How to make Vermicompost । गांडूळ खत कसे तयार करावे.

गांडूळ हा शेतकऱ्यांचा मित्र आहे हे आपण लहानपणापासून वाचत आलेलो आहोत. पूर्वी नैसर्गिकरीत्या गांडूळ शिवारात आणि शेतात असायचे. जैविक मालापासून तयार झालेले खत पूर्वी वापरले जायचे. अशा खताचा उकिरडा खुला असायचा त्यामुळे साहजिकच गांडूळ व इतर जिवाणू तेथे नेहमी आढळले जात होते. तसेच शेतात देखील नैसर्गिक पद्धतीने शेती केली जात असल्याने तेथेही आढळत होते.

हरितक्रांतीचे परिणाम म्हणून सर्वजण रासायनिक खताचा वापर करू लागले. जमिनीचा कस निघून जात आहे. येणारे पीक देखील तेवढे पौष्टिक नसते. या सर्वांचा उपाय म्हणून शेतकरी आता पुन्हा सेंद्रिय शेतीकडे वळू लागला आहे. सेंद्रिय खते तयार करण्यासाठी विविध पद्धतींचा अवलंब केला जातो. त्यापैकीच एक गांडूळ खत कसे तयार करावे, त्याचे फायदे आणि वापर हे सर्व या लेखामध्ये सविस्तरपणे सांगण्यात आले आहे.

• गांडूळ खतासाठी योग्य जागेची निवड कशी करावी ?

गांडूळ खत तयार करण्यासाठी शेडची संकल्पना छान आहे, परंतु तसे शक्य न झाल्यास एका छपरात किंवा पत्र्याच्या शेड मध्ये ज्याठिकाणी सावली असेल अशा ठिकाणी तुम्ही गांडूळ खतासाठी जागा निवडू शकता.

आता या जागेत एक खड्डा तयार करा. ४ ते ५ फूट खड्डा केला तरी चालेल. १५×२० अशा मापाच्या जागेत ५ फूट खड्डा योग्य असेल. तुम्हाला ते खत वापरताना व्यवस्थित काढता आले पाहिजे.

• गांडूळ खत कसे तयार करावे ?

सेंद्रिय पदार्थांचे ढीग तयार करावेत. प्रथम जमिनीवर पाणी शिंपडावे. तळाशी पिकाचे सुके चगळ जसे भाताची तुस, गवत, काथ्या असे पसरावे. त्यावर सुक्या शेणाचा थर पसरावा. त्यावर तात्पुरती काही गांडूळ सोडावीत.

आता दुसऱ्या थरावर सर्व जैविक कचरा जसे ओला कचरा आणि सुका कचरा, पालापाचोळा, टाकावा. त्यावर पुन्हा पाणी शिंपडावे. शेतातील माती २० % वापरावी. त्याबरोबर गुरांचे ओले शेण , घरातील कागदी , भाजी कचरा त्यामध्ये सतत टाकत रहावा. पुन्हा एकदा गांडूळ सोडावीत.

गांडूळाचे वजन साधारणतः १० ग्रॅम असते. त्याच वजनाची माती आणि कचरा ते खात असते. त्याची विष्ठा पुन्हा तिथेच पडते व खत तयार होते. स्वतःहुन सर्व जैविक घटक खाऊन त्याचे १० % स्वतःच्या शरीरात ठेऊन बाकी सर्व विष्ठा म्हणून बाहेर टाकते. यामुळे एकप्रकारची खत युक्त मातीच पुन्हा तयार होते. कमीत कमी वेळेत हे खत तयार होते.

गांडूळांना ओलाव्याची सतत गरज असते. शेतात ते ओलावाच शोधत राहतात. शेतजमिनीत ते ७ फूट खोलीपर्यंत जाऊन राहू शकतात. शेडमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यासाठी तुम्ही जनावरांचे मलमुत्र वापरू शकता.

१ गांडूळ वर्षाला ४००० पिल्ले तयार करते. त्यातील काही मर झाली तरी चालते. ही संख्या मुळातच जास्त आहे. खत बनविण्याची प्रक्रिया अव्याहतपणे चालू असते. तुम्ही खड्ड्यात दोन भाग तयार करून एका खड्ड्यात वापरले जाणारे तयार खत वेगळे करू शकता. त्यामध्ये थोडीशी गांडूळ सोडावीत. मग ते खत शेतजमिनीत टाकावे. आता खताबरोबरच गांडूळ शेतजमीन देखील भुसभुशीत बनवतील आणि जमिनीचा पोत आणि कस वाढेल.

आणखी एक पद्धत म्हणजे वर्षभरात तयार केलेले खत दर ३ – ४ महिन्यांनी वाळूच्या चाळणीत चाळावे. जे खत चाळायचे आहे ते जास्त ओलं नसलं पाहिजे. वाळूच्या चाळणीतून खाली पडलेले खत तुम्ही विकू शकता किंवा तुमच्या शेतजमिनीत वापरू शकता. चाळणीच्या वर राहिलेले गांडूळ पुन्हा एकदा खड्ड्यात सोडून द्या.

अशी प्रक्रिया करण्यासाठी तुम्ही जर खड्ड्याचे दोन भाग केले तर चांगलेच असेल. कारण एका खड्ड्यात तुम्ही मग थोडी सुकी खतवड माती वेगळी कराल.

या प्रक्रियेसाठी गांडूळ विकत घ्यावी लागतील. आणि १५×२० शेडमध्ये १० – १२ हजार गांडूळ पुरेशी आहेत. त्यांचे उत्पन्न पुन्हा वाढतच जाते.

• सेंद्रिय खताचा बाजार

सेंद्रिय खताचा बाजार करण्यात आला आहे. जनावरांची विष्ठा आणि कचरा जर योग्यरित्या वापरला तर आपणच खत तयार करू शकतो. काही बाजारू कंपन्या हेच खत वेगवेगळ्या स्वरूपात बाजारात आणते. शेतकरी आणखी पैसे खर्च करतो आणि शेतमाल भावाच्या ३० – ४० % पैसे खतात खर्च करतो.

थोडेसे पैसे आणि वेळ एकदाच घालवला तर तुम्ही कायमचे खत तयार करू शकता. कुठला वेगळा खर्च देखील शेतीत तुम्हाला करावा लागणार नाही.

जमिनीतून निर्माण झालेले जिन्नस पुन्हा जमिनीत गेल्यावर जमिनीची पोत वाढत असते. त्यामुळे जैविक कचरा एकत्र गांडूळाच्या मदतीने खतात रूपांतरित केला जाऊ शकतो. एवढी समज आली तरी शेतकरी खूप फायदेशीर शेती करू शकतो आणि कर्जाचा किंवा रासायनिक खतांचा अतिरिक्त भार त्याच्यावर पडणार नाही.

हे देखील वाचा – Latest 30+ Best Marathi Ukhane | लग्नासाठी नवीन मराठी उखाणे.

Leave a Comment