झाडे बोलू लागली तर – मराठी निबंध | Zade Bolu Lagli Tar Nibandh

प्रस्तुत लेख हा झाडे बोलू लागली तर (Zade Bolu Lagli Tar Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. माणूस जसा बोलतो, एकमेकांशी संवाद साधतो तसेच जर झाडे देखील बोलू लागली तर… अशा कल्पनेचा विस्तार या निबंधात करायचा असतो.

झाडे बोलू लागली तर…

मी सुट्टी दिवशी बागेत फिरायला गेलो होतो. तेथे जवळजवळ दोन तास व्यतित केल्यानंतर तेथील झाडांच्या सानिध्यात आणि निसर्गरम्य वातावरणात मला खूप प्रसन्न वाटत होते. अशा प्रसन्नतेत मी एकटाच झाडांशी संवाद साधू लागलो. त्याचवेळी माझ्या मनात एक विचार आला की झाडे सुद्धा बोलू लागली तर…

झाडे बोलू लागली तर आपल्या आसपास एक संवादाचे माध्यम निर्माण होईल. माणूस आणि झाडे एकमेकांशी बोलू शकतील. झाडे जेव्हा लहान असतील तेव्हा ते देखील भाषा शिकण्याचा प्रयत्न करतील आणि जसजशी मोठी होतील तशी अस्खलितपणे सर्वांशी संवाद साधू शकतील.

झाडे बोलू लागली तर त्यांच्या जीवनात भावना आणि विचार निर्माण होतील. त्यांचा आनंद आणि व्यथा ते व्यक्त करू शकतील. मनुष्याप्रमाणे झाडांची देखील स्मृती तयार होईल आणि शब्दांचे एक जाळे तयार होईल ज्याद्वारे ते आपापसांत रोजच्या घटनांबद्दल चर्चा करू लागतील.

झाडे बोलू लागली तर त्यांचा विकास हा थोड्या वेगळ्या प्रकारे होऊ शकेल. त्यांच्या जीवनात भाषा आणि तर्क आल्याने त्यांना सुरक्षेची भावना देखील निर्माण होईल. मनुष्य किंवा इतर प्राण्यांपासून संरक्षणासाठी विशिष्ट प्रकारची शारिरीक संरचना झाडांमध्ये निर्माण होईल.

भावना आणि विचार निर्माण झाल्याने झाडे विशिष्ट प्रकारे जगण्याचा प्रयत्न करतील. झाडांची स्वतःची अशी एक वेगळी प्रतिमा तयार होईल. झाडे सुद्धा वादविवाद करतील आणि आनंदही साजरा करतील. त्यामुळे कदाचित वैयक्तिक पातळीवर ते निसर्गापासून स्वतःला वेगळे मानू लागतील.

झाडे बोलू लागली तर एका अर्थाने नैसर्गिक चक्र आणि पर्यावरण यांमध्ये बाधा निर्माण होईल. मनुष्य, पशुपक्षी आणि इतर सजीवसृष्टी यांच्या जीवनासाठी ज्या वातावरणाची गरज असते त्याची निर्मिती होणार नाही. तसेच झाडांच्या स्वतःच्या जीवनातच खूप सारे कलह आणि समस्या निर्माण होतील.

मनुष्य हा विचारशील प्राणी असल्याने व सातत्याने बोलत असल्याने त्याला जीवनात खूप साऱ्या मानसिक समस्यांचा सामना करावा लागतो. त्याचप्रमाणे झाडे देखील विचारशील बनतील आणि स्वतःचे मूळ अस्तित्व विसरून फक्त विचारांत अडकतील आणि आयुष्यभर फक्त बोलत राहतील.

झाडे बोलू लागली तर इतर सजीव प्राण्यांपासून झाडांचे संरक्षण होऊ शकेल मात्र पर्यावरणाचे संतुलन राहणार नाही. सुरक्षेच्या दृष्टीने सर्व झाडे ही पक्षी, कीटक व प्राणी यांना जवळ येऊ देणार नाहीत. निसर्गात सतत एक कोलाहल माजेल आणि मनुष्य सुध्दा स्वतः झाडांपासून दूर – दूर राहू लागेल.

प्रत्येक सजीवाचा विकास हा वेगवेगळ्या पद्धतीने होत असल्याने झाडे बोलू लागणे हे वास्तविकतः निसर्गात बाधा निर्माण करू शकेल. निसर्गात सर्व काही व्यवस्थित निर्मित झालेलेच आहे आणि सर्व काही एकमेकांवर अवलंबून देखील आहे. त्यामुळे “झाडे बोलू लागली तर” अशा माझ्या कल्पनेला मी पूर्णविरामच दिला.

तुम्हाला झाडे बोलू लागली तर हा मराठी निबंध (Zade Bolu Lagli Tar Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment