महात्मा जोतीराव गोविंदराव फुले हे एक महान लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाबद्दल माहिती होण्यासाठी महात्मा जोतीराव फुले हा निबंध (Mahatma Jotirao Phule Marathi Nibandh) लिहावा लागतो.
महात्मा जोतीराव फुले मराठी निबंध | Mahatma Jotirao Phule Essay In Marathi
महात्मा फुले यांचे संपूर्ण नाव जोतीराव गोविंदराव फुले असे होते. त्यांचा जन्म ११ एप्रिल १८२७ रोजी साताऱ्यातील कटगुण या ठिकाणी झाला. त्यांनी संपूर्ण आयुष्य समाजसेवी कार्य करण्यात व्यतित केले. शेतकरी, अस्पृश्य, आणि बहुजन समाज यांच्या हितासाठी ते नेहमी झटत राहिले.
महात्मा फुले यांच्या वडिलांचे नाव गोविंदराव शेरीबा फुले तर आईचे नाव चिमणाबाई फुले असे होते. त्यांच्या पत्नी म्हणजे पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले होत्या. सावित्रीबाई फुले यांना स्वतः शिक्षित करून त्यांनी पुण्यात मुलींची पहिली शाळा स्थापन केली.
जोतीराव लहान असताना त्यांच्या आईचे निधन झाले. त्यांचा विवाह वयाच्या तेराव्या वर्षी सावित्रीबाई यांच्याशी झाला. महात्मा फुले यांचे माध्यमिक शिक्षण स्कॉटिश मिशन हायस्कूलमध्ये झाले. शालेय जीवनात अतिशय तल्लख बुद्धीचा विद्यार्थी म्हणून त्यांची ओळख होती.
समाजातील कटुता आणि विषमता यासाठी अज्ञान जबाबदार आहे याची जाण ठेऊन त्यांनी स्त्रिया आणि बहुजन लोक शिकले पाहिजेत यासाठी प्रयत्न सुरू केले. मुलींनी देखील शिकले पाहिजे तरच खऱ्या अर्थाने कुटुंबाचा, समाजाचा विकास शक्य आहे असे त्यांना मनोमन वाटत असे.
महात्मा फुले यांनी पत्नी सावित्रीबाई यांना शिक्षण देऊन इ.स.१८४८ साली पुण्यात महाराष्ट्रातील मुलींची पहिली शाळा स्थापन केली. तेथे शिकवण्याची जबाबदारी पत्नी सावित्रीबाई फुले यांच्यावर सोपवली. त्यानंतर अस्पृश्यांसाठी देखील शाळा स्थापन केली.
महात्मा फुले यांनी आपल्या सहकारी व अनुयायांसह “सत्यशोधक समाज” ही संस्था १८७३ साली स्थापन केली. समाजातील पिडीत लोकांना न्याय मिळवून देणे आणि जातीभेद, अस्पृश्यता नष्ट करून शिक्षणातून उदात्त समाज घडवणे असा महान हेतू या संस्थेचा होता.
महात्मा फुले यांचे लिखाण आणि वाचन प्रगाढ होते. त्यांचे “शेतकऱ्यांचा आसूड”, “सार्वजनिक सत्यधर्म” आणि “गुलामगिरी” हे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लिखाणावरून ते किती थोर विचारवंत आणि लेखक होते हे कळून येते.
इ.स. १८८८ साली मुंबईत जनतेने रावबहादुर वंडेकर यांच्या हस्ते सत्कार करून त्यांना ‘महात्मा’ ही पदवी प्रदान केली. त्यानंतर दोन वर्षांनी म्हणजे २८ नोव्हेंबर १८९० रोजी या महान विचारवंत आणि सत्यशोधकाचे पुणे येथे निधन झाले. महात्मा फुले यांचे कार्य अफाट होतेच त्यामुळे संपूर्ण समाजात ते सत्याधिष्ठीत जीवनाची उमेद निर्माण करू शकले.
संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला महात्मा जोतीराव फुले (Mahatma Jotirao Phule Marathi Nibandh) हा निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…