माझा आवडता मित्र (My Friend Essay) हा विषय निबंधासाठी खूप उपयुक्त असा आहे. माध्यमिक किंवा प्राथमिक शाळेत असताना या विषयावर निबंध लिहायला लावतात. मित्राचे स्थान आपल्या आयुष्यात किती महत्त्वपूर्ण असते ते काही नव्याने सांगण्याची गरज नाही परंतु तुमच्या मित्राप्रती असलेल्या भावना सोप्या शब्दात व्यक्त करणे अपेक्षित असते.
हा निबंध जास्त काल्पनिक स्वरूपात लिहायचा नसतो. या निबंधात तुमच्या मित्राचे जीवनात असलेले स्थान किती महत्त्वाचे आहे असे भावनिक शब्दात व्यक्त करायचे असते. चला तर मग पाहूया माझा आवडता मित्र हा निबंध.
माझा आवडता मित्र निबंध | Majha Awadta Mitra Marathi Nibandh |
कुटुंबातील नाती ही आयुष्यभर टिकणारी असतात परंतु आपण संपूर्णतः कुटुंबात असताना व्यक्त होत नसतो. आपल्या मनातील भावना व स्वभाव ओळखणारा आणि जाणणारा फक्त मित्रच असतो. रक्ताचे नाते नसले तरी एक अतूट बंध त्याच्याबरोबर बांधलेला असतो. प्रत्येक जण स्वतःच्या स्वभावानुसार स्वतःचे मित्र निवडत असतो.
केदार हा माझा आवडता आणि सर्वात चांगला मित्र आहे. मी लहान असताना शाळेत पाचवीत माझी आणि त्याची मैत्री झाली. आम्ही पुण्यात राहायचो. तो दिवस आजही आठवतो जेव्हा त्याची आणि माझी ओळख झाली होती. शाळेत यायला मला उशीर झाल्याने त्याच्या बेंचवर मला बसवले होते. तो दिवस माझा आणि त्याचाही खूप मजेत गेला. आम्ही दोघांनी खूप मस्तीही केली. त्या दिवसानंतर आम्ही दोघेच एकत्र बेंचवर बसू लागलो.
शाळेत असताना तो मला नेहमी अभ्यासात मदत करत असे. आम्ही दोघे नेहमी एकत्र जेवण करत असू. घरातील आणि खेळातील मज्जा आम्ही दोघे मिळून शेअर करत असू. मला नेहमी क्रिकेट खेळायला आवडायचे तर तो फुटबॉल खेळायचा. मैदानावर आम्ही एकमेकांविरुद्ध कधीच उतरलो नव्हतो याउलट एकमेकांच्या खेळात आम्ही सहयोगच करायचो. शाळेत मी जेमतेम हुशार होतो आणि तो मात्र कुशाग्र बुद्धीचा होता.
त्याच्या आणि माझ्या मैत्रीला आता पाच वर्षे झाली आहेत. त्याच्याबद्दलच्या आठवणी खूप आहेत. आत्ता मी माध्यमिक शाळेत आहे. तो दोन वर्षापूर्वी दुसऱ्या शाळेत शिकायला गेला. त्याच्या वडिलांची कामानिमित्त मुंबईला बदली झाल्याने
त्यालाही शिक्षणासाठी तिकडेच जावे लागले. आता आम्ही एकमेकांना फोन करत असतो. फोनवर शाळेतील आणि आयुष्यातील मज्जा शेअर करत असतो.
मी आजही पुण्यात त्याच शाळेत आहे. तो उन्हाळ्याच्या आणि दिवाळीच्या सुट्टीत आमच्या इकडे येतो. तो यायच्या अगोदरच आमचे सर्व प्लॅन्स ठरलेले असतात. काय काय खेळायचे आणि काय काय मस्ती करायची याचे नियोजनही अगोदरच झालेले असते. आता तो क्रिकेट खेळायला शिकला आहे आणि मीही त्याच्याबरोबर फुटबॉल खेळतो. सुट्टीत दुपारचे जेवण घेऊन आम्ही एकत्र कुठेही भटकत असतो. जेथे आवडेल तेथे एकत्र जेवायला बसतो.
मागच्या वर्षी खेळण्यावरून आमच्या दोघांची भांडणे झाली होती. आम्ही आठवडाभर एकमेकांशी बोलत नव्हतो त्याचा पश्चात्ताप आम्हा दोघांनाही झाला. नंतर मीच माफी मागितली आणि अबोला संपवला. त्यानंतर कधीही भांडणे न करण्याचा निर्णय आम्ही घेतला. त्याच्या आणि आमच्या घरचेही आता चांगले संबंध तयार झाले आहेत. आमची मैत्री आता दोन कुटुंबात व्यापून गेली आहे.
सायंकाळी एखादे पुस्तक किंवा गोष्ट वाचणे हा आमच्या घरचा नियम आहे. त्यानेही आता पुस्तकं वाचायला सुरुवात केली आहे. काही गोष्टीतून आम्ही दोघे नवनवीन कला आणि गुण अवगत करत असतो. काही वर्षांपूर्वी दोघांच्याही आवडी निवडी वेगवेगळ्या होत्या, आज मात्र तसे नाही. आम्ही एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने समजू लागलो आहे.
आम्ही एकमेकांच्या मैत्रीची आठवण म्हणून प्रत्येक सुट्टीत एकसारखा शर्ट विकत घेतो. आमच्या गल्लीत अजूनही आमचे काही मित्र आहेत पण केदार असल्यावर मला जो निवांतपणा आणि सौख्य लाभते त्याचे वर्णन करणे अशक्य आहे. एक वेगळीच ऊर्जा तो असल्यावर जाणवत असते. आज शाळेतही माझे मित्र आहेत पण केदारसारखा दिलदार आणि मनमिळाऊ स्वभावाचा मित्र असणे म्हणजे माझे नशीबच!
तुम्हाला माझा आवडता मित्र मराठी निबंध ( My Best Friend Essay In Marathi ) कसा वाटला? नक्की कमेंट करून कळवा…धन्यवाद!
Tumcha YouTube ID kay aahe