प्रस्तुत लेख हा माझा आवडता ऋतू – उन्हाळा (My Favourite Season Summer Essay In Marathi) या विषयावर मराठी निबंध आहे. उन्हाळा ऋतूचे महत्त्व आणि वैशिष्ट्ये या निबंधात सांगण्यात आलेली आहेत.
उन्हाळा ऋतु मराठी निबंध | Majha Avadta Rutu – Unhala Marathi Nibandh |
भारतात एकूण सहा हंगाम आहेत तर त्यामध्ये उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीन मुख्य ऋतु आहेत. हिवाळा ऋतू संपला की उन्हाळा ऋतू येतो. उन्हाळा हा ऋतू फेब्रुवारी ते मे महिन्यापर्यंत असतो. उन्हाळा ऋतूला ग्रीष्म ऋतू असे देखील म्हटले जाते.
आपल्या सर्वांना माहित आहे की पृथ्वी सूर्याभोवती फिरते. जेव्हा पृथ्वी फिरत फिरत सूर्याकडे झुकते तेव्हा पृथ्वीवर उष्णता वाढते, तसेच जेव्हा गोलार्ध सूर्याच्या बाजूला असतो तेव्हा उन्हाळा ऋतु असतो आणि जेव्हा गोलार्ध सूर्यापासून दूर असतो तेव्हा हिवाळा ऋतु असतो.
उन्हाळा हा माझा आवडता ऋतू आहे कारण तो वर्षातील सर्वात जास्त उपक्रमशील काळ म्हणता येईल. शाळेतील मुलांसाठी उन्हाळा हा खूप मनोरंजक असतो कारण त्यावेळी परीक्षा असते व त्यानंतर सुट्टी असते. काही मुले उन्हाळ्याची सुट्टी परगावी जाऊन साजरी करतात तर काहीजण घरीच राहून विविध उपक्रम करत असतात.
उन्हाळ्यात आम्ही मामाच्या किंवा मावशीच्या गावी जात असतो. तेथे मला क्रिकेट खेळण्यात आणि मामाकडून गोष्टी ऐकण्यात खूप मज्जा येते. तसेच पोहायला जाणे, सायकल चालवणे, आणि आंबे चोरून खाणे असे इतर उद्योग देखील चाललेले असतात.
उन्हाळ्यात दिवस मोठा आणि रात्र छोटी असते. उन्हाळ्यातील दिवसात बाहेर काम करण्याचा कंटाळा येत असला तरी घरात राहून मात्र अनेक कामे केली जातात. लोणचे, चटण्या, पापड आणि नाश्त्याचे विविध पदार्थ बनवले जातात तसेच शेतकरी लोक शेतीसाठी लागणारे बियाणे जमवण्याचे काम करतात.
उन्हाळयात निसर्गात सुद्धा अनेक दर्शनीय बदल पहावयास मिळतात. सर्व नदी – तलावांचे पाणी कमी झालेले असते. या काळात झाडांची पाने गळायला सुरुवात होते आणि उन्हाळा संपताना झाडांना नवीन पालवी फुटू लागते. झाडांचे असे मनमोहक रूप पाहून अत्यंत आनंद होत असतो.
उन्हाळयाच्या हंगामात सर्वजण सुट्टीचा आनंद घेत असतात. पर्वतीय भागांत, समुद्रकिनारी, आणि थंड हवेच्या ठिकाणी पर्यटनासाठी हा काळ सर्वोत्तम आहे. उन्हाळयात विहिरीवर, तलावात किंवा नदीत पोहण्याचा मनमुराद आनंद लुटता येतो.
उन्हाळयाच्या उष्णतेमुळे विषारी जंतू नष्ट होतात. जर उष्णता चांगली असेल तर पाऊस देखील चांगला पडतो. ऊन जास्त असल्याने खाण्यात थंड पदार्थांचा समावेश केला जातो. शीतपेये, रसरशीत फळे, आणि आईस्क्रीम असे पदार्थ तर आवर्जून खाल्ले जातात.
उन्हाळा ऋतु हा भयानक वाटत असला तरी माणूस मात्र निसर्गाशी जुळवून घेत अतिशय प्रसन्न मनाने या ऋतूत जीवन जगत असतो. उन्हाळ्यात निसर्गात आणि मानवी जीवनशैलीत होणारे बदल हे अतिशय आल्हाददायक असल्याने मला उन्हाळा हा ऋतु अतिशय आवडतो.
लेखन सौजन्य – सिद्धी पवार
तुम्हाला माझा आवडता ऋतू – उन्हाळा (My Favourite Season Summer Essay In Marathi) हा मराठी निबंध आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा….