जागतिक जल दिन – मराठी निबंध | Jagatik Jal Din Nibandh |

प्रस्तुत लेख हा जागतिक जल दिनाविषयी (Jagatik Jal Din Nibandh Marathi) मराठी निबंध आहे. या निबंधात जागतिक जल दिनाचे महत्त्व आणि तो कशा पद्धतीने साजरा केला जातो याबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे.

जागतिक जल दिन निबंध | World Water Day Essay In Marathi |

सर्व प्रकारचे जलस्त्रोत स्वच्छ राखणे आणि पाण्याचे मानवी जीवनात असलेले महत्त्व समजून येण्यासाठी दरवर्षी २२ मार्च रोजी जागतिक जल दिन साजरा करण्यात येतो. जलस्त्रोत स्वच्छ व शुद्ध स्वरूपात असणे आणि पाण्याचा वापर काळजीपूर्वक करणे यासाठी जागतिक जल दिनी जनजागृती केली जाते.

मनुष्यासाठी पाणी हेच जीवन आहे. पाणी नसेल तर सजीवांचे जीवनच संपुष्टात येईल. त्यामुळे पाण्याचे संरक्षण आणि संवर्धन होणे अत्यावश्यक आहे. म्हणजेच पाण्याची गरज पूर्ण करून भविष्यासाठी देखील त्याची उपाययोजना करणे, असा उद्देश्य जागतिक जल दिनानिमित्त साधला जातो.

युनायटेड नेशन्स (वाॅटर) ही संस्था जागतिक जल दिनाचे आयोजन करते. ही संस्था स्वच्छता आणि जल या दोन मुद्यांवर कार्यरत असणारी संस्था आहे. या संस्थेशी संबंधित असलेले सदस्य देश या दिनाच्या सर्व प्रकारच्या उपक्रमांत सहभागी असतात.

जागतिक जल दिन सर्वप्रथम २२ मार्च १९९३ रोजी साजरा करण्यात आला. प्रत्येक वर्षी जल समस्या किंवा संवर्धन या विषयांतर्गत एक नवीन संकल्पना मांडली जाते. वर्षभर ती संकल्पना पूर्ण करण्यासाठी विविध प्रकारचे उपक्रम राबवले जातात. पाणी आणि ऊर्जा, पाणी आणि शाश्वत विकास अशी काही त्या उपक्रमांची उदाहरणे आहेत.

सध्या पृथ्वीवर लोकसंख्या अफाट वाढल्याने शुद्ध पाण्याची गरज देखील वाढलेली आहे. औद्योगिक विकास आणि जगण्याची स्पर्धा यांमुळे नैसर्गिक शुद्ध जलस्त्रोत प्रदूषित झालेले आहेत. अशा विविध जल समस्यांचे निराकरण करण्यासाठी युनायटेड नेशन्स (वाॅटर) ही संस्था पाण्याबाबत विविध उपक्रम राबवत असते.

पाण्याचा अयोग्य आणि अविचारी वापर होत असून त्यासाठी कोणतीच उपाययोजना होत नसल्याचे आढळून आल्यानंतर युनायटेड नेशन्स (वाॅटर) या संस्थेने आत्तापर्यंत प्रत्येक वर्षी जलविकास करण्याच्या हेतूने एक नवीन संकल्पना अंमलात आणलेली आहे.

अशा पद्धतीने पाण्याचे महत्त्व आणि उपयोग समजून घेऊन आपणही पाण्याचा आवश्यक तेवढाच वापर करणे गरजेचे आहे. तसेच जल समस्यांवर तोडगा काढणे गरजेचे आहे. त्या दिशेने प्रयत्नशील राहून जागतिक जल दिनानिमित्त दरवर्षी प्रत्येक देश, समाज, संस्था आणि व्यक्ती यांनी एक नवा जल संकल्प करणे गरजेचे आहे.

तुम्हाला जागतिक जल दिन हा मराठी निबंध (Jagatik Jal Din Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment