ख्रिसमस (नाताळ) – निबंध मराठी | Christmas Marathi Essay |

प्रस्तुत लेख हा ख्रिसमस – मराठी निबंध (Christmas Essay In Marathi) आहे. या निबंधात ख्रिसमस (नाताळ) सणाविषयी सर्व माहिती देण्यात आलेली आहे. हा सण कसा साजरा केला जातो, या सणाची वैशिष्ट्ये काय आहेत अशा बाबींची चर्चा या निबंधात करण्यात आलेली आहे.

ख्रिसमस / नाताळ निबंध | Christmas (Natal) Marathi Nibandh |

ख्रिसमस या सणाला नाताळ असे देखील संबोधतात. ख्रिश्चन धर्मीय लोक हा सण २५ डिसेंबर ते १ जानेवारी या दिवसांदरम्यान साजरा करतात. प्रभू येशू ख्रिस्त यांचा जन्म २५ डिसेंबर या दिवशी झाला होता अशी मान्यता आहे. या दिनाला ‘ख्रिसमस डे’ किंवा ‘बडा दिन’ असे सुद्धा म्हणतात.

२५ डिसेंबर या शुभदिनी ख्रिश्चन लोक एकमेकांना भेटवस्तू आणि नाताळ दिनाच्या शुभेच्छा देत असतात. त्यासाठी ते आकर्षक शुभेच्छा पत्रांचा वापर करतात. प्रत्येक जण आपापल्या घरी विद्युत प्रकाशाची रोषणाई करत असतो.

‘ख्रिसमस ट्री’ हे या सणाचे प्रमुख वैशिष्ट्य आहे. यामध्ये सूचीपर्णी झाडाला विजेच्या रोषणाईने सजवले जाते. त्यावर भेटवस्तू, भेटकार्ड, तसेच अन्य सजावटीच्या वस्तुदेखील लावल्या जातात. या सणाला सांता क्लॉज म्हणजेच नाताळबाबा रात्री घरोघरी जाऊन भेटवस्तु ठेऊन जातो असा लहान मुलांमध्ये खूपच गोड समज आहे.

येशू ख्रिस्त यांच्या जन्म दिनानिमित्त चर्चमध्ये केल्या जाणाऱ्या उपासनेला खूप महत्त्व आहे. सर्व ख्रिस्ती बांधव चर्चमध्ये जमतात आणि प्रार्थना करतात. या सणाची लगबग आठवडाभर अगोदर केली जाते. त्यामध्ये घर – परिसर स्वच्छता, ख्रिसमस ट्री सजावट, भेटवस्तू खरेदी, गोड – गोड पदार्थ बनवणे अशा काही बाबींचा समावेश असतो.

ख्रिसमस सणाला लहान मुले घरोघरी जाऊन भगवान येशूच्या जन्माची गाणी म्हणतात. अशा गीतांना ‘कॅरोल’ असे म्हटले जाते. म्हणजेच वृक्ष सजावट, भेट वस्तूंचे आदानप्रदान, नाताळ गीते गाणे, आनंद साजरा करणे, चर्चमध्ये उपासना अशा सर्व प्रथा ख्रिश्चन धर्मात स्वतंत्रपणे विकसित झालेल्या आहेत.

येशू ख्रिस्त जन्मापूर्वी पगान संस्कृती अस्तित्वात होती. वृक्ष सजावट, भेटवस्तूंची देवाणघेवाण या गोष्टी त्या संस्कृतीतील सणांमध्ये होत असत. काही काळानंतर पगान संस्कृतीने ख्रिश्चन धर्म स्वीकारला त्यामुळे येशू ख्रिस्ताचा जन्म दिवस आणि पगान संस्कृतीतील सण यांचा एकमेकांशी संदर्भ जोडला गेला.

ख्रिसमस ट्री शिवाय सांता क्लॉज हादेखील या सणाचे वैशिष्ट्य म्हणता येईल. सांता क्लॉज म्हणजे पांढरी दाढी, डोक्यावर लाल टोपी आणि अंगभर लाल रंगाची वस्त्रे परिधान केलेली वृद्ध व्यक्ती असते. लहान मुलांमध्ये त्याचे खूपच आकर्षण असते. सांता क्लॉज आपण नाटकात आणि चित्रपटात देखील पाहिलेला असतो.

भारतातील ख्रिस्ती लोक हे आपापल्या प्रांतानुसार मिठाईचे प्रकार बनवतात. चर्च आणि स्वतःच्या घराची उत्तम प्रकारे सजावट करतात. भारतातील इतर धर्मीय लोक देखील आपल्या ख्रिस्ती बांधवांना शुभेच्छा देतात. अशा प्रकारे ख्रिसमस हा सण भरपूर आनंद, भरपूर भेटवस्तू आणि आयुष्यात खूप सारे सुख – समाधान घेऊन येणारा सण असतो.

तुम्हाला ख्रिसमस / नाताळ हा मराठी निबंध (Christmas Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment