शाळेतील दिवस सर्वांनाच आठवतात. प्रत्येकाला सुरुवातीला जरी शाळा नावडती असली तरी काही दिवसांनी तिचा लळा लागतोच. शाळा नसती तर असा विचार जरी मनात आला तरी अवघड प्रश्न उभे राहतात. याच विषयाचा विद्यार्थ्यांनी कल्पनाविस्तार करून शाळा नसती तर हा निबंध (Shala Nasti Tar Marathi Nibandh) लिहायचा असतो.
शाळा नसती तर… | Shala Nasti Tar Essay In Marathi |
कोरोना काळात सध्या शाळेला सुट्टी होती. त्यानंतर ऑनलाईन क्लासेस सुद्धा चालू झालेले आहेत. जेव्हा नियमित शाळा असते तेव्हा धकाधकीचे वेळापत्रक आणि खूप सारा अभ्यास करावा लागतो. अशी परिस्थिती पाहता अचानक मनात विचार डोकावून गेला की शाळा नसती तर…
शाळा नसण्याची कल्पनाच किती रंजक आहे. दिवसभर सुट्टी, खेळ आणि फक्त खेळ! अभ्यासच नसणार, शिक्षकही नसणार, सकाळी लवकर उठणे नाही, आई बाबांचा अभ्यासाच्या नावाने ओरडा नाही. असे सर्व काही विचार केल्यावर मला तर गुदगुल्याच होऊ लागल्या.
दिवसभर फिरणे आणि फक्त गप्पागोष्टी! पोहणे, सायकल चालवणे, क्रिकेट आणि टीव्ही, अशी सर्व मौज मजा करण्यातच दिवस निघून जाईल. खाणे, झोपणे आणि मज्जा करणे अशीच सर्वांची दिनचर्या होऊन जाईल. परंतु त्याचे परिणाम कसे असतील हेदेखील आपण जाणून घेतले पाहिजे.
सामाजिक स्थिरतेसाठी एक व्यवस्था निर्माण करायची असते ज्यामुळे सर्व व्यक्ती स्वतःला काहीतरी ओळखू शकतील. शिक्षणातून आपण सुजाण आणि शिक्षित पिढी तयार करत असतो ज्यामुळे व्यक्ती, कुटुंब आणि पर्यायाने समाजाचा विकास होत असतो. शाळा ही सर्वात प्राथमिक पायरी आहे ज्यातून व्यक्ती स्वतःला शिक्षणाची ओळख देऊ लागतो.
मुलांची जडणघडण होण्यासाठी शाळा असते. तेथे मुलाला भाषा आणि आवश्यक ते विषय शिकवले जातात ज्यातून मनुष्य स्वतःचा चांगला विचार करून जीवन चांगले बनवण्याची सुरुवात करत असतो. अभ्यास करणे आणि विषय समजून घेणे म्हणजेच हळूहळू जीवन आणि स्वभाव समजून घेण्यासारखे असते.
पालक सर्व वेळ मुलांकडे लक्ष देऊ शकत नाहीत. त्यातच आजची स्थिती पाहता तर आई वडील दोघेही काम करत असतात. त्यामुळे एक असे ठिकाण जेथे सर्व लहानपणीचे संस्कार होऊ शकतील ते असलेच पाहिजे. शाळा विकसित आणि प्रगल्भ असलीच पाहिजे. शाळा नसेल तर पुढची पिढी नैतिकता आणि मानवतावादी घडणारच नाही.
मुलांसाठी फक्त मज्जा करणे हेच डोक्यात असते. परंतु भविष्याचा विचार केल्यास तशी मज्जा आयुष्यभर करता येत नाही. त्यामुळे आयुष्याच्या जबाबदाऱ्या लक्षात घेता शाळा आवश्यक आहेच शिवाय ती एक अशी व्यवस्था आहे ज्यातून शिस्त आणि प्रामाणिकपणा अंगी बाणवला जातो.
शाळा नसती तर भाषांचे ज्ञान झाले नसते. संवाद आणि चर्चेचे महत्त्व कळाले नसते. गणिती आणि वैज्ञानिक संकल्पना समजल्या नसत्या. आजचे सर्व तंत्रज्ञान विकसित झाले नसते. मानवी विकास आणि सामाजिक बदल यामध्ये जर सातत्य राखायचे असेल तर शाळा नसून चालणार नाही.
शाळा नसेल तर मुलांचे नवनवीन मित्र बनणार नाहीत. त्यांना शिक्षकांचे मार्गदर्शन लाभणार नाही. ते स्वतःच्या परिकल्पनेत हरवून जातील. त्यांच्या कलागुणांचा विकास होणारच नाहीत. त्यामुळे एकंदर विचार केल्यावर कळेल की शाळा नसण्याचा फायदा हा फक्त क्षणिक आहे पण नुकसानच जास्त आहे.
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला शाळा नसती तर हा मराठी निबंध (Shala Nasti Tar Marathi Nibandh) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…