Swami Vivekananda Essay In Marathi | स्वामी विवेकानंद मराठी निबंध !

स्वामी विवेकानंद हे एक अद्भुत व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जीवनावर आणि त्यांच्या कर्तृत्वावर निबंध लिहल्याने विद्यार्थ्यांना त्यांच्या जीवनाविषयी समजते. त्यांची धर्मनिष्ठा आणि तर्कदेखील समजतो. हा निबंध लिहताना जास्त कल्पना विस्तार न करता मुद्देसूद मांडणी आणि इतिहासकालीन स्पष्टीकरण करावे लागते. चला तर मग पाहूया, कसा लिहायचा स्वामी विवेकानंद हा निबंध!

स्वामी विवेकानंद निबंध | Essay On Swami Vivekanand In Marathi ।

ज्वलंत आणि प्रखर व्यक्तिमत्त्व, हिंदू धर्म आणि अध्यात्म यांचा विस्तार आणि प्रसार हा अत्यंत वैज्ञानिक पद्धतीने करणारे भारतीय संन्यासी, योगी स्वामी विवेकानंद हे एक थोर पुरुष होते. कोलकातामध्ये सिमलापल्ली या ठिकाणी इ.स. 12 जानेवारी 1863 रोजी स्वामी विवेकानंद यांचा जन्म झाला. त्यांचे पूर्ण नाव नरेंद्रनाथ विश्वनाथ दत्त असे होते.

त्यांचे वडील विश्वनाथ दत्त हे कोलकाता उच्च न्यायालयात वकील होते. आई भुवनेश्वरी देवी या धार्मिक वृत्तीच्या होत्या. नरेंद्रला लहानपणापासून दर्शनशास्त्र, इतिहास, कला, साहित्य या विषयांत रुची होती. धार्मिक ग्रंथ आणि त्यामागचे सत्य जाणून घेण्याची तर जणू उत्कटता त्यांच्यात ठासून भरली होती. लहानपणी संगीताची आवडही त्यांना होती. त्यांनी बेनी गुप्ता आणि अहमद खान या उस्तादांकडून संगीताचे रितसर शिक्षण देखील घेतले होते.

नरेंद्रनाथांनी सुरुवातीचे शिक्षण घरीच घेतले. त्यानंतर १८७१ साली ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला आणि ते १८७९ मध्ये प्रेसिडेन्सी कॉलेजची प्रवेश परीक्षा उत्तीर्ण झाले. पुढे त्यांनी जनरल
असेम्ब्लीज इन्स्टिट्यूशनमध्ये प्रवेश घेतला. त्यांनी तर्कशास्त्र आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञान यांचा अभ्यास केला. १८८१ साली ते फाइन आर्टची तर १८८४ मध्ये बी. ए. ची परीक्षा उत्तीर्ण झाले.

स्वामी विवेकानंद एक अत्यंत तर्कशुद्ध आणि विचारशील मनुष्य होते. त्यांनी त्यांच्या शैक्षणिक आणि त्यानंतरच्या काही काळात डेव्हिड ह्यूम, इमॅन्युएल कान्ट, बारूच स्पिनोझा, जॉर्ज हेगेल, हर्बर्ट स्पेन्सर, जॉन स्टुअर्ट मिल इत्यादी महान व्यक्तींच्या लेखनाचा अभ्यास केला होता. हर्बर्ट स्पेन्सरच्या उत्क्रांतिवाद त्यांना भावला होता. गुरुदास चटोपाध्याय या बंगाली प्रकाशकासाठी त्यांनी स्पेन्सरच्या ‘एज्युकेशन’ या पुस्तकाचा अनुवादही केला होता.

पाश्चात्त्य तत्त्वज्ञानासोबत त्यांनी प्राचीन संस्कृत आणि बंगाली ग्रंथांचाही चांगलाच अभ्यास केला होता. त्यांना ‘श्रुतिधारा’ म्हणजे विलक्षण स्मरणशक्ती असलेला मनुष्य असे म्हटले जात असे. त्यांची वाचनाची गती खूपच चांगली होती. एका
सामान्य व्यक्तीपेक्षा खूपच जलद गतीने ते एखादे पुस्तक वाचून पूर्ण करीत असत. अशा या असामान्य नरेंद्रचे खऱ्या अर्थाने आयुष्य बदलले ते म्हणजे रामकृष्ण परमहंस यांच्या भेटीनंतर!

इ.स. १८८१ च्या नोव्हेंबर महिन्यात रामकृष्ण पहिल्यांदाच नरेंद्रला भेटले आणि त्यांनी नरेंद्रची प्रतिभा ओळखली. कुशाग्र बुद्धीचा हा व्यक्ती नक्कीच अध्यात्मिक क्षेत्रात उच्च शिखर गाठू शकतो असा गुरु रामकृष्ण यांना विश्वास होता. अध्यात्मिक उन्नती साधण्यासाठी आणि धर्मप्रसार कार्यात वाहून नेण्यासाठी स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण यांच्यासोबत शिष्य म्हणून राहू लागले. अध्यात्मिक साधना आणि गुरूच्या सहवासामुळे नरेंद्र हा दिवसेंदिवस प्रगती करत होता.

रामकृष्ण परमहंस यांनी सुरू केलेले कार्य नरेंद्रच्या हाती सोपवले जाणार होते. पुढे रामकृष्णांनी नरेंद्रनाथांना संन्यास दीक्षा देऊन त्यांचे नामकरण ‘स्वामी विवेकानंद’ असे केले. रामकृष्ण मठाची स्थापना श्री रामकृष्णांच्या महासमाधीनंतर स्वामी विवेकानंदांनी आपले एक गुरुबंधू तारकनाथ यांच्या मदतीने कोलकात्याजवळील वराहनगर या भागात केली.

रामकृष्ण यांच्या समाधीनंतर स्वामी विवेकानंद हे धर्मप्रसारासाठी भारतभ्रमण करण्यास बाहेर पडले. भारतभ्रमण केल्यानंतर त्यांना भारताची तसेच पूर्ण दुनियेची दयनीय अवस्था समजली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा आपला धर्मप्रसार सुरू केला. यावेळी त्यांनी परदेशगमन देखील केले. 11 सप्टेंबर 1893 रोजी अमेरिकेतील आर्ट इन्स्टिट्यूट, शिकागो येथे सर्वधर्मीय परिषद भरली होती. त्या सभेला विवेकानंद गेले होते. तेथे त्यांनी “अमेरिकेतील माझ्या बंधू आणि भगिनींनो” अशी भाषणास सुरुवात केली आणि सभेसाठी जमलेल्या सर्व लोकांनी टाळ्यांचा कडकडाट सुरू केला. ह्या परिषदेत विवेकानंदांनी सनातन धर्माचे प्रतिनिधित्व करताना, वेदान्तावर व भारतीय संस्कृतीवर व्याख्यान दिले. जगातील सर्व धर्मांचे सारतत्त्व एकच आहे असे प्रतिपादन त्यांनी केले.

पुढे त्यांनी वेदान्त आणि योग या विषयावर अमेरिका, इंग्लंड आणि काही युरोपीय देशांमध्ये व्याख्याने दिली. अमेरिका आणि इंग्लंड या देशांमध्ये त्यांनी वेदान्त सोसायटी स्थापन केली. 4 जुलै 1902 रोजी स्वामी विवेकानंद यांनी कोलकात्याजवळील बेलूर मठात समाधी घेतली. त्यांचे तत्त्वज्ञान हे नेहमीच स्मरणीय होते आणि राहील. “उठा, जागे व्हा, ध्येय प्राप्त होईपर्यंत थांबू नका” हा त्यांचा संदेश आजही तेवढाच प्रसिद्ध आहे. असा हा महान योगी, संन्यासी, तत्वज्ञानी, स्वतःच्या कर्तुत्वाने पूर्ण विश्व प्रकाशित करून गेला.

तुम्हाला स्वामी विवेकानंद हा मराठी निबंध ( Swami Vivekanand Essay In Marathi ) कसा वाटला ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा….

Leave a Comment