मनुष्य स्वतःचे आयुष्य घडवण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतो. संपूर्ण जीवन म्हणजे कामाची, अभ्यासाची, कलेची, खेळाची, खाण्याची किंवा व्यायामाची सवय लावून घेणे असते. सवयींचे आयुष्यातील महत्त्व शालेय जीवनातच माहीत होण्यासाठी विद्यार्थ्यांना सवयींचे परिणाम (Essay On Habits In Marathi) हा निबंध लिहावा लागतो. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा हा निबंध !
सवयींचे परिणाम | Savayinche Parinam Marathi Nibandh |
मनुष्य जीवनात सवयींचे परिणाम प्रत्येकावर होत असतात. सवय कशी लागते आणि त्याची सुरुवात कशी होते हे जाणून घेण्यासाठी आपण आपले लहानपण आठवले पाहिजे. आपल्या नातेवाईकांनी आणि शिक्षकांनी कसे आपल्याला संस्कारित केले याचा विचार केला पाहिजे.
लहानपणी भाषा शिकल्यानंतर आपण विचार करू लागतो. वारंवार केल्या गेलेल्या विचारानुसार कृती घडत जाते आणि नंतर त्याची सवयच जडते. आपल्या सभोवती असणाऱ्या लोकांना पाहून आपण त्यांचे अनुकरण करू लागतो. मग ज्या ज्या सवयी जडतात त्या अजाणतेपणे लागलेल्या असतात.
मनुष्य हा कर्मानुसार घडत असतो. त्याचे कर्म म्हणजेच त्याच्या सवयी. चांगल्या सवयी असतील तर जीवनावर विधायक परिणाम होतील आणि वाईट सवयी असतील तर नकारात्मक परिणाम होतील. जीवन आनंदी, समाधानी असावे असे प्रत्येकाला वाटते त्यामुळे चांगल्या व्यक्तींची संगत आणि चांगली सवय अंगी बाणवली गेली पाहिजे.
जीवनात आळस, क्रोध, कलह, चिंता, आणि भीती असेल तर बहुतेक वेळा विचार आणि सवयी तपासल्या पाहिजेत. त्यानुसार सवयी बदलण्यासाठी प्रयत्नशील असले पाहिजे. बदल हा एका दिवसात घडू शकत नाही. जसे जीवन आपल्याला पाहिजे तशा पद्धतीच्या सवयींची यादी तयार करा. रोज थोड्या थोड्या प्रमाणात तशी कृती करायला सुरुवात करा.
तुमची आदर्श व्यक्ती कोणी असेल तर त्यांच्या सवयी जाणून घ्या. समजा तो व्यक्ती सकाळी लवकर उठत असेल, व्यायाम अथवा योगा करत असेल, वाचन करत असेल, स्वतःचे काम प्रामाणिकपणे करत असेल आणि तशा सवयी तुम्ही लावून घेतल्या, तर नक्कीच तुमच्याही जीवनात सकारात्मक बदल व्हायला सुरुवात होतील.
चांगल्या सवयींचे परिणाम जसे चांगले असतात तसेच वाईट सवयींचे परिणाम वाईटच असतात. व्यसन करणे, शिवीगाळ करणे, आरोग्याकडे दुर्लक्ष करणे, उशिरा उठणे, व्यवस्थित आहार न घेणे या सर्व वाईट सवयी आहेत. त्यांचे दीर्घकालीन परिणाम वाईट असणार आहेत त्यामुळे त्या सवयींच्या सुरुवातीलाच आपण सजग झाले पाहिजे.
सवयी जडण्यास बुद्धीचे कार्य खूप महत्त्वाचे आहे. एखाद्या विचाराची, कृतीची सूचना वारंवार बुद्धीला दिली गेली की बुद्धी त्यानुसार संपूर्ण शरीर आणि मनाला नियंत्रित करते. त्यामुळे मनात सद्विचार असले पाहिजेत, त्यानुसार सतत एखादी विधायक सूचना बुध्दीला मिळते आणि त्यानुसार कृती घडते.
जशी जीवनशैली तुम्हाला हवी आहे; शारीरिक, मानसिक स्वास्थ्य हवे आहे, तसे विचार करायला सुरुवात करा. छोट्या सवयींची यादी बनवा. त्यांवर कृती करायला आजपासूनच सुरुवात करा. एकदा गेलेली वेळ पुन्हा येत नसते. त्यामुळे बहुमूल्य वेळेचे महत्त्व समजून घेऊन विधायक सवयी अंगी बाणवून घ्या.
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला सवयींचे परिणाम निबंध (Essay On Habits In Marathi) कसा वाटला त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा…
Very nice perfect and useful
Thank you ☺️