aani kai hav review
Image Credit -The Digital Hash

नवरा बायकोच नातं हे कधी गोड तर कधी तिखट असत. तर कधी अळणी भासत. असच एक नातं आपल्या सर्वांच्या भेटीला येतंय. ते म्हणजे साकेत आणि जुई च.

वरुण नार्वेकर दिग्दर्शित ‘आणि काय हवं…?’ या वेबसिरीजमध्ये अशाच एका तरुण नवरा-बायकोची प्रेमळ गोष्ट पाहायला मिळते. साकेत आणि जुई हे आजच्या काळातील जोडप्याचं प्रतिनिधीत्व करतात. ही अनोखी गोष्ट बघताना आपल्याही चेह-यावर आपसुकच एक हसु तरळुन जातं.

ही गोष्ट आहे साकेत आणि जुईची. लग्नाला दोन वर्ष झालेलं एक क्युट कपल. जुई स्पष्टवक्ती आणि हुशार बायको. तर साकेत हा काहीसा वेंधळा तरीही तितकाच प्रेमळ नवरा. दोघांनी नुकतंच नवं घर घेतलं असतं. घर लावण्यापासुन ते पहिली गाडी घेण्यापर्यंत तसेच लग्नाआधीच्या आपल्या भानगडींबद्दल हे दोघेही मनमोकळ्या गप्पा मारताना सहजच दिसतात.

त्यानंतर पुढे या दोघांच्या लव्हेबल संसारातल्या इवल्याश्या आणि प्रेमळ गोष्टींनी सजलेली ही वेबसिरीज म्हणजे ‘आणि काय हवं…?’. एकुण सहा भागांची असलेली ही वेबसिरीज इतकी रंजक बनवली की, सहा भाग लगेच संपल्यावर ‘अजुन थोडे भाग हवे होते’, ही चुटपुट लागुन राहते. हेच या वेबसिरीजचं यश आहे.


‘मुरांबा’ या मराठी सिनेमाचे दिग्दर्शक वरुण नार्वेकर यांनी ही वेबसिरीज दिग्दर्शित केली आहे. साकेत-जुईच्या सुखी संसारातले इवलेसे क्षण त्यांनी अचुकपणे प्रेक्षकांपर्यंत पोहचवले आहेत. मुळात नवरा-बायकोची गोष्ट जरी असली तरी त्यांनी भांडणाला मुळीच स्थान दिलं नाही. सुरुवातीपासुन शेवटपर्यंत ही वेबसिरीज त्यांनी हॅपनिंग मोडवर ठेवली आहे. प्रत्येक भागातली छोटीशी गोष्ट त्यांनी हलकीफुलकी सजवली आहे.


एम एक्स प्लेयरची ही पहिली मराठी वेबसिरीज आहे. उमेश-प्रिया हे दोघं तब्बल सात वर्षांनी या नव्या माध्यमातुन एकत्र आले आहेत. सहा भागांचीच ही वेबसिरीज असल्याने तुम्ही येता-जाता प्रवासात किंवा फावल्या वेळेत आस्वाद घेऊ शकता. साकेत-जुईची ही गोष्ट पाहुन तुम्ही नक्कीच रिफ्रेश व्हाल, यात शंका नाही.

आंतरराष्ट्रीय कीर्तीचा गायक अॅकाॅन गाणार मराठीत?

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here