कोरोना लॉकडाऊन मराठी निबंध | Corona Lockdown Essay In Marathi |

प्रस्तुत लेख हा लॉकडाऊनवर आधारित आहे. कोविड 19 रोगामुळे संपूर्ण जगभरात काही काळ लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. विद्यार्थ्यांना त्याचे संपूर्ण विश्लेषण कोरोना लॉकडाऊन निबंधात (Corona Lockdown Marathi Nibandh) करावयाचे असते. लॉकडाऊनचे फायदे, तोटे, संधी तसेच संदर्भ सांगायचा असतो.

कोरोना लॉकडाऊन मराठी निबंध | Corona Lockdown Essay In Marathi |

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूमुळे कोविड 19 हा रोग पसरलेला आहे. सुरुवातीला या रोगाचे निदान होत नसल्याने 2020 मध्ये सर्वत्र लॉकडाऊन होता. त्याच वर्षाच्या शेवटी लस शोधण्यात आली आणि लॉकडाऊन हळूहळू उठवण्यात आला. अजूनही कोरोना विषाणू नष्ट न झाल्याने अधूनमधून लॉकडाऊन होण्याच्या बातम्या येत असतात.

कोरोना विषाणूमुळे लॉकडाऊन काय असतो हे लोकांना समजले. कोरोना विषाणू हा संसर्गजन्य असल्याने संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात जर दुसरा व्यक्ती आला तर सहज हा रोग पसरतो. त्यामुळे दोन व्यक्तींमध्ये विशिष्ट अंतर ठेवणे गरजेचे होते. त्यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांनी प्रत्येक राज्यात वेगवेगळ्या प्रकारे संचार बंदी लागू केली.

लॉकडाऊन झाले तेव्हा सर्व लोक विचलित मनःस्थितीत होते. घरी संपूर्ण दिवस थांबणे आणि गरजेच्या वस्तूंचा घरपोच पुरवठा होणे असे काही काळ चालू होते. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने डॉक्टर आणि पोलिसांची जबाबदारी खूप वाढली होती. लॉकडाऊन काळात मास्क घालणे आणि नियमित हात धुणे अशा सवयी लावून घ्याव्या लागल्या.

लॉक डाऊनचे फायदे देखील सांगता येतील. लोक घरीच बसून असल्याने त्यांनी नवनवीन पाककृती शिकल्या. नवीन कला अवगत करण्याचा प्रयत्न केला. अनेकांनी योगाभ्यास व व्यायामाला सुरुवात केली. सर्व नातेवाईक आणि कुटुंब एकत्र घरी असल्याने गप्पांचा मेळ जुळून आला.

सर्वात मोठा तोटा सांगता येईल तो म्हणजे मोबाईलचा अतिवापर! वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन क्लास, अशा काही संकल्पना पुढे आल्या. त्यामुळे मोबाईल आणि संगणकाचा वापर वाढू लागला. बहुतांशी लोक वेळेचा दुरुपयोग करू लागले. कित्येक तास मोबाईलवर टाईमपास करू लागले.

लॉकडाऊन असताना काही कृतिशील लोकांनी संधी निर्माण केल्या. मास्क निर्मिती, किराणा माल घरपोच देणे, हात धुण्याचे विविध साबण व रसायने निर्मिती, ऑनलाईन क्लासेस घेणे, रेसिपीज शिकवणे अशा काही गोष्टींतून व्यवसायाच्या संधी शोधण्याचा प्रयत्न केला.

ज्या कंपन्यांची कामे ऑनलाईन होणे शक्य होती त्यांनी घरबसल्या आपल्या कामगारांना लॅपटॉपवर काम करण्यास सांगितले. त्यांचे पगार ऑनलाईन देऊ केले. बॅंकेतून पैसे काढणे आणि भरणे या प्रक्रियेत मात्र नागरिकांना असुविधांचा सामना करावा लागला. काही ठिकाणी विशिष्ट वेळी बाजार आणि किराणा दुकाने चालू ठेवण्यात आली होती.

कोरोना लस शोधल्यापासून नियमित लसीकरण चालू आहे. परंतु कोरोना संपूर्णतः नाहीसा न झाल्याने भविष्यातही लॉकडाऊन होऊ शकतो. अर्थव्यवस्था सुधारण्यास सुरुवात झाली आहे. पुन्हा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये आणि लॉकडाऊन करण्यास सरकारला भाग पडू नये यासाठी नियमित मास्कचा वापर करा. सामाजिक आणि व्यक्तिगत अंतर ठेवून जीवनचर्या चालू ठेवा.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला कोरोना लॉकडाऊन हा निबंध (Corona Lockdown Marathi Nibandh) कसा वाटला त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की आम्हाला कळवा…

2 thoughts on “कोरोना लॉकडाऊन मराठी निबंध | Corona Lockdown Essay In Marathi |”

Leave a Comment