स्त्रियांचे सशक्तीकरण असा विषय महाविद्यालयीन जीवनात निबंध म्हणून लिहावा लागतो. हा निबंध सामाजिक विषय असल्याने या विषयातील संपूर्ण ज्ञान असणे आवश्यक आहे. निबंध काल्पनिक रचनेत न लिहता वास्तविक दृश्य मांडायचे असते. त्यामुळे स्त्रिया व त्यांचा इतिहास, त्यांचे नैसर्गिक गुण व समाजातील त्यांचा सहभाग कशा प्रकारचा असतो याचे प्राथमिक ज्ञान असणे आवश्यक आहे.
स्त्रियांचे सशक्तीकरण हा निबंध लिहताना जास्त भावनिक मुद्दे मांडणे गरजेचे नाही. स्त्रियांना समान वागणूक आणि त्यांचे समाजातील स्थान उंचवण्याकरिता काय काय उपाययोजना असू शकतील याचा सविस्तर विचार या निबंधात करावयाचा असतो. चला तर मग पाहुयात महिलांचे सशक्तीकरण अथवा स्त्रियांचे सशक्तीकरण हा निबंध!
Women’s Empowerment Essay in Marathi
स्त्रिया आज अबला राहिलेल्या नाहीत. त्यांची झेप आणि कर्तृत्व आज सर्वदूर पसरले आहे. तरीही भारत आणखी सक्षम आणि महासत्ता बनवण्याच्या दृष्टीने महिलांना योग्य तो मान आणि ताकत मिळणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने स्त्री सशक्तीकरण करणे गरजेचे आहे. आर्थिक, मानसिक, सामाजिक सर्व दिशा तिच्यासाठी सुरक्षित आणि स्वतंत्र असल्या पाहिजेत.
स्त्री जेव्हा घराबाहेर पडते तेव्हा योग्य प्रकारे तिची परिस्थिती हाताळली गेली पाहिजे. शिक्षण आणि कामासाठी स्त्रियांना बाहेर पडावे लागते. एक सुव्यवस्था त्यामध्ये आली पाहिजे. मागील दोन दशकात स्त्री शिक्षण क्षेत्रात परिपूर्ण झालेली आहे. आता गरज आहे तिला योग्य कर्तृत्व देण्याची आणि तिला सक्षम बनवण्याची! यासाठी आपण काय काय उपाय करू शकतो याचा सूक्ष्म अभ्यास झाला पाहिजे.
समाजात वावरताना सामाजिक रचनेनुसार आणि व्यवस्थेनुसार सर्वांना जगावे लागते. सामाजिक रचनेत हक्क आणि नियम यांची सतत चर्चा होत असते. पुरुष आणि स्त्री असे दोन व्यक्तिविभाजन असल्याने हा तिढा आणखीनच वाढत असतो. स्त्रियांचे हक्क आणि पुरुषांचे हक्क याबाबत नेहमी कलह असतो. स्त्री आणि पुरुष स्वतः स्वातंत्र्याने आणि हक्कानुसार जगण्याची इच्छा करतात. ती इच्छा सामाजिक स्तरावर विशिष्ट पद्धतीने हाताळली गेली पाहिजे.
आजच्या युगात जेथे स्त्री व पुरुष एकत्र कोणत्याही क्षेत्रात वर्चस्व गाजवू शकतात तेथे फक्त पुरुषच सन्मानित केला जातो. स्त्रीचे कर्तृत्वही तेवढेच मोलाचे आहे. असे कर्तृत्व डावलले जाण्यामागचे कारण म्हणजे भेदाभेद व व्यवस्था! अशी सामाजिक व्यवस्था ही पारंपारिक जीवन पद्धतीने घडत जाते. अशा जगण्यात काही अडचण नाही परंतु स्त्री मग स्वतंत्र आणि स्वाभिमान अनुभव करू शकत नाही. जीवनात आणि समाजात मुक्त जगण्यासाठी प्राथमिक कार्य कोणते असेल तर ते म्हणजे स्त्रियांचे सशक्तीकरण!
पुरातन काळापासून पुरुषी वर्चस्व आपल्याला पाहायला मिळते. यामध्ये स्त्री कधीही सशक्त आढळत नाही आणि तेव्हा त्यांच्या कामाची सामाजिक स्तरावर गरजही नसायची. आज काळ बदलला आहे. त्याप्रमाणे जगण्यातील गरजही बदलली आहे. पूर्वी जेथे घर आणि मुलांचा सांभाळ एवढे कर्तृत्व स्त्रिया करत असत. परंतु आज अनेक सामाजिक गरजा अशा काही बदलल्या आहेत की जेथे स्त्रियांचे घराबाहेर पडणे अनिवार्य झाले आहे.
स्त्रियांचे सशक्तीकरण म्हणजे स्त्रियांचा संपूर्ण विकास! स्त्री घर आणि काम अशी दोन्ही क्षेत्र सांभाळत असते. त्याद्वारे घरी असताना तिच्यावर जाच अथवा छळ होता कामा नये. रुढी परंपरेनुसार कौटुंबिक कलह, जाचक घरगुती नियम निर्माण करून तिचे स्वातंत्र्य हिरावून घेणे, लग्न झाले की बस्स! आता काय गरज आहे तिचे स्वतःचे आयुष्य चांगले बनवण्याची? असे म्हणून तिला घरीच बसवले जाते. लोकांची मानसिकता याबाबतीत बदलली पाहिजे.
घराबाहेर काम करताना तिने सुरक्षित अनुभवले पाहिजे. तिची मानसिक तयारी शिक्षणामुळे कणखर बनलेली असते परंतु त्याबरोबर काम करताना सुरक्षित वातावरण प्राप्त होणे गरजेचे आहे. सुरक्षितता आणि सुव्यवस्था हे दोन निकष, स्त्री जेथे काम करत आहे तेथे पाळले पाहिजेत. एकदा जर घरगुती आणि सामाजिक सुरक्षा स्त्रीला लाभली की ती पुरुषाच्या बरोबरीने पुरुषाएवढेच काम करू शकते.
महिला सशक्तीकरण करताना अगदी बाल्यावस्थेत असल्यापासून स्त्रीला स्वतंत्र असल्याची जाणीव आणि तसे शिक्षण दिले गेले पाहिजे. कौटुंबिक आणि आईचे संस्कार याबाबतीत खूप महत्त्वाचे ठरतात. मानसिकदृष्ट्या सक्षम स्त्री कोणत्याही क्षेत्रात यश प्राप्त करू शकते. तिला कठीण आणि धाडसी कार्य करायला लावणे, शारीरिक कष्टदेखील करायला लावणे गरजेचे आहे. शारीरिक सक्षमता येणे गरजेचे आहे.
शिक्षणामुळे बौद्धिक विकास होतो परंतु खेळामुळे व व्यायामामुळे शरीर आणि मन कणखर बनते. अशी स्त्री एक सुंदर कुटुंब आणि समाज घडवू शकते. त्यामुळे शिक्षणाच्या मार्गात मुलींना ही मुलांसारखे भवितव्य घडवण्यासाठी संधी प्राप्त व्हायला हव्यात. कोणतेच असे क्षेत्र राहता कामा नये जेथे स्त्री कार्यरत नसेल. तेव्हाच एका सुदृढ समाजाची आपण कल्पना करू शकतो.
महिलांना सशक्त बनवण्यासाठी त्यांना प्रथमतः आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनवले पाहिजे. पूर्वी पुरुष अर्थार्जन करत असल्याने तोच कुटुंब प्रमुख असायचा परंतु आता परिस्थिती बदलली आहे. स्त्री स्वतःच्या कौशल्यावर जर अर्थार्जन करत असेल तर ती स्वतः कोणावर अवलंबून असणार नाही. मग तिला कोणताही छळ दुसऱ्याकडून सहन करावा लागणार नाही. गुलाम असल्याची थोडीसुद्धा जाणीव तिच्या मनात डोकावणार नाही.
आज कामाचे आणि जीवनाचे स्वरूप बदलत चालले आहे. औद्योगिक, शिक्षण आणि तंत्रज्ञान क्षेत्र झपाट्याने विकसित होत आहे. याचा विचार करून त्या दोन्ही क्षेत्रात स्त्रिया देखील कोणत्या प्रकारचे काम करू शकतात हे जवळजवळ निश्चित झालेले आहे आणि त्यादृष्टीने स्त्रिया त्या त्या क्षेत्रात कार्यरत आहेत. म्हणजेच काळ जसा बदलला आहे त्याप्रमाणे स्त्रियांची भूमिका आज फक्त चूल आणि मूल एवढीच उरली नाही तर स्वकर्तृत्वावर आणखी काही दिशांचा शोध तीही घेऊ शकते.
एक स्वतंत्र राष्ट्र स्त्रियांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्नशील असतेच. स्त्रीवरील अन्याय रोखण्यात आज बऱ्यापैकी यश प्राप्त झाले आहे. त्या पद्धतीचे कायदे संसदेत पारित करण्यात आले आहेत. हुंडा प्रतिबंध कायदा, गर्भधारणा कायदा, सती आयोग, बालविवाह अधिनियम, लैंगिक छळ अधिनियम यासारखे कायदे भारतात लागू झालेले आहेत.
स्त्री सशक्तीकरण हा मुद्दा प्रत्येक राज्य आणि केंद्र सरकारच्या मोहिमेत असतो. सरकार त्यादृष्टीने स्त्रियांना उपलब्ध होतील तेवढ्या सुविधा देण्याचा प्रयत्न करत असते. त्याचा फायदा स्त्रियांनी घेऊन समाज आणि राष्ट्र विकासात हातभार लावला पाहिजे. थोडे सहकार्य पुरुषांनी केले आणि स्त्रीला योग्य सुरक्षित वातावरणात कर्तृत्व सिद्धीस कार्यरत केले तर स्त्रियांनाही योग्य तो सन्मान आणि शक्ती प्राप्त करता येईल.