प्रस्तुत लेख हा प्रामाणिकपणा – मराठी निबंध (Pramanikpana Marathi Nibandh) आहे. प्रामाणिकपणा म्हणजे नक्की काय, तो कसा जोपासला जाऊ शकतो अशा बाबींचे वर्णन या निबंधात करण्यात आलेले आहे.
प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण आहे – निबंध | Honesty Is the best Policy Essay In Marathi |
प्रामाणिकपणा हा गुण बोलून दाखवणे खूप सोप्पे आहे परंतु प्रामाणिक राहणे खूप अवघड आहे. प्रामाणिकपणा अंगी येण्यासाठी एक आंतरिक दृष्टी विकसित करावी लागते. तेव्हा आपण बोलणे, वागणे, नातेसंबंध, मैत्री, प्रेम अशा जीवनाच्या प्रत्येक पैलूत प्रामाणिक राहू शकतो.
जो व्यक्ती जीवनात शांतता आणि समाधान शोधत असतो त्याला नेहमी जाणवते की प्रामाणिक राहिले नाही तर आपण स्वतःलाच फसवत असतो. त्यामुळे स्वतःचा स्वभाव प्रामाणिक ठेवण्याचा प्रयत्न अशी व्यक्ती करत असते. इतरांची फसवणूक आणि बोलण्यातील कटुता अशा व्यक्तीत आढळत नाही.
प्रामाणिकपणा हा वरचेवर विकसित करता येणारा गुण नाहीये तर त्यासाठी खोल आंतरिक दृष्टी असावी लागते. त्यासाठी स्वतःच्या आणि इतरांच्या जीवनाचे अत्यंत जवळून निरीक्षण करावे लागते. त्यानुसार जीवनाचा अत्यंत सुखद अनुभव कसा काय निर्माण होऊ शकतो याचे आकलन आपल्याला होत असते.
जीवनाचा अनुभव, निरीक्षण आणि चौकस बुद्धी यांतून स्वतःच्या स्वभावाला एक प्रकारची धार येत जाते. त्या स्वभावालाच प्रामाणिकपणा म्हणतात. अशी व्यक्ती स्वाभिमानी असू शकते पण अहंकारी कधीच नसते. स्वतःचे भले कशात आहे हे जाणून घेऊन इतरांच्याही जीवनात तो आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करत असते.
प्रामाणिकपणा विकसित होण्यासाठी आपल्या सभोवतालचा समाज आणि कुटुंबव्यवस्था तशा संस्कारांनी युक्त असले पाहिजेत. जर तसे नसेल तर प्रामाणिक असण्याचे फायदे ओळखून आपल्या कर्मात आपण छोटे छोटे बदल करायला हवेत.
एखादे वचन अथवा शब्द दिला तर तो प्रामाणिकपणे पाळणे, वेळेत काम पूर्ण करणे, स्वतःचा फायदा बघून कोणाची फसवणूक न करणे अशा बाबी लक्षात घेऊन त्या अंगिकारण्याचा प्रयत्न करणे, तसेच कोणत्याही नात्यातील प्राधान्यता ठरवून विश्वास आणि प्रेम वाढवत जाणे यातूनही प्रामाणिकपणा झळकत असतो.
विद्यार्थीदशेत असताना नियमित अभ्यास पूर्ण करणे, वेळेवर शाळेत जाणे, सर्वांशी मैत्रीपूर्ण व्यवहार करणे अशा गोष्टी स्वतःच्या स्वभावात आणल्या तर प्रामाणिकपणा विकसित व्हायला मदत होईल. तेच विद्यार्थी भविष्यात नीतिमत्ता आणि प्रामाणिकपणा समाजात रुजवू शकतील.
प्रामाणिक व्यक्ती जीवनात एकदम सहज आणि सरळमार्गे यशस्वी होत असते. ते दुनियेला बदलण्याचा प्रयत्न न करता स्वतःला अगोदर बदलतात त्यामुळे त्यांच्या जीवनात निरर्थक कलह आणि संघर्ष जाणवत नाही. ते जाणतात की प्रामाणिकपणे स्वतःचे कर्म करून शांत व समाधानी आयुष्य जगणे यातच आनंद सामावलेला आहे.
तुम्हाला प्रामाणिकपणा हा मराठी निबंध (Honesty Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…