प्रस्तुत निबंध हा पर्यावरण (Environment Essay in Marathi) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात पर्यावरणाचे महत्त्व आणि गरज स्पष्ट करण्यात आलेली आहे तसेच सद्यस्थितीत पर्यावरण रक्षणासाठी काय उपाय असू शकतील याचे सविस्तर वर्णन या निबंधात केलेले आहे.
पर्यावरण रक्षण – प्रत्येकाची जबाबदारी निबंध | Paryavaran Nibandh Marathi |
आपल्या सभोवताली असलेला निसर्ग, वातावरण आणि सजीव सृष्टीला मिळून आपण पर्यावरण म्हणू शकतो. यामध्ये सर्व झाडे – झुडुपे, मनुष्य आणि इतर पशुपक्षी तसेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंचमहाभुतांचा समावेश होत असतो.
सजीवसृष्टी वर्षानुवर्षे पृथ्वीवर जगत आलेली आहे. त्यामध्ये पर्यावरणाचा खूप मोठा वाटा आहे. स्वच्छ आणि सुंदर पर्यावरण ही बाब मानवी आणि इतर सजीव सृष्टीला जीवन प्रदान करत असते. त्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करणे आणि संतुलन राखणे ही आपली जबाबदारीच आहे.
सध्या मानवनिर्मित समस्या डोके वर काढू लागल्या आहेत. लोकसंख्या वाढ आणि भौतिक सुविधांचा विकास यामुळे मानवाने निसर्गावर आक्रमण केलेले आहे. यामध्ये समस्येचे मूळ न पकडता फक्त जगण्यातील स्पर्धेमुळे नैसर्गिक संसाधने नष्ट करण्यावर मानवाचा भर आहे.
पर्यावरण हानीमुळे आपल्याला प्रदूषण आणि तापमानवाढ अशा भीषण समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्याचा परिणाम म्हणजे मानवी आरोग्य बिघडत चालले आहे. शिवाय इतर प्राणी पक्षी देखील अशा मानवी स्वार्थाचा शिकार बनत आहेत.
पर्यावरण विकासात आपल्याला अगोदर जल, वायु आणि मृदा प्रदूषण या समस्यांकडे गांभीर्याने पाहावे लागेल. वृक्षतोड थांबवून नवीन वृक्ष लागवड करावी लागेल. त्यानंतर स्वच्छ पर्यावरण अबाधित राखण्यासाठी जगण्याची नीतीमूल्ये आपल्याला सर्वप्रथम ठरवावी लागतील.
आपल्या जीवनाचा हेतू हा आराम प्रदान करणारा असावा परंतु आळशी आणि उन्मत्त बनवणारा नसावा. जगण्यातील अनपेक्षित इच्छाच आपल्याला जीवन सुंदर बनू देत नाही. आपण निसर्गप्रेमी न बनता अहंकार आणि स्वार्थ पूर्ण करण्याच्या लालसेने जगत आहोत.
अशा लालसेचा परिणाम म्हणून निसर्गचक्र बिघडत आहे, साथीचे रोग पसरत आहेत तसेच अतिवृष्टी, दुष्काळ यांचाही सामना करावा लागत आहे. यावर उपाययोजना म्हणून मूळ कारणांवर घाव न घालता वरवरचे उपाय योजले जात आहेत ज्यामुळे पर्यावरण आणखीनच बिघडत चाललेले आहे.
आपण स्वच्छ पर्यावरणात अत्यंत आनंदी आणि स्वस्थ अनुभव करत असतो. पर्यावरणाचे नुकसान हे अंतिमतः मानवाचे नुकसान ठरत आहे. मानव हा देखील पर्यावरणाचाच भाग असल्याने त्याची बुद्धी ही पर्यावरण समृद्धीच्या दिशेने चालली पाहिजे.
जगण्यातील सुव्यवस्था आणि सामाजिक नीतिमत्ता निर्माण होण्यासाठी लोकसंख्यावाढ, प्रदूषण आणि वृक्षतोड अशा मूळ समस्यांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्यासाठी शिक्षण, सामाजिक उपक्रम तसेच सरकारी पातळीवर पर्यावरण पूरक काही उपाययोजना राबवल्या गेल्या तर आपण आपल्या सभोवताली एका स्वच्छ आणि सुंदर पर्यावरणाची अपेक्षा करू शकतो.
तुम्हाला पर्यावरण हा मराठी निबंध (Environment Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…