पद्मश्री, पद्मभूषण, महाराष्ट्रभूषण पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे हे भाई या टोपण नावाने ओळखले जातात. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे म्हणजेच आपले सर्वांचे लाडके पुल. साहित्य आणि कला क्षेत्रातील लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणून पुलंची ओळख आहे. त्यांनी आपल्या आयुष्यात मराठी लेखक, नाटककार, कथाकार, पटकथाकार, नट, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक असे विविध आयाम प्रकट केले. 

• नाव – पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे
• टोपणनाव – पु.ल., भाई 
• जन्म – ८ नोव्हेंबर १९१९, मुंबई.
• मृत्यू – १२ जुन २०००, पुणे.
• वडील – लक्ष्मण त्र्यंबक (त्रिंबक) देशपांडे
• आई – लक्ष्मीबाई लक्ष्मण देशपांडे
• पत्नी – सुनिता देशपांडे ( लेखिका आणि अभिनेत्री)

पु. ल. देशपांडे जवळजवळ प्रत्येक कलेच्या क्षेत्रात कार्यरत होते. शिक्षक, लेखक, नट, गायक, नकलाकार, पेटीवादक, वक्ते अशा कितीतरी उपाध्या त्यांना दिलेल्या आहेत. मराठी भाषेवर त्यांचे निस्सीम प्रेम होते. त्यांचे भाषण सुरू झाले किंवा एखादे पुस्तक वाचले तर त्यांचे भाषाप्रभुत्व दिसून येते. 

मराठीत त्यांच्यावर भाई हा चित्रपट बनलेला आहे. त्यांची विनोदी बुद्धी त्यांच्या लेखनातून दिसून येते. प्रसिध्द लेखक मार्क ट्वेन प्रमाणे त्यांचे विनोदी किस्से प्रसिध्द आहेत. त्यांचे एक भावलेले वाक्य पाहा – ” लोक हसतात… माझ्या डोळ्यांत आतल्याआत कृतज्ञतेचे पाणी येते, आणि म्हणूनच अंगाला ‘अहंकाराचा वारा’ लागत नाही. ” वसंत सबनीस यांच्या मिश्किल प्रश्नावर दिलेल्या उत्तरातील हे एक वाक्य आहे. 

पुलंचा जन्म मुंबईत गावदेवी परिसरात झाला. त्यांचे लहानपण जोगेश्वरी येथे गेले. तेथे ते सारस्वत कॉलोनीत राहत असत. त्यांचे शालेय शिक्षण पार्ले टिळक विद्यालयात झाले. त्यानंतरचे शिक्षण फर्ग्युसन महाविद्यालय, पुणे आणि सांगलीच्या विलिंग्डन महाविद्यालयात झाले. त्यांनी सुरुवातीला शिक्षक म्हणून काम केले.
१९४६ साली त्यांचा सुनीताबाईंशी विवाह झाला. मराठी साहित्य लेखन आता ते करू लागले होते. त्याव्यतिरिक्त ते संगीत दिग्दर्शक म्हणून ही प्रसिध्द होत होते. त्यांनी आकाशवाणी, दूरदर्शन, नाटक आणि चित्रपट क्षेत्रातही काम केलेले होते.

पुलंचे वडील लक्ष्मण देशपांडे हे अडवाणी कागद कंपनीत कामाला होते. लहानपणापासून  पुल व्याख्यान देण्यात पटाईत होते. आजोबांनी लिहून दिलेले भाषण त्यांनी वयाच्या पाचव्या वर्षी स्वतःच्या धारधार आवाजात आणि हावभाव करून सादर केले होते. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत ते वक्तृत्व कलेत निपुण झालेले होते. त्यानंतर ते स्वतःची भाषणे स्वतःच लिहू लागले. संवादलेखन देखील करू लागले. पुलंना वाचन करणे आणि रेडिओ ऐकणे आवडत असे. 

लहानपणीच त्यांना संगीताची आवड निर्माण झाली. ते पेटी वाजवायला शिकले. त्यांनी अनेक रचना आणि कवितांना चाली देखील लावल्या होत्या. ते नकला करण्यात पटाईत होते. सगळ्या व्यक्तींच्या हास्यास्पद नकला करणे हा त्यांचा छंद होता. घरी पाहुणे असताना पुल घरी नसलेलेच बरे असे त्यांच्या घरच्यांना वाटत असे. 

संगीताची साथ त्यांनी आता पकडली होती. वडिलांच्या मृत्यूनंतर ते पेटीवादन आणि गाण्यांना चाली लावू लागले. कॉलेज जीवनात ते पेटी वाजवत गायकांना साथ देत. त्यांचा भाऊ रमाकांत तबला वाजवत असे. त्यावेळी मधुकर गोळवलकर सारंगी वाजवत असत. जेवढे पैसे मिळतील, ते पैसे तिघे वाटून घेत.

पु.ल.देशपांडे मुंबईतील इस्माईल युसुफ कॉलेजमधून इंटर व सरकारी लॉ कॉलेजमधून एल.एल.बी. झाले आणि त्यांनी कलेक्टर कचेरी व प्राप्तीकर विभागात काही काळ नोकरी देखील केली. त्यानंतर ते पुण्याला आले. पुण्याला आल्यावर त्यांनी फर्ग्युसन कॉलेजमधून बी.ए. आणि नंतर एम.ए. केले.

सर्व शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते लेखन आणि नाटक क्षेत्रात आले. त्यांनी अनेक नाटकांच्या कथा रचल्या. स्वतः कामही केले. त्यानंतर ते चित्रपट क्षेत्राकडे वळले. वंदे मातरम्‌, दूधभात आणि गुळाचा गणपती या चित्रपटांत त्यांची भूमिका आहे. ‘ गुळाचा गणपती ‘ या चित्रपटांत कथा, पटकथा, काव्य, संगीत, भूमिका आणि दिग्दर्शन अशी सर्व कामे पुलंनी स्वतः केली. 

वंदे मातरम्‌ चित्रपटात पुल व त्यांच्या पत्‍नी सुनीताबाई यांच्या प्रमुख भूमिका होत्या. त्यानंतर पु.ल.देशपांडे यांचा देवबाप्पा प्रसिद्ध झाला व त्यातील ’नाच रे मोरा’ हे गाणे खूपच प्रसिध्द झाले. १९५५ मध्ये पुल आकाशवाणी त नोकरी करू लागले. आकाशवाणी साठी त्यांनी अनेक श्रुतिका लिहल्या. १९५८ मध्ये पु.ल. देशपांडे यांना आकाशवाणीने युनेस्कोच्या शिष्यवृत्तीवर “मिडिया ऑफ मास कम्युनिकेशन” या अभ्यासक्रमासाठी लंडनला बीबीसीकडे पाठवले.

१९५९ मध्ये पु.ल. देशपांडे भारतातील पहिले दूरचित्रवाणी कार्यक्रम निर्माते बनले. दूरदर्शन वाहिनीवर बिरजू महाराजांचा नृत्य कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचे निर्माते पुल होते. त्या कार्यक्रमात त्यांनी तबलाही वाजवला होता. दूरदर्शनच्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुल हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते.

साहित्य अकादमी आणि संगीत नाटक अकादमी या दोहोंचे पुरस्कार पुलंना मिळालेले आहेत. मुंबईच्या ’नॅशनल सेंटर फॉर परफॉरमिंग आर्ट्‌स‘ (NCPA) या संस्थेत पु.ल.देशपांडे यांनी अनेक प्रयोग केले होते. या रंगमंचावर पु.ल.देशपांडे यांनी देवगाणी, बैठकीची लावणी, दोन पिढ्यांची गायकी असे कार्यक्रम सादर केले.

पु.ल. देशपांडे यांच्या जीवनावर महेश मांजरेकर यांनी ‘भाई – व्यक्ती की वल्ली’ या नावाचा मराठी चित्रपट काढला आहे. वयाच्या ८१ व्या वर्षी म्हणजे १२ जुन २००० रोजी पुण्याच्या प्रयाग हॉस्पिटलमध्ये त्यांचे निधन झाले. 

त्यांची काही प्रसिध्द पुस्तके –

खोगीरभरती (१९४९), नस्ती उठाठेव (१९५२), बटाट्याची चाळ (१९५८), गोळाबेरीज (१९६०), पूर्वरंग (१९६३), असा मी असामी (१९६४), व्यक्ती आणि वल्ली (१९६६), हसवणूक (१९६८), खिल्ली (१९८२), कोट्याधीश पु.ल. (१९९६), उरलं सुरलं (१९९९), पुरचुंडी (१९९९).

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here