आज राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन – १ ऑक्टोबर!

१ ऑक्टोबर या दिवशी ‘राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन’ साजरा केला जातो. तर प्रत्येक वर्षी संपूर्ण जगभरात १४ जून हा दिवस रक्तदान दिन म्हणून साजरा केला जातो.

रक्तदान दिनाला सर्वत्र रक्तपेढी संस्था रक्तदान शिबिरे आयोजित करतात व वेगवेगळ्या रक्त गटानुसार रक्त संकलन करण्याचे कार्य करतात. या दिनाच्या जाहिराती व संदेश हे सोशल मीडियाद्वारे सर्वत्र पाठवले जातात तसेच रक्तदान शिबिराचे मोठमोठे होर्डिंग्ज देखील लावले जातात.

रक्तदान दिनी रक्तदानाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला जातो. रक्तदानाविषयी सामाजिक जनजागृती निर्माण केली जाते. रक्तदान केल्याने एखाद्या गरजू व्यक्तीचे प्राण वाचवले जाऊ शकतात. त्यामुळे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे असेही बोलले जाते.

रक्त घेण्याअगोदर आरोग्यदायी निकष व रक्तगट तपासणे अत्यावश्यक ठरते. व्यक्तीचे वय १८ – ६० वर्ष असणे गरजेचे आहे. हिमोग्लोबिन १२.५ पेक्षा जास्त असावा, वजन ४५ किलोपेक्षा जास्त असावे, नाडीचे ठोके ८० ते १०० प्रति मिनिट असणे या बाबी महत्त्वाच्या ठरतात.

स्वतःच्या आरोग्यदायी बाबी ठीक असल्यास रक्तदान करण्यास काहीही अयोग्य असे नाही. कारण रक्त पुनर्निर्मिती होतच असते आणि कृत्रिम रक्त बनवले जाऊ शकत नाही. रक्तदान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा…

Leave a Comment