माझ्या शाळेचे ग्रंथालय – मराठी निबंध | My School Library Essay In Marathi |

प्रस्तुत लेख हा माझ्या शाळेचे ग्रंथालय (Majhya Shaleche Granthalay Nibandh) हा मराठी निबंध आहे. प्रत्येकाला शाळेचे ग्रंथालय हे अत्यंत महत्त्वाचे दालन वाटत असते. अभ्यास, वाचन, चिंतन व मनन अशा बाबी ग्रंथालयाच्या शांत वातावरणात सहज करता येतात.

शाळेतील ग्रंथालयाविषयी आपले अनुभव स्पष्ट करणे या निबंधात अपेक्षित असते. ग्रंथालयातील अनुभवांविषयी वास्तविक कथन करून विद्यार्थ्यांनी हा निबंध मुद्देसूद पद्धतीत पूर्ण करायचा असतो.

ग्रंथालय – मराठी निबंध | Essay On Library In Marathi |

वाचनाचा छंद असल्याने अत्यंत निसर्गरम्य ठिकाणी अथवा ग्रंथालयात वाचत बसणे मला खूप आवडते. निसर्गरम्य ठिकाणी दररोज माझे जाणे होत नसते. कधीकधी बाहेर फिरायला गेल्यावर तसा वाचनाचा आस्वाद घेता येतो. परंतु सध्यातरी माझे आमच्या शाळेचे ग्रंथालय हे अत्यंत आवडीचे ठिकाण आहे.

माझ्या शाळेचे नाव प्रबोधिनी विद्यालय असे आहे. शाळेत प्रत्येक इयत्तेचे वर्ग, प्रयोगशाळा, मैदान आणि शिक्षक खोल्या आहेत. शाळेच्या पाठीमागे असणाऱ्या मैदानाशेजारी जवळजवळ दोनशे मीटर अंतरावर एक सुसज्ज इमारत उभी आहे. तेच आमच्या शाळेचे ग्रंथालय आहे.

आमच्या शाळेचे ग्रंथालय ही एक सुसज्ज आणि भव्य अशी वास्तू आहे. ग्रंथालयात प्रवेश केल्याबरोबर मला आपोआप अध्ययन करण्याची इच्छा निर्माण होत असते. प्रत्येक दिवशी शाळा सुरू होण्याअगोदर दोन तास ग्रंथालय उघडते आणि शाळा सुटल्यानंतर एक तासाने बंद होते.

ग्रंथालयात शाळेतील अभ्यासक्रमाची सर्व मार्गदर्शक पुस्तके, महाराष्ट्रातील प्रसिद्ध लेखकांची पुस्तके तसेच इतर भाषेतील प्रसिध्द पुस्तकांचा अनुवाद केलेली पुस्तकेसुद्धा उपलब्ध आहेत. ग्रंथालयात वैचारिक, कला – क्रीडा आणि वैज्ञानिक क्षेत्रातील सर्व प्रकारची पुस्तके समाविष्ट केलेली आहेत.

मी सकाळी लवकर उठून घरी अभ्यास करण्यापेक्षा शाळेची तयारी करून ग्रंथालयातच अभ्यासासाठी जातो. अभ्यासाव्यतिरिक्त ग्रंथालयात मला गोष्टींची पुस्तके, प्रेरणादायी पुस्तके आणि तांत्रिक क्षेत्रातील नवनवीन मासिके वाचायला खूप आवडतात. तसेच शाळा सुरू होण्यापूर्वी वर्तमानपत्र देखील मी वाचतो.

ग्रंथालयात एस. बी. पाटील सर हे ग्रंथपाल आहेत. त्यांनी ग्रंथालयात अत्यंत शिस्तीचे नियम आणि वातावरण तयार केलेले आहे. शांतता आणि स्वच्छता राखणे हे ग्रंथालयातील मूलभूत नियम आहेत. पुस्तकांचे ठिकाण आणि पुस्तकांच्या नोंदवहीचे व्यवस्थापन यांबाबत ते कमालीचे आग्रही असतात.

ग्रंथालय हे एकूण तीन दालनात विभागलेले आहे. एका विभागात बाक आणि मोठा टेबल आहे तेथे अभ्यासासाठी बैठक व्यवस्था आहे. दुसऱ्या दालनातून ग्रंथालयात प्रवेश होत असतो तेथेच वर्तमानपत्रे आणि मासिके असतात. तिसऱ्या दालनात सर्व पुस्तकांची व्यवस्था केली गेली आहे. 

ग्रंथालयाला एक सुरक्षा रक्षक आहे. तो ग्रंथालयात कोणत्याही प्रकारचा बेशिस्तपणा खपवून घेत नाही. ग्रंथालयाचे एक ओळखपत्र आहे ते विद्यार्थ्याने दाखवल्यानंतरच त्याला आत प्रवेश मिळतो. ज्या विद्यार्थ्यांना ग्रंथालयाचा लाभ घ्यायचा आहे त्यांच्याकडून वार्षिक रक्कम देखील घेतली जाते.

ग्रंथालयाशेजारी एक सुंदर आणि सदाहरित बाग आहे. त्या बागेमुळे ग्रंथालयाची शोभा आणखीनच वाढते. मी कधीकधी ग्रंथपाल पाटील सरांची परवानगी काढून त्या बागेत विरंगुळा म्हणून वाचन करत बसतो. अशा प्रकारे माझ्या शाळेतील ग्रंथालय हे अत्यंत शांत, निरामय आणि मला सर्वात जास्त आवडणारे ठिकाण आहे.

तुम्हाला माझ्या शाळेचे ग्रंथालय हा मराठी निबंध (My School Library Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

1 thought on “माझ्या शाळेचे ग्रंथालय – मराठी निबंध | My School Library Essay In Marathi |”

Leave a Comment