवळजवळ पस्तीस एवढा शिक्षक वर्ग आत्ता आमच्या शाळेत आहे.

पहिली ते चौथीपर्यंत तुकड्या नाहीत. एका इयत्तेला एक-एक वर्ग आहे. पाचवी ते सातवी पर्यंत प्रत्येकी दोन तुकड्या आहेत आणि आठवी ते दहावी पर्यंत प्रत्येकी तीन तुकड्या आहेत तसेच आठवीपासून पुढील शिक्षणासाठी बाहेरील छोट्या गावांतील विद्यार्थी देखील शाळेत येतात. 

इयत्ता पहिलीत माझं या शाळेत शिक्षण सुरू झालं. अनेक दिवस तर मी या नवीन शाळेत घाबरत होतो. पण हळूहळू माझे नवीन मित्र होत गेले. त्यांच्याबरोबर शाळेत मस्तीही करू लागलो. थोड्या दिवसानंतर मला माझी शाळा खूपच आवडू लागली. शाळेच्या मैदानात खेळणे तर मला खूप आवडते. 

आमच्या शाळेची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी आहे. दिवसभर अभ्यास करण्याची आणि नवनवीन शिकण्याची प्रेरणा आम्हाला शाळेतील शिक्षकांकडून मिळते. आमच्या शाळेतील श्री. के. टी. जाधव सर खूप आवडतात. ते आम्हाला मराठी विषय अतिशय उत्तम शिकवतात.

शाळेतील उपक्रम मला खूप आवडतात. प्रत्येक मुलाच्या आवडीनुसार कला, क्रीडा आणि शैक्षणिक उपक्रम शाळेत राबवले जातात. वर्षातून एकदा विज्ञान प्रदर्शन, क्रीडा स्पर्धा आणि तीन ते चार वेळा वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आयोजित केली जाते. माझी शाळा ही सर्वांगीण विकास आणि कौशल्य वाढवणारी शाळा आहे. माझ्या शाळेचा मला खूप अभिमान आहे.

Leave a Comment