प्रस्तुत लेख हा प्राणी संग्रहालय (Prani Sangrahalay Nibandh Marathi) या विषयावर आधारित एक मराठी निबंध आहे. या निबंधात प्राणी संग्रहालयातील सर्व प्राणी, प्रसंग व विविध विभागांचे वर्णन अपेक्षित असते.
प्राणी संग्रहालयाला भेट – मराठी निबंध | Zoo Essay In Marathi |
प्रत्येक वर्षी आमच्या शाळेची सहल ही कोणत्या ना कोणत्या निसर्गरम्य किंवा ऐतिहासिक ठिकाणी जात असते. यावर्षी सर्व शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी मिळून प्राणी संग्रहालयाला भेट देण्याचे ठरवले. जिल्ह्यातील “अद्भुत प्राणी संग्रहालय” हे ठिकाण निश्चित करण्यात आले.
आम्ही सर्वजण सहलीच्या दिवशी शाळेतून एकत्र निघालो. फक्त एका तासाच्या प्रवासात आम्ही प्राणी संग्रहालयात पोहचलो. प्राणी संग्रहालय हे जवळजवळ पाच एकर क्षेत्रात पसरले होते. प्राणी संग्रहालयाला एक भव्यदिव्य असे प्रवेशद्वार होते. तेथील सुरक्षा रक्षकाने सर्वांचे तिकीट तपासून आम्हाला आत सोडले.
प्राणी संग्रहालयात प्रवेश करताच आम्ही धावतच सुटलो. निसर्गरम्य दृश्य व झाडांची दाटीवाटी अनुभवून आम्ही पुरते अचंबित झालो. तेथील एका झाडाला आजूबाजूने पिंजरा तयार केलेला होता. त्यामध्ये दोन अस्वले होती तर त्याच झाडावर माकडे खेळत होती. आम्ही माकडांना हुलकावण्या देत पुढे सरकलो.
तेथून उजव्या बाजूला गेल्यास एक भले मोठे तळे होते. त्या तळ्यात सुरेख अशी बदके पोहत होती. आजूबाजूला जिराफ व हरीण पाणी पित होते. पहिल्यांदाच जिराफ पाहत असल्याने मी खूपच आनंदीत झालो होतो. तेथून पुढे गेल्यावर हत्तींसाठी तयार केलेले क्षेत्र आम्ही पाहिले. त्यामध्ये त्यावेळी दोनच हत्ती होते.
प्राणी संग्रहालयात डाव्या बाजूला हिंस्र प्राण्यांसाठी पिंजरे तयार केले होते. त्यामध्ये प्रत्येक पिंजऱ्यात वेगवेगळा हिंस्र प्राणी ठेवला होता. चित्ता, वाघ, कोल्हा असे विविध प्राणी आम्हाला दुरूनच दाखवण्यात आले. काहीजणांनी त्यांचे फोटो सुद्धा काढले. तेथून थोडे घाबरतच आम्ही पुढे गेलो.
पुढे एक बाग होती. त्या बागेत आम्ही सर्वजण भोजनासाठी बसलो. भोजन करताना सर्वांच्या तोंडी फक्त प्राण्यांच्याच चर्चा होत्या. प्रत्येक विद्यार्थी हा स्वतःचा अनुभव सांगत होता. भोजन झाल्यावर आम्ही तेथे खेळू लागलो. खेळून झाल्यावर पुढच्या विभागात आम्हाला नेण्यात आले.
शेवटच्या विभागात आम्ही विविध प्रजातींचे साप व अजगर पाहिले. तेथून पुढे एका भल्या मोठ्या पिंजऱ्यात एक शहामृग होते. आम्ही त्याला आमच्याजवळील खाऊ दिला. त्यानेही तो खाल्ल्याने आम्ही खूपच आनंदीत झालो. प्राणी संग्रहालयात विविध ठिकाणी तेथे उपलब्ध नसलेल्या प्राण्यांचे व पक्षांचे पुतळे बनवलेले होते.
प्राणी संग्रहालयातील नैसर्गिक विविधता पाहून आम्ही खूपच उल्हासित होतो. घनदाट झाडी, सतत पक्षांचा होणारा कोलाहल, प्राण्यांचे आवाज व सुरक्षा रक्षकांची जबाबदारी इत्यादी सर्व बाबी आम्हाला अनुभवायला मिळाल्याने आम्ही भलतेच खुश होतो. आमची वेळ समाप्त झाल्याने आम्ही तेथून आता परतीच्या प्रवासाला निघालो.
तुम्हाला प्राणी संग्रहालय हा मराठी निबंध (Prani Sangrahalay Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…