प्रस्तुत लेख हा प्रयत्नांती परमेश्वर (Prayatnanti Parameshwar Nibandh) या उक्तीवर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात प्रयत्न कसे असावेत असा आशय व्यक्त केला आहे आणि प्रयत्नांचे महत्त्व सांगण्यात आलेले आहे.
प्रयत्नांती परमेश्वर – मराठी निबंध
ज्या व्यक्ती योग्य ध्येय ठेवून जीवनाची वाटचाल करतात आणि त्यासोबतच स्वतःच्या प्रामाणिक प्रयत्नांना महत्त्व देतात अशा व्यक्ती खऱ्या अर्थाने यशस्वी होतात. त्यांच्या प्रयत्नांना अपयश मिळतच नाही कारण असे प्रयत्न हे उदात्त जाणीव आणि जागरूकता ठेवून केलेले असतात.
मनुष्य जीवन हे कर्म आणि त्याचे परिणाम यांचा एक खेळ आहे. आपल्याला हवे असणारे परिणाम घडवून आणण्यासाठी योग्य ते कर्म करावे लागते. त्या कर्मांची यशस्वी साध्यता आपल्याला फक्त आणि फक्त प्रयत्नांनी होत असते. त्यामुळे मनुष्याला जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रयत्न खूप आवश्यक ठरतात.
प्रयत्न योग्य दिशेने केल्यास यश मिळते हे सत्य आहे परंतु प्रयत्न करत असताना आपले ध्यान नेहमी परिणामांवर असते. त्यामुळेच आपले प्रयत्न अपुरे पडतात आणि अपयशाचा सामना करावा लागतो. अपवाद म्हणून जर यश मिळालेच तर ते कायम टिकत नाही किंवा अशा यशातून आनंद मिळत नाही.
काल्पनिक परिणाम अगोदरच ठरवणे घातक ठरू शकते. आपण जेव्हा एखादी कृती करण्याचे ठरवतो तेव्हा ती कृती ही फक्त चंचल इच्छा आहे की त्यामध्ये स्वतःचे आणि इतरांचे हित देखील आहे याचा सारासार विचार होणे गरजेचे आहे. म्हणजेच आपण जर विचारपूर्वक निर्णय घेतला नसेल तर निष्काम प्रयत्न होऊ शकत नाहीत.
निष्काम आणि मानवी हिताचे कर्म जर घडले नाही तर त्याचा परिणाम म्हणून दुःखच वाट्याला येते. तेव्हा स्वतःची समज आणि कर्म चुकीचे आहेत असे आपण मान्य करत नाही आणि नंतर नशिबाला किंवा देवाला दोष देत बसतो. त्यामुळे आपण फक्त ध्येयावर दृष्टी न ठेवता योग्य प्रयत्नांवर ध्यान दिले तर योग्य ते फळ आपल्याला प्राप्त होतेच.
प्रयत्नांती परमेश्वर म्हणजे आपण फक्त पूर्ण क्षमतेने प्रयत्न करणे आणि त्याचा परिणाम परम शक्तीवर सोडून देणे. असे केल्याने आपण आपल्या कामात सातत्य आणि उत्साह कायम ठेवू शकतो. त्याशिवाय प्रामाणिकपणा, कष्टाळू वृत्ती आणि नेतृत्व असे गुण आपोआप विकसित होत जातात.
आपण परिणामांवर लक्ष दिल्यास आपले प्रयत्न, उत्साह आणि कामातील आनंद कमी होत जातो. कृतीमध्ये काहीही नावीन्य राहत नाही किंबहुना आपण नावीन्य आणण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे सर्वप्रथम परिणाम प्राप्त होण्यासाठी आपण जेवढ्या क्षमतेने प्रयत्न केलेले असतात तेवढीच क्षमता कायम राखली जात नाही.
चांगल्या जीवनासाठी प्रयत्न करत राहणे आणि परिणामाची चिंता न करणे, असे केल्याने आपले कर्म हे उदात्त बनत जाते. अशावेळी कोणतेही कर्म आपण स्वतःचा स्वार्थ आणि अहंकार पूर्ण करण्यासाठी करत नाही. मग आपल्या जीवनात चिंता, क्रोध, ईर्ष्या अशा गोष्टी डोकावत नाहीत.
मानवी जीवनात ज्या शक्यता आहेत त्या प्राप्त होणे गरजेचे आहेच त्याशिवाय खरा आनंद आणि समाधान अनुभवता येत नाही. त्यामुळे प्रयत्नांती परमेश्वर असा भाव ठेवल्याने जीवनातील शक्यता हळूहळू पूर्णत्वास येऊ लागतात. आपले कर्म आणि प्रयत्न हे दिवसेंदिवस निष्काम आणि शुध्द बनत जातात.
तुम्हाला प्रयत्नांती परमेश्वर हा मराठी निबंध (Prayatnanti Parameshwar Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…