माझे आवडते फळ – आंबा | मराठी निबंध | Mango Essay In Marathi

निसर्गात उपलब्ध असलेली विविध फळे सर्वांचीच आवडती असतील असे नाही परंतु आंबा हे फळ मात्र त्याला अपवाद आहे. आंबा सर्वांनाच आवडतो. शाळेतील विद्यार्थ्यांना माझे आवडते फळ हा निबंध लिहावा लागतो. त्यानुसार माझे आवडते फळ आंबा (Mango Essay In Marathi) या विषयावर निबंधलेखन कसे करायचे ते आपण पाहुयात.

माझे आवडते फळ – आंबा | My Favourite Fruit Mango Essay In Marathi

फलाहार हा आरोग्याच्या दृष्टीने एकदम सुयोग्य असा आहार आहे. मनुष्याला फळे आवडतातच. विविध ऋतुंमध्ये उपलब्ध होणारी सर्व फळे हा निसर्गाचा चमत्कारच आहे. त्यामध्ये ऐन उन्हाळ्यात आणि पावसाळ्याच्या सुरुवातीपर्यंत उपलब्ध असणारे आंबा हे फळ माझे आवडते फळ आहे.

आंबा कच्चा असताना बाहेरून हिरवा आणि आतून पांढरा असतो. पिकल्यावर त्याचा रंग आतून आणि बाहेरून पिवळसर केशरी बनत जातो. काही आंब्याच्या जाती पिकल्यावर देखील बाहेरून हिरव्या असतात. फळाच्या मध्यभागी आंब्याची बि असते, तिला सर्वजण “कोय” म्हणून संबोधतात.

आंबा हे अतिशय गोड फळ आहे. कच्चे असताना मात्र ते आंबट-गोड चवीचे असते. आंबा हा फळांचा राजा म्हणून ओळखला जातो तसेच भारताचे राष्ट्रीय फळ म्हणून देखील आंब्याला मान्यता आहे. भारतात अनेक प्रकारचे आंबे आढळतात. भारत हा आंब्याची निर्यात देखील करतो. “हापूस” ही आंब्याची प्रजाती तर जगप्रसिद्ध आहे.

आंब्याच्या झाडाला हिवाळा संपताना मोहोर यायला सुरुवात होते. त्यानंतर एप्रिल – मे महिन्यात आंबा कच्च्या स्वरूपात झाडाला लटकलेले दिसतात. मे महिन्यात आंब्याला पाड लागतो. पाड लागल्यानंतर आंबा पिकण्यासाठी तयार झालेला असतो.

ज्यांनी आंब्याची लागवड केलेली असते ते लोक पाड लागल्यानंतर झाडावरील सर्व आंबा उतरवतात आणि व्यवस्थित साठवून ठेवतात. पिकल्यानंतर तोच आंबा विक्रीसाठी घेऊन जातात. सर्व लोक आवर्जून उन्हाळयात आंबे विकत घेतात आणि खातात.

आंब्यामध्ये सर्व पौष्टिक घटकांचा समावेश असतो. विशेषतः जीवनसत्त्व अ, क आणि ड यांचे भरपूर प्रमाण आंब्यात असते. जीवनसत्त्वाच्या कमतरतेमुळे जर कोणता आजार जडला असेल तर त्यामध्ये आंबा हे फळ अतिशय गुणकारी आहे. आंब्यामुळे त्वचा, डोळे आणि हाडांचे आरोग्य सुधारते.

आंबा कच्चा असताना त्याचे लोणचे आणि मुरांबा बनवला जातो. तसेच कैरीचे पन्हे हे पेयदेखील प्रसिध्द आहे. पिकलेल्या आंब्यापासून आमरस बनवून पिला जातो. बाजारात काही पेय कंपन्या निर्माण झालेल्या आहेत जे आमरस बनवून त्यांची साठवणूक करतात आणि वर्षभर त्याची विक्री करतात.

आंब्याचे अतिसेवन टाळावे. आंबा हे स्वभावाने गरम फळ आहे. त्यामुळे शरीरातील उष्णता वाढू शकते त्यासाठी थोडी काळजी घेऊनच प्रमाणात त्याचे सेवन करावे. भारतात तरी असा एकही व्यक्ती नसेल ज्याने कधी आंबा खाल्ला नाही. अतिशय मधुर, स्वादिष्ट आणि रसाळ असलेले आंबा हे फळ माझे आवडते फळ आहे.

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला माझे आवडते फळ आंबा (Mango Essay In Marathi) हा निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment