बेरोजगारी ही समस्या पाहता त्याचे विश्लेषण करणे आणि त्यावर तोडगा काढणे अपेक्षित आहे. परंतु दिवसेंदिवस ही समस्या वाढतच आहे. या समस्येवर उपाययोजना म्हणून शिक्षण पद्धतीतले बदल आणि उपलब्ध असणाऱ्या रोजगाराच्या संधी यांचा समूळ विचार केला गेला पाहिजे. तरच आपण नक्की या समस्येवर समाधान प्राप्त करू शकू!
विद्यार्थी बेरोजगारी हा शब्द ऐकतात पण त्यांच्या अनुभवात हा शब्द नसतो. या मुद्द्याचे आणि विषयाचे अतिरिक्त वाचन गरजेचे आहे. बेरोजगारी निबंध (Unemployment Essay In Marathi) लिहण्यासाठी बेरोजगारीच्या कोणत्या कारणांचा आणि उपायांचा विचार करणार आहोत याचे परिपूर्ण ज्ञान असायला हवे. बेरोजगारी हा निबंध वास्तववादी स्वरूपाचा असल्याने काल्पनिक विस्तार करू नये. चला तर मग पाहूया कसा लिहायचा, बेरोजगारी हा निबंध!
बेरोजगारी निबंध ! Berojgari Marathi Nibandh |
बेरोजगारी ही समस्या निर्माण होण्यामागे वाढती लोकसंख्या, शिक्षण पद्धती, अकुशल तरुणाई, स्वार्थ आणि व्यर्थ स्पर्धा या गोष्टी कारणीभूत आहेत. जागतिक आणि सामाजिक तथ्य, गरज आणि व्यावसायिक ध्येये ओळखून जर शिक्षण दिले गेले तर बेरोजगारी या समस्येला आपण बऱ्यापैकी तोंड देऊ शकू. त्यासाठी काय मौलिक बदल करता येतील याची चर्चा अगोदर केली पाहिजे.
सर्वात अगोदर बेरोजगारी हा शब्द वारंवार का पुढे येत आहे ते पाहूया. राजकीय सत्ता आपल्या स्वार्थानुसार आणि सोयीनुसार बेरोजगारी हा शब्द पुढे आणत आहेत. स्वतः सत्तेत असताना एक वैभवशाली समाज निर्माण न करता प्रत्येक घटकाला गरीब ठेवणे आणि ज्या शिक्षणाची गरज आहे तसे शिक्षण न देता उपयोगात न येणारे शिक्षण देणे आणि नंतर बेरोजगारी विरोधकांच्या सत्तेमुळे आली, असे राजकारणी ओरडत राहतात.
शिक्षणपद्धती ही देखील बेरोजगारीस कारणीभूत आहे. ज्या विकसित समाजात जे शिक्षण दिले गेले पाहिजे त्याचा विचार होताना दिसत नाही. आज विज्ञान आणि तंत्रज्ञान एवढे विकसित आहे की त्यामध्ये खूप साऱ्या संधी देशात आणि परदेशात उपलब्ध आहेत. परंतु शिक्षण व्यवस्था फक्त पुस्तकी ज्ञान देऊन शिक्षण पूर्ण करवते. पदवीधर झालेला एखादा तरुण कुठलेच प्रॅक्टिकल काम करू शकत नाही हे सत्य आहे. मग अशा शिक्षणाने कसे काय रोजगार निर्मित होतील?
शिक्षण घेत असताना तरुण कौशल्य विकसित करत नाहीत आणि फक्त सर्टिफिकेटवर नोकरी मागायला जातात. त्यांना काहीही काम येत नसताना कुठलीही कंपनी काम का देईल? असे तरुण मग बेरोजगारच राहणार! शिक्षण पद्धती हा देखील व्यवसाय बनल्याने तथाकथित नेते आणि शिक्षणसम्राट श्रीमंत बनत गेले आणि समाज मात्र गरीब आणि बेरोजगार होत गेला. शिक्षण संपल्यानंतर तरुणाला जी वास्तविकता पाहायला मिळते ती त्याने कधी अगोदर अनुभवलेली नसते त्यामुळे तो तरुण मानसिक वैफल्यग्रस्त होतो.
आता लोकसंख्यावाढ ही सुद्धा बेरोजगारीला जबाबदार आहे. पुरेशी उपजिविकेची संसाधने उपलब्ध नसताना देश लोकसंख्येला दुर्लक्षित करत जातो त्यामुळे एकदम भरमसाठ लोक बेरोजगार होतात. शिक्षित होणाऱ्या तसेच अशिक्षित तरुणांना एकदम रोजगार देणे कसे काय शक्य होऊ शकते? तेवढ्या औद्योगिक संस्थांची उपलब्धता आपल्या देशात तरी सध्या नाहीये. लोकसंख्या हळूहळू नियंत्रित केली गेली तर जीवघेणी स्पर्धा कमी होऊन व्यवस्थितरित्या रोजगारनिर्मिती करता येऊ शकेल.
बेरोजगारीमागे शिक्षित होणारा तरुणही तेवढाच जबाबदार आहे. शिक्षण घेताना भविष्यातील संधी न पाहता आणि स्वतःची कुशलता न वाढवता तो तरुण फक्त बौद्धिक आणि भाषिक शिक्षण घेत राहतो आणि अनुभव काहीच मिळवत नाही. त्यामुळे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याला बेरोजगारी प्राप्त होते. कौशल्यपूर्ण शिक्षण जर मिळत नसेल तर प्रत्येकाने कोणत्याही क्षेत्रात कुशलता मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
बेरोजगारी ही व्यर्थ महत्त्वाकांक्षा आणि स्वार्थ यांचा देखील परिणाम आहे. सर्व गरजा सहज पूर्ण होत असताना अवास्तव स्वप्न सर्व समाजाद्वारे दाखवली जातात. ती पूर्ण नाही केली तरी माणूस सहज आनंदी जगू शकतो पण भौतिक सुखाची लालसा दाखवून मोठ्या तरुणाईला आकर्षित केले जाते. सर्व तरुणाई एका संस्थेच्या किंवा सामाजिक व्यवस्थेच्या छताखाली आली की त्यांचा वापर नोकर म्हणून करा किंवा बेरोजगार म्हणून! काहीही फरक पडत नाही. रोजगार मिळवण्यासाठी त्यांच्याकडून औद्योगिक संस्था बक्कळ पैसा उकळत असते.
बेरोजगारी हा स्वार्थाचाच परिणाम आहे. लहान असताना किंवा शिक्षण घेताना उज्ज्वल भविष्याची स्वप्न पाहत राहणे आणि कर्तृत्वाच्या दिशेने प्रयत्न न करणे हे नुकसानदायक ठरत असते. मग झोंबनारी वास्तविकता समोर आली की
बेरोजगारीच्या नावाखाली इतरांना म्हणजे शिक्षण व्यवस्था, सामाजिक आणि कौटुंबिक जडणघडण यांची तक्रार करत राहणे एवढेच काम शिल्लक राहते. व्यक्तिगत विकास हाच रोजगार मिळवण्याचा एकमेव पर्याय आहे त्याचा योग्य वेळी फायदा उचलून सर्व तरुणाई स्वयंरोजगार निर्मिती करतील आणि बेरोजगारी नष्ट करतील अशी आशा ठेवूया.
तुम्हाला बेरोजगारी मराठी निबंध ( Unemployment Essay In Marathi ) कसा वाटला? त्याबद्दल नक्की अभिप्राय द्या… तुमचे मत तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहून कळवू शकता….