अभ्यासाचे महत्त्व – मराठी निबंध | Importance of Study Essay In Marathi |

अभ्यास का करावा लागतो, याबद्दल विद्यार्थ्यांना ज्ञान असणे आवश्यक आहे. अभ्यासाचे महत्त्व, फायदे आणि संदर्भ कळून येण्यासाठी अभ्यासाचे महत्त्व हा निबंध (Importance Of Study Essay In Marathi) विद्यार्थ्यांना लिहावा लागतो. प्रस्तुत निबंधात अभ्यासाविषयी विविध मुद्दे व्यवस्थित विश्लेषण करून मांडण्यात आलेले आहेत.

अभ्यास मराठी निबंध | Abhyas Marathi Nibandh |

अभ्यास म्हणजे काय! याचे उत्तर फक्त शाळेतच मिळते असे नाही तर शाळेपासून फक्त त्याची सुरुवात होते. शिक्षण, करिअर, आणि नातेसंबंध या सर्वांमध्ये आणि जगत असलेल्या प्रत्येक क्षणामध्ये अभ्यासच असतो. प्रत्येक क्षणाचा चांगला किंवा वाईट अनुभव हा आपल्याला अभ्यासायचा असतो.

प्रत्येक अनुभव अभ्यासून त्याचे तर्कयुक्त विश्लेषण करायचे असते. त्यानुसार आयुष्यात पुढचे पाऊल ठेवायचे असते. त्याची सुरुवात मात्र अगदी लहान वयात असताना अभ्यासापासून होत असते. बुद्धीने प्रश्न नीट समजून घेणे आणि त्याचे समर्पक उत्तर लिहणे अपेक्षित असते. त्यासाठी संयमाची आणि शिस्तीची आवश्यकता असते.

प्रत्येकाचे कर्मच त्याचे भविष्य निर्धारित करत असते. अभ्यास करणे हे देखील कर्मच आहे. अभ्यासातून आपण जीवन आणि त्याची उपयुक्तता समजून घेण्याचा प्रयत्न करतो. ज्ञान मिळवत असतो. ज्ञान मिळाले की दुःखी राहण्याचा प्रश्नच उरत नाही. आयुष्यात दुःख असण्याचे कारणच अज्ञान आहे.

जीवन चालवण्यासाठी आणि उत्तम जीवन जगण्यासाठी अर्थार्जन करणे आवश्यक आहे. त्यासाठी योग्य करिअर करणे गरजेचे आहे. त्या करिअरची दिशा आपल्याला अभ्यासातून कळते. आज कॉम्प्युटर, विविध मशिन्स आणि तंत्रज्ञान या सर्वांचाच विकास झाला आहे. ते व्यवस्थित हाताळण्यास शिक्षण आणि अभ्यासाची गरज आहेच की!

शाळेत असताना अभ्यास करणे आणि परीक्षा देणे असा प्रकार असतो. परीक्षा आवश्यक आहेतच कारण केलेल्या अभ्यासाची पोचपावती म्हणून परीक्षेचा निकाल असतो. त्यावरून खूप वेळा असे समजते की कोण किती हुशार आहे. हुशार असण्याचा अर्थ असा नाही की नुसते पाठांतर करून परीक्षा देणे.

परीक्षा ही सर्वांगीण असली पाहिजे. खेळ, कला, क्रीडा, शिक्षण अशा विविध दिशांचा शोध त्यामार्फत घेतला गेला पाहिजे. हा शोध विद्यार्थी अभ्यास करूनच घेऊ शकतात. अभ्यास म्हणजे कोणताही विषय बुद्धीने आकलन करून घेणे, कोणतीही गोष्ट अनुभवातून समजून घेणे किंवा बिना अनुभवाची लक्षात ठेवणे.

कोणताही व्यक्ती स्वतःच्या कामाचा पर्यायाने नात्यांचा तसेच जीवनाचा अभ्यास करू शकतो. प्राथमिक सुरुवात मात्र शिक्षणाने होत असते. शिकण्याची पद्धत, जी शिक्षण क्षेत्रात वापरली जाते त्याचाच उपयोग आपल्याला वास्तविक जीवनात करायचा असतो. नाहीतर फक्त भौतिक सुखाच्या शोधात जीवनात विषाद निर्माण होईल.

अभ्यासातून मनुष्यात संयम, नैतिकता, सातत्य, शिस्त असे गुण जोपासले जातात. संघर्ष करायची हिम्मत येते. परीक्षा म्हणजे छोटा संघर्षच असतो. तो संघर्ष अभ्यास करून पार केला की आणखी अभ्यास करण्याची उमेद वाढते. वास्तविक जीवनदेखील संघर्षाचे रूपच असते. त्यामुळे एकदम उदात्त आणि उन्नत आयुष्य जगण्यासाठी अभ्यास करायलाच हवा, नाही का?

संपूर्ण निबंध वाचल्याबद्दल धन्यवाद! तुम्हाला अभ्यासाचे महत्त्व हा निबंध (Importance of Study Marathi Essay) कसा वाटला त्याबद्दल तुमचा अभिप्राय नक्की कळवा…

Leave a Comment