कोरोना व्हायरस – Corona Virus | कलम १४४ नक्की आहे तरी काय?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्रकारांना माहिती देत अधिकृत कलम १४४ लागू होईल असे सांगितले. कोरोना गुणाकार पद्धतीने पसरतो आहे. त्याची झळ महाराष्ट्रात सर्वात जास्त बसलेली आहे. 

मुख्यमंत्री म्हणाले, “कोरोना व्हायरसच्या संदर्भात आपण संवेदनशील महत्त्वाच्या टप्प्यात आहोत. प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या वाढते आहे. उद्या सकाळपासून मुंबई, पुणे, नागपूर, महाराष्ट्रातल्या नागरी भागामध्ये १४४ कलम लागू होईल. पाचपेक्षा अधिकजण एकत्र येऊ नका. आवश्यकता नसेल तर घराबाहेर पडू नका. किराणा, मेडिकल, दूध, भाजीपाला यांच्यासह अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे. त्यासाठी गर्दी करू नका. बँक तसंच शेअर बाजारही सुरू राहील. सरकारी कार्यालयांमध्ये केवळ ५ टक्के कर्मचारी असतील”.

“परदेशातून आलेल्यांनी घरीच राहावं. स्वत:च्या तसंच आप्तस्वकीयांची काळजी घ्या. होम क्वारंटाईन असलेल्यांनी घराबाहेर पडू नये. रविवारपासून परदेशातून येणारी विमानसेवा खंडित होईल. अन्य राज्यात जाणाऱ्या बसेस थांबवण्यात आल्या आहेत”, असं त्यांनी पुढे सांगितलं.

एखाद्या परिसरातली शांतता भंग होऊ नये, यासाठी चारपेक्षा जास्त व्यक्तींच्या एकत्र येण्यास मनाई केली जाते. त्यालाच जमावबंदी म्हणतात. जमावबंदी अंमलात आणण्यासाठी कलम १४४ कायदा लागू केला जातो ज्यांतर्गत काही नियम लोकांनी पाळायचे असतात नाहीतर त्यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो. 

 महत्त्वपूर्ण मुद्दे –

• कलम १४४ हे CrPC म्हणजेच The Code of Criminal Procedure (CrCP) मधील कलम आहे. यालाच मराठीत फौजदारी दंडसंहिता म्हणतात.
• परिसरात शांतता राहावी आणि तिचा भंग कोणाकडून केला जाऊ नये यासाठी कायद्या अंतर्गत काही नियम लागू केले जातात. जमाव एकत्र आल्यावर हिंसा होऊ नये. असा उद्देश यामागचा आहे.
• कलम १४४ ला जमावबंदी कायदा (संचारबंदी) म्हणजेच “कर्फ्यू” असे म्हणतात.
• जिल्हाधिकारी, जिल्हा न्याय दंडाधिकारी किंवा इतर कार्यकारी दंडाधिकारी सूचना जारी करून जमावबंदीचे आदेश देऊ शकतात.
• कलम १४४ लागू असलेल्या परिसरात हत्यारांची ने-आण करण्यावर बंदी असते.
• कलम १४४ लागू झालेल्या भागात सरकारी अधिकारी कोणत्याही व्यक्तीस कायद्याचे उल्लंघन केल्यास नोटीस देऊ शकतात. तरीही ऐकत नसल्यास पोलिस त्याला कलम १०७ किंवा कलम १५१ अंतर्गत अटक करू शकतात.
• कलम १४४ अंतर्गत वर्षभराच्या तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते. मात्र, हा जामीनपात्र गुन्हा असल्याने अटक झाल्यावर जामीन मिळू शकतो.
• या कलमांतर्गत कोणत्याही परिसरात दोन महिन्यांसाठी जमावबंदीचे आदेश दिले जाऊ शकतात. मात्र नागरिकांच्या जिवाला धोका आहे किंवा दंगलीची शक्यता असल्यास सरकार ६ महिन्यांसाठीदेखील जमावबंदीचे आदेश देऊ शकते.

कोरोना व्हायरस (Corona Virus) मध्ये कसा काय संबंध ?

कोरोना पसरण्यामागचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे कोरोनाबाधित व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येणे. हा जनसंपर्क रोखण्यासाठी कलम १४४ लागू केलेले आहे. ५ व्यक्ती एकत्र येऊ शकत नाहीत. 

तसेच हात स्वच्छ धुणे, मास्क वापरणे, बाहेर जास्त न फिरणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे अशी काळजी घेण्यास सांगितलेली आहे. 

Leave a Comment