माझे आवडते फूल – कमळ! मराठी निबंध | Lotus Flower Essay in Marathi |

प्रत्येक व्यक्तीचे कोणते ना कोणते आवडते फुल असतेच! कमळ हे देखील अनेकांचे आवडते फूल आहे. त्या फुलाविषयी संपूर्ण माहिती होण्याकरिता विद्यार्थ्यांना माझे आवडते फूल – कमळ हा मराठी निबंध (Lotus Flower Essay in Marathi) लिहावा लागतो. चला तर मग पाहुयात, कसा लिहायचा हा निबंध!

कमळ मराठी निबंध | My Favourite Flower – Lotus Essay In Marathi |

संपूर्ण जगभरात फुलांचे अस्तित्व विविधरंगी आहे. फुलांचा रंग, सुगंध आणि स्पर्श सर्वांना हवाहवासा वाटत असल्याने सर्वच फुले आपल्याला आकर्षक आणि अप्रतिम भासतात. परंतु इतर सर्व फुलांपैकी कमळ हे फूल मला जास्त आवडते.

लहानपणी आमच्या घराजवळ एक छोटे तळे होते त्यामध्ये कमळाची फुले सतत येत असत. त्यांच्याकडे पाहताना आणि त्यांच्या सहवासात असताना मला नेहमीच आल्हाददायक वाटायचे. तेव्हापासून माझे कमळ हेच आवडते फूल झाले.

कमळाचे फूल दलदली भागात, सरोवर अथवा तलावात उगवते. पाण्याच्या पृष्ठभागावर हे फुल उमलत असते. इतर फुलांपेक्षा कमळाचे फूल हे आकाराने मोठे असते. पांढऱ्या अथवा गुलाबी – लालसर रंगाचे हे फुल भारताचे राष्ट्रीय फूल देखील आहे.

सध्या कृत्रिम पद्धतीने सुद्धा कमळ उगवले जात आहेत. त्यामुळे कमळ विविध आकारात आणि विविध रंगांत आढळतात. त्यामध्ये प्रामुख्याने निळा, जांभळा, केशरी, पिवळा असे वेगवेगळे रंग असतात.

कमळाचे फूल पाकळीदार असते. अनेक पाकळ्यांनी मिळून कमळ फूल बनते. कमळाचे उमलणे जसे घडते तसेच अध्यात्मिक क्षेत्रात परमोच्च स्थितीला प्राप्त होणे असते. त्या स्थितीतील अनुभवासाठी कमळ हे फूल प्रतिकात्मक मानले गेले आहे.

पूर्वी आशिया खंडात आढळणारे कमळ हे फूल सध्या जगभरात पसरले आहे आणि सध्या त्याच्या शंभरपेक्षा अधिक जाती उपलब्ध आहेत. भारतात कमळाला अत्यंत महत्त्व दिले गेले आहे. धार्मिक आणि अध्यात्मिक संस्कृती असल्याने येथील देवी देवता कमळ फुलाला धारण केलेले आढळतात.

कमळाच्या फुलांचे सौंदर्य कवी आणि लेखकांनी अनेकदा वर्णिले आहे. पावसात कमळावर पडलेले थेंब हे जणू टपोऱ्या मोत्यांप्रमाणे भासतात. अनेक छायाचित्रकार तर ते दृश्य टिपण्यासाठी तयारच असतात. कमळाचे फूल हे घरगुती आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सजावटीसाठी सुद्धा वापरतात.

कमळाचे झाड चिखलात उगवते आणि फुले चिखलावर उमलतात. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीत देखील प्रगती करणे हे आपण कमळाच्या फुलाकडून शिकू शकतो. अशाप्रकारे कमळ हे फूल जीवन जगण्याची जणू प्रेरणाच देऊन जाते. त्यामुळेच कमळ हे माझे आवडते फूल आहे.

तुम्हाला माझे आवडते फूल – कमळ हा मराठी निबंध (Lotus Flower Essay in Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment