प्रस्तुत लेख हा जागतिक पर्यटन दिनाबद्दल (Jagatik Paryatan Din Marathi Nibandh) माहिती देणारा एक मराठी निबंध आहे. जागतिक पर्यटन दिन कधी व कसा साजरा केला जातो आणि त्याचे महत्त्व काय आहे, अशा बाबींचे वर्णन या निबंधात केलेले आहे.
जागतिक पर्यटन दिन – निबंध मराठी | World Tourism Day Essay In Marathi |
पर्यटन आवडत नसेल असा एकही व्यक्ती या भूतलावर सापडणार नाही. सर्वांनाच नवनवीन ठिकाणी जाऊन तेथील निसर्ग सौंदर्य अनुभवणे आणि लोकांचे राहणीमान व संस्कृती जाणून घेणे आवडत असते. अशातच सध्या दळणवळण आणि पर्यटनाची सर्व संसाधने उपलब्ध असल्याने लोक पर्यटन आवडीने करू लागलेत.
लोकांचा पर्यटन अनुभव वाढवणे आणि पर्यटनातून स्थानिक विकास साधणे अशा बाबी शक्य करण्यासाठी सर्वप्रथम लोकांना पर्यटनाचे महत्त्व माहीत असणे गरजेचे आहे. त्यानिमित्ताने पर्यटनाची जाणीव आणखी दृढ होण्यासाठी जागतिक पर्यटन दिन साजरा केला जातो.
संयुक्त राष्ट्राच्या जागतिक पर्यटन संस्थेची स्थापना २७ सप्टेंबर १९७० रोजी झाली होती. त्यामुळे २७ सप्टेंबर हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक पर्यटन दिन (World Tourism Day) म्हणून साजरा केला जातो. २७ सप्टेंबर १९८० रोजी पहिला जागतिक पर्यटन दिवस साजरा केला गेला.
प्रत्येक वर्षी जागतिक स्तरावर पर्यटनविषयक एक रूपरेखा (Theme) ठरवली जाते. त्यानिमित्ताने एक प्रमुख उद्दिष्ट समोर ठेवून वर्षभर एक योजना आखली जाते. त्या योजनेनुसार प्रत्येक देशाचे सरकार पर्यटनविषयक कृती अंमलात आणते.
“शाश्वत पर्यटन – विकासाचे साधन”, “पर्यटन आणि ग्रामीण विकास”, “पर्यटन आणि डिजिटल परिवर्तन”, “पर्यटन आणि समुदाय विकास” अशा काही मागील वर्षांतील रूपरेखा आहेत. २०२२ साली “पर्यटनाचा पुनर्विचार” अशी रूपरेखा जाहीर केलेली आहे.
प्रत्येक वर्षी जागतिक पर्यटन दिन हा संयुक्त राष्ट्र संघटनेच्या वतीने एखाद्या देशात विशिष्ट ठिकाणी साजरा केला जातो. सोशल मीडिया व विविध प्रसार माध्यमांचा उपयोग करून पर्यटन दिनाचे संदेश व चलचित्र प्रसारित करून जागतिक स्तरावर त्याची जाहिरात केली जाते.
पर्यटन दिन साजरा करण्याचे नियोजन पर्यटन संस्थांतर्फे केले जाते. त्यानिमित्ताने मोठमोठे फलक जागोजागी लावले जातात. लोकांना विशिष्ट माफक दरात पर्यटन करवले जाते. पर्यटनविषयक जाहिरात पत्रके सर्वत्र वाटली जातात. जनमानसांत पर्यटनाची आवड निर्माण करण्याचा प्रयत्न पर्यटन दिनी केला जातो.
पर्यटन क्षेत्र आता व्यापक क्षेत्र बनलेले आहे. देश – विदेशात पर्यटनविषयक शिक्षण देखील सुरू झालेले आहे. पर्यटन संस्था, पर्यटन स्थळे मोठ्या प्रमाणात विकास करत आहेत. अशा सर्व बाबी ह्या माहिती स्वरूपात जागतिक पर्यटन दिनी प्रसारित केल्या जातात.
आजच्या काळात प्रवास हा एकदम सुखकर झाल्याने आपण जगातील कोणत्याही देशात सहज पोहचू शकतो. परिणामी पर्यटन व्यवसाय व व्यवस्थापन अत्यंत वाढीस लागलेले आहे. त्यामुळे उत्तम कारकिर्दीच्या संधी प्रत्येकालाच खुणावत आहेत. अशा वाढलेल्या पर्यटनाचे महत्त्व आपल्याला जागतिक पर्यटन दिनी पटवून दिले जाते.
तुम्हाला जागतिक पर्यटन दिन हा मराठी निबंध (Jagatik Paryatan Din Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…