जागतिक ग्राहक दिन – मराठी माहिती | World Consumer Rights Day |

प्रश्न – जागतिक ग्राहक दिन कधी साजरा केला जातो?
उत्तर – १५ मार्च.

प्रस्तुत लेख हा जागतिक ग्राहक दिनानिमित्त (Jagatik Grahak Din Mahiti Marathi) माहिती देणारा लेख आहे. या लेखात ग्राहक दिनाचे महत्त्व आणि गरज सांगण्यात आलेली आहे.

जागतिक ग्राहक दिन – १५ मार्च | World Consumer Rights Day – 15 March

• वस्तू किंवा सेवा खरेदी करताना कोणत्याही फसवणुकीला आणि आमिषाला बळी पडू नये म्हणून प्रत्येकाने जागरूक राहणे गरजेचे आहे. ग्राहक म्हणून आपण नियमित कोणत्याही दैनंदिन उपयोगी वस्तूची खरेदी करत असतो. तेव्हा ग्राहक म्हणून आपण काय विकत घेत आहोत याबद्दल सतर्क राहणे आवश्यक आहे.

• संपूर्ण जगभरात ग्राहकांना कोणतीही तक्रार नसावी आणि वस्तू खरेदी करण्याबाबत जागरूकता निर्माण होण्यासाठी १५ मार्च हा दिवस जागतिक ग्राहक दिन म्हणून संपूर्ण जगभरात साजरा केला जातो.

• सर्व ग्राहकांना वस्तू आणि सेवा यांची पारख असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. खरेदी आणि वापर यांबाबत नियम व अटी सर्व ग्राहकांना समजाव्या त्याबरोबरच विशिष्ट हक्कांची जाणीव त्यांना व्हावी या उद्देशाने जागतिक ग्राहक दिन साजरा केला जातो.

• जागतिक ग्राहक दिन हा सेवाभावी व व्यवसायी संस्था, दुकाने, प्रसारमाध्यमे यांच्या मार्फत सर्वत्र प्रसिद्धीस आणला जातो. त्यानुसार काही ठिकाणी खरेदी आणि विक्री करताना सूट दिली जाते आणि ग्राहकांच्या हक्कांबाबत जागरूक केले जाते.

ग्राहक दिनाचे महत्व (Jagatik Grahak Dinache Mahattva) –

• वस्तूची ऑनलाईन किंवा प्रत्यक्ष खरेदी करताना ग्राहकांना त्यांच्या जबाबदारीची आणि हक्कांची जाणीव होण्यासाठी तसेच फसवणुकीपासून सावधान राहण्यासाठी जागतिक ग्राहक दिनाचे महत्त्व आहे.

• सध्या आधुनिक आणि डिजिटल जगात आपण वावरत आहोत. त्यामुळे आपण स्वतः सर्व वस्तूंच्या आणि सेवेच्या खरेदी बाबतीत शिक्षित असणे फार गरजेचे आहे. प्रत्येक नागरिकाला ग्राहक हक्क प्राप्त असल्याने आपण काय विकत घेत आहोत त्याबद्दल जागरूक राहणे सहजशक्य आहे.

• ग्राहकांना वस्तू व सेवा पुरवठा करताना झालेला निष्काळजीपणा व होणारी फसवणूक याबाबत निर्णय होण्यासाठी अमेरिकेत १९६० साली अध्यक्षीय निवडणुकीवेळी ग्राहकांचे प्रश्न प्रथमच समोर मांडण्यात आले.

• ग्राहकांच्या समस्यांचा तोडगा काढण्यासाठी एक व्यासपीठ तयार करण्यात आले. त्यानंतर समस्यांबाबत संपूर्ण जगभरात पाठपुरावा झाला आणि त्याला युनेस्कोनेही मान्यता दिली.

• १५ मार्च १९६२ साली अमेरिकेचे अध्यक्ष जॉन केनेडी यांनी ग्राहकांना सुरक्षितता, माहिती, निवड व प्रतिनिधित्व असे चार हक्क अमेरिकन संसदेपुढे प्रदान केले.

• काही वर्षांच्या कालावधीत जागतिक ग्राहक संघटनेने संयुक्त राष्ट्रसंघाशी चर्चा करून आणखी काही हक्कांना मान्यता मिळवली. त्यामध्ये मुलभूत गरज पुरविण्याचा हक्क, तक्रार निवारण्याचा हक्क, ग्राहक शिक्षणाचा हक्क आणि स्वच्छ पर्यावरणाचा हक्क अशा हक्कांचा समावेश होता.


ग्राहकांनी वस्तू खरेदी करताना घ्यावयाची काळजी –

• सध्या डिजिटल युग असल्याने ऑनलाईन मार्केटिंग भरपूर प्रमाणात चालते. तेथील बहुतांश जाहिराती या फसव्या असू शकतात. अशा फसव्या जाहिरातींना बळी पडू नका. वस्तूचा ब्रँड व विश्वासार्हता तपासूनच ती खरेदी करा.

• वस्तूची त्याच्या मूळ अथवा छापील किमतीपेक्षा जास्त रक्कम देऊ नका. वस्तू खरेदी केल्यावर बिल मागावे.

• डबाबंद पदार्थ जास्त दिवसांचे नसावेत. त्यासाठी उत्पादन दिनांक आणि कालबाह्यता (समाप्ती) दिनांक पहावा.

• पेट्रोल भरवून घेताना किती रुपयांचे पेट्रोल भरले गेले याकडे लक्ष द्या.

• ज्या वस्तूंची व्यवस्थित पारख होत नसेल अशा वस्तू ऑनलाईन खरेदी करू नका. प्रत्येक वस्तूची वॉरंटी आणि गॅरंटी तपासून घ्या.

तुम्हाला जागतिक ग्राहक दिन – मराठी माहिती (World Consumer Rights Day Information In Marathi) हा लेख आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment