प्रस्तुत लेख हा लठ्ठपणा (Obesity Essay In Marathi) या विषयावर मराठी निबंध आहे. या निबंधात लठ्ठ असण्याची कारणे आणि परिणाम स्पष्ट केलेले आहेत तसेच लठ्ठ असल्याने आरोग्याच्या इतरही समस्या निर्माण होत असतात, याचीही सविस्तर चर्चा करण्यात आलेली आहे.
लठ्ठपणा निबंध | Latthapana Marathi Nibandh |
मानवी जीवनात जेवढ्या सुविधा निर्माण झालेल्या आहेत त्यांचा स्वीकार करून मानवाने स्वतःचे आयुष्य सुस्त बनवलेले आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञान प्रगतीमुळे मानवाला कष्ट करणे अत्यावश्यक राहिलेले नाही. त्याचा परिणाम त्याच्या शरीरावर दिसू लागलेला आहे. दिवसेंदिवस जगभरातील लोक लठ्ठ होत चाललेले आहेत.
लठ्ठपणा हा काही लोकांसाठी आनुवंशिक असतो तर काहीजण आळशीपणा आणि बैठे कामामुळे लठ्ठ होत जातात. प्रत्येकाची शरीर रचना वेगवेगळी असल्याने काही जणांसाठी लठ्ठपणा हा नुकसानकारक ठरत नाही तर काहीजण लठ्ठपणामुळे आरोग्य बिघडवून घेत असतात.
वाहनांमुळे सध्या प्रवास आणि वाहतूक एकदम सोयीस्कर झाल्याने माणूस चालायचे विसरलेला आहे. दैनंदिन जीवनात कष्टाची कामे कमी झालेली आहेत. कामाचा प्रकार हा देखील बैठ्या स्वरूपाचा असल्याने शारिरीक हालचाल एकदमच कमी आहे. परिणामस्वरूप शारिरीक वजन वाढत चाललेले आहे.
कष्ट न करता जीवन सोयीस्कर बनत गेल्याने माणसाला शारिरीक हालचाल अनावश्यक वाटत आहे. प्रत्येक कामात वाहनांचा आणि यंत्रांचा वापर करून मानव स्वतःला विकसित तर म्हणवून घेऊ लागला परंतु आरोग्याच्या दृष्टीने मात्र शरीराचे नुकसान झालेले आहे.
लठ्ठपणामुळे शरीरात अतिरिक्त चरबी निर्माण होत असते. त्यामुळे शरीराच्या आंतरिक कार्यामध्ये तणाव आणि बाधा निर्माण होत असते. लठ्ठपणात रक्तप्रवाह सुरळीत होत नसल्याने हृदयविकार, उच्च रक्तदाब, मेंदूचे विकार, त्वचा विकार, पचन प्रक्रियेत बिघाड अशा काही समस्या निर्माण झालेल्या दिसून येतात.
लठ्ठपणा वाढला की झोप देखील वाढत जाते. अशा झोपेमुळे काहीही करण्याची इच्छा राहत नाही. जीवनात नवीन उत्साह आणि ऊर्जा जाणवत नाही. परिणामी मन देखील उदास होऊ लागते. अशा समस्येवर उपाय म्हणून आहारात अशा पदार्थांचा समावेश केला जातो ज्यामुळे क्षणिक तरतरी मिळते परंतु शरीर आणखी सुस्त बनते.
लठ्ठपणा कमी करण्यासाठी केले जाणारे उपाय देखील सुस्तच असतात. पोटाला बेल्ट बांधणे, चरबी कमी करण्याची यंत्रे वापरणे व गोळ्या खाणे असे निरुपयोगी पर्याय योजले जातात परंतु त्याने लठ्ठपणा कमी होत नाही. याउलट नियमित शारिरीक हालचाल आणि आहारातील काही योग्य बदल यामुळे लठ्ठपणा कमी होऊ शकतो.
शरीर हे एक यंत्र स्वरूप आहे. आहार आणि विहार योग्य राखल्यास लठ्ठपणा ही समस्या कधी जाणवणारच नाही. कष्टाचे काम, व्यायाम अथवा योगा करणे, पोहणे, चालणे, धावणे, खेळ खेळणे अशा काही सवयींमुळे लठ्ठपणा शरीराला जडतच नाही.
लठ्ठपणामुळे आरोग्याच्या इतर समस्या निर्माण झाल्या असल्यास आपला वेळ, ऊर्जा आणि पैसे खर्च होत असतात. त्यामुळे नियमित आणि सातत्यपूर्ण प्रयत्न करून आरोग्यदायी सवयी अंगी बाणवून घ्यायला हव्यात जेणेकरून लठ्ठपणा येणार नाही. त्यासाठी शरीर स्वस्थ ठेवण्याची जबाबदारी ही स्वतःची स्वतः घेणे आवश्यक आहे.
तुम्हाला लठ्ठपणा हा मराठी निबंध (Obesity Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…