प्रस्तुत लेख हा शिवजयंती (Shivjayanti Marathi Nibandh) या विषयावर आधारित मराठी निबंध आहे. या निबंधात शिवजयंतीचा इतिहास आणि ती कशी साजरी केली जाते याचे विस्तृत वर्णन करण्यात आलेले आहे.
शिवजयंती उत्सव – निबंध | Shivjayanti Essay In Marathi
शिवजयंती ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक मोठा उत्सव असतो. प्रत्येक वर्षी १९ फेब्रुवारी या दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. शिवजयंती हा दिवस म्हणजे छ्त्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिन होय. या दिवशी प्रत्येकजण आपापल्या परीने शिवरायांना मानवंदना देत असतो.
छत्रपती शिवराय हे महाराष्ट्रासाठी तसेच संपूर्ण भारत देशासाठी प्रेरणास्रोत आहेत त्यामुळे शिवजयंतीचे महत्त्व अपार आहे. या दिवशी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून सार्वजनिक मिरवणूक काढली जाते. सांस्कृतिक कलापथके त्यांच्या कलेमार्फत शिवाजी महाराजांचा जीवनपट उलगडून सांगतात.
महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले जातात. त्यामध्ये नृत्य, संगीत, वादन आणि अभिनय अशा विविध कलांचे सादरीकरण होत असते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील महत्त्वाचे प्रसंग आणि घटना यांचे वर्णन केले जाते.
शिवाजी महाराजांचा जन्म शिवनेरी गडावर १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाला. त्यांच्या जन्म तारखेबद्दल पूर्वी खूप वाद होते. आजही महाराष्ट्रात वैशाख शुद्ध तृतीया (६ एप्रिल १६२७) आणि मराठी पंचांगा प्रमाणे फाल्गुन वद्य तृतीया (१९ फेब्रुवारी १६३०) हे दोन दिवस शिवरायांचे जन्मदिवस म्हणून मानले जातात.
महाराष्ट्र सरकारने २००१ मध्ये या वादावर निर्णय घेत फाल्गुन वद्य तृतीया शके १५५१ (शुक्रवार, १९ फेब्रुवारी १६३०) ही छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मतारीख स्वीकारली. सर्व शाळा, महाविद्यालये, कार्यालये आणि उद्योगांना या दिवशी सुट्टी असते.
रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी इ. स. १८६९ साली महात्मा जोतीराव फुले यांनी शोधून काढली व त्यांच्या जीवनावर एक पोवाडा लिहिला. शिवाजी महाराजांचे कर्तुत्व आणि नेतृत्व कसे होते हे लोकांपर्यंत पोहचवण्याचे सर्वप्रथम काम महात्मा जोतीराव फुले यांनी १८७० साली शिवजयंती साजरी करून केले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मदिवस म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आनंदाचा क्षण असतो. त्यामुळे या दिवसाला शिवजन्मोत्सव असेही म्हटले जाते. शिवजयंती साजरी करण्यामागे एक महान उद्देश्य आणि संकल्पना असल्याने प्रत्येकजण या दिवशी शिवाजी महाराजांच्या महान कर्तुत्वाने प्रेरित होत असतो.
शिवाजी महाराज हे एक थोर महापुरुष होते. त्यांचे विचार, त्यांचे कर्तृत्व, स्वराज्य स्थापना तसेच राज्य कारभार असे सर्व प्रकारचे बोध समाजमनाला होण्यासाठी शिवजयंती प्रत्येक वर्षी मोठ्या प्रमाणावर समाजातील सर्व स्तरांतील लोकांकडून साजरी केली जात असते.
तुम्हाला शिवजयंती हा मराठी निबंध (Shivjayanti Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…