डॉक्टर मराठी निबंध | Doctor Essay In Marathi |

डॉक्टर हे पद अत्यंत महत्त्वाचे आहे. एखादा व्यक्ती जेव्हा डॉक्टर बनतो त्याचे संपूर्ण जीवन रुग्णसेवेत रुजू होत असते. डॉक्टरची जबाबदारी, त्याची कर्तव्ये, उद्देश्य अशा सर्व संकल्पनांचे वर्णन डॉक्टर या निबंधात (Doctor Essay In Marathi) करायचे असते. चला तर मग पाहुयात कसा लिहायचा हा निबंध!

डॉक्टर मराठी निबंध | Doctor Marathi Nibandh |

प्रत्येकाच्या जीवनात कधी ना कधी डॉक्टर महत्त्वाची भूमिका बजावत असतात. आपण आजारी असल्यावर, गंभीर दुखापत झाल्यावर आपल्याला सर्वप्रथम आठवण येते ती म्हणजे डॉक्टरची! डॉक्टर आपल्याला बरे करतीलच असा विश्वास सर्वांनाच असतो.

विज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र यांचा खूप जवळचा संबंध आहे. रसायनशास्त्र आणि तंत्रज्ञान यांचा वापर करून अनेक प्रकारची औषधे, वैद्यकीय वस्तू आणि उपचार मशिन्स बनवल्या जातात. त्यांना योग्य पद्धतीने हाताळणारा आणि रुग्णांना योग्य औषधं देणारा असा एक व्यक्ती म्हणजे डॉक्टर!

समाजातील प्रत्येक स्तरावर प्रत्येक व्यक्तीपर्यंत डॉक्टर कार्यरत असतात. आता तर लोकसंख्या वाढल्याने एकाच डॉक्टरला सर्व उपचार शक्य होत नाहीत. त्यामुळे आजार आणि उपचार यावरून तज्ञ डॉक्टर असणे ही काळाची गरज आहे. त्यावरून हाडांचा, डोळ्यांचा, हृदयाचा, दातांचा, त्वचेचा, कानाचा असे अनेक प्रकारचे डॉक्टर्स असतात.

अनेक वेळा अपघात झाले असताना किंवा शरीराच्या अंतर्गत भागात काही उपचार करायचे असल्यास शस्त्रक्रियेशिवाय पर्याय नसतो. त्यावेळी अनुभवी आणि तज्ञ डॉक्टर आवश्यक असतात. आज तंत्रज्ञानाचा उपयोग करून अनेक असाध्य रोगांवर मात करण्यात यश आलेले आहे. त्यामध्ये डॉक्टरांचे योगदान अत्यंत बहुमोलाचे आहे.

आयुर्वेदिक, होमिओपॅथी आणि रासायनिक अशा अनेक प्रकारच्या उपचारांचा वापर करून डॉक्टर रुग्णांना बरे करू शकतात. पूर्वी डॉक्टरांना वैद्य म्हणून ओळखत असत. मानवी शरीराचे तंत्र आणि क्रियाक्षमता याबद्दल डॉक्टरांना संपूर्ण माहिती असते. त्यामुळे डॉक्टरांचा सल्ला अतिशय महत्त्वपूर्ण ठरतो.

कधी रोगाची साथ पसरली किंवा आपत्कालीन परिस्थिती उद्भवली तर डॉक्टरांना दिवसरात्र मेहनत घ्यावी लागते. डॉक्टर हे असे पद आहे जेथे रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा मानायची असते. मानवी आरोग्य आणि रोगराई निर्मूलन प्रक्रियेत डॉक्टर महत्त्वाची भूमिका बजावतात.

मानवी डॉक्टरसह आता प्राण्यांचे, गुरांचे डॉक्टर्सही असतात. तसेच सरकारी व खासगी डॉक्टर असे वर्गीकरणही झालेले आहे. सरकारी दवाखान्यातील उपचार हे मोफत किंवा अत्यंत अल्प दरात उपलब्ध असतात तर खासगी दवाखान्यात रुग्णांना जास्त सुविधा आणि काळजी पुरवली जाते, त्यामुळे उपचाराचा खर्च जास्त असू शकतो.

वैद्यकीय शिक्षण घेतल्यानंतर लगेच उपचार करणे शक्य नसते कारण वास्तविक रुग्णांचा अनुभव नसतो. त्यामुळे डॉक्टर बनल्यानंतर सर्वप्रथम कोणत्याही व्यक्तीस तज्ञ डॉक्टरच्या हाताखाली काम करावे लागते. त्यानंतर तो स्वतःचा सराव सुरू करू शकतो.

डॉक्टरांचा उद्देश्य हा उदात्त असला पाहिजे. स्वतःच्या स्वार्थापेक्षा त्यांना जनहित जपायचे असते. वैयक्तिक भूमिका न मांडता आणि भावनामय न होता त्यांना योग्य निर्णय घ्यावा लागतो. अनेकवेळा उपचार सुरू असताना त्यांना रुग्णांचा मृत्यूदेखील पाहावा लागतो. त्यामुळे काळजी बरोबरच एक खंबीर ह्रदयही डॉक्टरला जपावे लागते.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला डॉक्टर हा निबंध (Doctor Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment