बायोगॅस हा प्रकल्प एकदम छोट्या गुंतवणुकीत उभा केला जाऊ शकतो. राज्य सरकार यासाठी अनुदान देखील उपलब्ध करून देते. आजकालचे एल पी जी गॅस येण्याअगोदर बायोगॅस खूप ठिकाणी उभे केले जात होते. आज गॅस सिलिंडरची किंमत पाहता बायोगॅस प्रकल्प पुन्हा उभे केले जाऊ शकतात.
बायोगॅस हा एक प्रकारचा अपारंपारिक ऊर्जा स्त्रोत आहे. नैसर्गिक घटक, गुरांची विष्ठा, पालापाचोळा, ओला कचरा कुजवल्याने बायोगॅस तयार होतो. निमशहरी किंवा ग्रामीण भागात अजून देखील असे बायोगॅसचे प्रकल्प आहेत. एकदाच गुंतवलेल्या पैशातून हा प्रकल्प उभारून तुम्ही वर्षभर मोफत इंधन वापरू शकता.
• संक्षिप्त माहिती –
सांडपाणी गाळ जर व्यवस्थित एका ठिकाणी कुजवला तर त्याचा उपयोग बायोगॅस म्हणून करतात. यातून खूप मोठ्या प्रमाणात मिथेनची निर्मिती होते. गुरांचे शेण आणि ओला कचरा कुजवला तर त्यापासून गोबरगॅस निर्मिती करतात. मिथेनची निर्मिती होत असल्याने त्यालाही बायोगॅस म्हटले जाते. कचरा निर्मूलन आणि सांडपाणी शुद्धीकरणासाठी उभारला गेलेला प्रकल्प हा बायोगॅस निर्मितीसाठी सहाय्यक आहे. बायोगॅसवर चालणाऱ्या गाड्या, उपकरणे, इंजिन आणि शेगड्या यांवर मोठ्या प्रमाणावर संशोधन चालू आहे. कचरा व्यवस्थापन आणि बायोगॅस निर्मिती असे दोन्हीही उद्देश पूर्ण होत असल्याने भविष्यात इंधन म्हणून एक प्रभावी माध्यम बायोगॅस प्रकल्पांकडे पाहिले जात आहे.
• बायोगॅस निर्मिती –
- बायोगॅसची निर्मिती करण्यासाठी एका जैविक प्रक्रियेची आवश्यकता असते. ऑक्सिजन विरहित वातावरणात जैविक प्रक्रिया करावी लागते. मिथेन हा बायोगॅसचा प्रमुख घटक असतो. त्याचे प्रमाण ६० टक्के असते. उरलेला गॅस हा कार्बन डाय-ऑक्साइड असतो.
- शुद्ध मिथेन हा ज्वलनशील पदार्थ आहे परंतु कार्बन डाय-ऑक्साइड या अज्वलनशील घटकामुळे बायोगॅसची ज्वलन उष्णता कमी होते आणि तो घरगुती वापरासाठी आपण वापरू शकतो.
- बायोगॅस निर्मितीसाठी ॲनारोबिक जिवाणूंची गरज असते. हे जिवाणू गायी म्हशींच्या मोठ्या आतड्यात सहज आढळतात त्यामुळे त्यांचे शेण हे बायोगॅस निर्मितीसाठी उत्तम मानले जाते. या जिवाणूंचे विविध प्रकार आहेत. हे प्रकार वेगवेगळ्या तापमानात बायोगॅस तयार करण्यास सक्षम असतात.
- बायोगॅस तयार होताना एकूण तीन टप्प्यात प्रक्रिया पूर्ण होते.
१. पहिला टप्पा – रेणुंमध्ये विघटन
जैविक मालाचे प्रथमतः मोठमोठ्या रेणूंमध्ये विघटन केले जाते. यामध्ये जिवाणू खूप मोठ्या प्रमाणावर कार्यरत असतात. पुढे सर्व जैविक मालाचे साखर, स्टार्च, प्रोटीन्स व अन्य छोटे रेणू इ. घटकांमध्ये रुपांतर होते. काही काळाने सर्व पदार्थ एकत्र छोट्या रेणूंमध्ये विभागले जातात. त्या सर्वांचे विघटन होते.
२. दुसरा टप्पा – आम्लीकरण
दुसऱ्या टप्प्यात सर्व लहान रेणुंचे कार्बोक्झिलिक ॲसिडमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला ॲसिडिफिकेशन म्हणजेच आम्लीकरण असे म्हणतात.
३. तिसरा टप्पा – मिथेनायझेशन
या टप्प्यात कार्बोक्झिलिक ॲसिडचे रुपांतर मिथेन आणि कार्बन डायऑक्साइडमध्ये होते. या प्रक्रियेला मिथेनायझेशन असे म्हणतात. या टप्प्यात बायोगॅसची निर्मिती होते.