जागतिक अपंग दिवस – मराठी निबंध | World Disability Day Marathi Nibandh ।

जागतिक अपंग दिवस हा ३ डिसेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस साजरा करणे म्हणजे अपंग व्यक्तींना सन्मानाने वागवणे आणि त्यांच्या आयुष्यात देखील आनंदाचे क्षण फुलवणे. विद्यार्थ्यांना अशा जाणिवेतून जीवनाची प्रगल्भता येण्यासाठी जागतिक अपंग दिवस हा निबंध (World Disability Day Marathi Nibandh) लिहायला लावतात.

जागतिक अपंग दिन | World Disability Day Essay In Marathi ।

समाजातील अपंग व्यक्ती सन्मानाने वागवल्या गेल्या पाहिजेत. त्यांना त्यांच्या अपंगत्वाचा तिरस्कार न वाटता एक स्वावलंबी आणि स्वाभिमानी जीवन जगता आले पाहिजे. समाजातील सर्व घटकांना त्यांच्याप्रती करुणा वाटली पाहिजे आणि सरकारने त्यांच्याप्रती विविध सुविधा आणि योजना अंमलात आणल्या पाहिजेत.

नैतिकता आणि समान वागणूक जर लक्षात घेतली तर सर्वांना अपंग व्यक्तींप्रती असलेल्या कर्तव्याची जाणीव होईल. माणूस हा समाजप्रिय प्राणी असल्याने सर्व प्रकारच्या व्यक्ती एकत्रच राहत असतात. त्यामध्ये जर आनुवांशिकतेने किंवा अपघाताने कोणालाही अपंगत्व असेल तर इतर नातेवाईकांनी आणि शेजारील लोकांनी मोठ्या मनाने त्याचा स्वीकार करणे गरजेचे आहे.

समाजातील काही निर्बुद्ध लोक अपंग लोकांची थट्टा मस्करी करत असतात. त्यांचा दृष्टिकोन बदलणे गरजेचे आहे. तसेच समाजातील प्रत्येक घटक अपंग व्यक्तींच्या उद्धारासाठी आणि स्वावलंबनासाठी पुढे आला पाहिजे. सरकार त्यासाठी काही न काही तरतूद करतच असते.

अपंग व्यक्ती अनेक प्रकारच्या असू शकतात. सर्वसाधारण व्यक्ती जसा हालचाल आणि कामे करू शकतो त्यापद्धतीने अपंग व्यक्ती करू शकत नाहीत. ज्या प्रकारचे अपंगत्व आहे त्या प्रकारची सहाय्यता देऊ केली पाहिजे. करुणा व दयाभाव दाखवत पुढारी किंवा समाजसेवी संस्थांनी सढळ हाताने मदत केली पाहिजे.

केलेली मदत ही कोणत्याही प्रकारची असू शकते. अपंग व्यक्तीला जमेल असे काम देऊन त्याला अर्थप्राप्ती करण्यास मदत करू शकतो. जो अवयव निकामी झाला आहे त्याचे तंत्रज्ञान विकसित झाले आहे त्या तंत्रज्ञानाचा फायदा करवून देऊ शकतो. आंधळ्या व्यक्तीला नेत्रदान उपलब्ध होऊ शकते. पायाने अपंग व्यक्तीला व्हीलचेअर, बहिऱ्या व्यक्तीस श्रवणयंत्र देऊ शकतो.

व्यवस्थित बरे न होणारे अपंगत्व असल्यास त्या व्यक्तीला अशा सामाजिक संस्थेत भरती करू शकतो ज्या संस्था अपंग व्यक्तींच्या सहाय्यतेसाठी निर्माण झालेल्या असतात. त्यांना सरकारतर्फे अनुदान देखील मिळत असते. संस्थांमध्ये अपंग व्यक्तींची काळजी, सेवा आणि आरोग्य तपासणी वेळेवर होत असते.

अपंग व्यक्तींना सहाय्य करणे म्हणजे त्यांना विविध कामे करण्यास पात्र करणे आणि त्यांच्यातील कौशल्ये विकसित करणे. आज समाजात खूप प्रकारची कामे अशी आहेत ज्यांना अपंग व्यक्ती करू शकतात. त्यांच्यापर्यंत फक्त तशा संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत.

सुधारित समाज किंवा देश आपण तेव्हाच म्हणू शकतो जेव्हा समाजातील एकही घटक स्वतःला हीनदीन समजता कामा नये. प्रत्येक अपंग मनुष्यात स्वाभिमान जागृत झाला पाहिजे आणि स्वकष्टाने त्यांनाही आयुष्य जगता आले पाहिजे. तेव्हाच जागतिक अपंग दिवस साजरा करण्याचे कारण मिळू शकेल.

जागतिक अपंग दिवस निबंध (World Disability Day Marathi Nibandh) वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला निबंध आवडला असल्यास नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा….

Leave a Comment