सोशल मीडिया मराठी निबंध | Social Media Essay In Marathi |

आज माणसाच्या जीवनात सोशल मीडियाचा असणारा सहभाग आणि त्याचे फायदे व नुकसान या सर्वांचा आढावा आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना हा विषय आणखी व्याप्त पद्धतीने जाणून घेणे गरजेचे आहे. शालेय जीवनात असताना संवादाचे माध्यम म्हणून सोशल मीडियाचा किती उपयोग आहे आणि असला पाहिजे, त्यादृष्टीने सोशल मीडिया निबंध ( Social Media Essay In Marathi) लिहायला लावतात.

हा निबंध लिहताना थोडी काळजी घ्यावी कारण या विषयाची परिपूर्ण माहिती असणे गरजेचे आहे. काहीही काल्पनिक विस्तार करणे टाळावे. चला तर मग पाहुया, “सोशल मीडिया” या विषयावर निबंध लेखन अगदी सोप्या पद्धतीने कसे काय करू शकाल!

सोशल मीडिया – फायदे व नुकसान निबंध ! Social Media Marathi Nibandh |

प्रसार माध्यमे आणि तंत्रज्ञान यांचा विकास जसजसा होत चालला आहे तसतसे आपण अवगत आणि विकसित होत चाललो आहे. विकासाची संकल्पना वैज्ञानिक दृष्टिने मांडणे हे सर्वस्वी बरोबर नाही. अस्तित्व आणि निसर्ग यांचा देखील विचार करणे तेवढेच आवश्यक ठरते. सोशल मीडिया हि काही वैश्विक समस्या नाही परंतु तिचा अतिरेक प्रत्येक व्यक्तीसाठी नुकसानदायक ठरू शकतो.

व्यक्तिगत स्तरावरून वर उठून सामाजिक बांधिलकी राखणे आणि त्यामुळे संवाद साधणे गरजेचेच आहे. असा संवाद हा कधी वाद असू नये. समाजाचा कुठलाच घटक त्याद्वारे दुखावला जाऊ नये. जेवढ्या संस्था आणि व्यक्ती प्रसारमाध्यम क्षेत्रात आहेत त्यांच्याद्वारे सर्व समाजातील सर्व घटक एकत्र येऊ लागले आहेत. संपूर्ण जग एका व्यासपीठावर आलेले आहे. याचा उपयोग फक्त एखादी समस्या निराकरण आणि निव्वळ मनोरंजन यासाठी झाला पाहिजे.

सोशल मीडिया हे आज टेलिव्हिजनपेक्षा प्रभावी माध्यम ठरत आहे. इंटरनेटचे जाळे सर्व जगभरात पसरले असताना त्या इंटरनेटचा वापर प्रत्येक व्यक्ती करू लागला आहे. मोबाईल आणि संगणक ही माध्यमे त्यासाठी प्रभावी आहेत ज्यांचा उपयोग आज सर्रास सर्वजण करू लागले आहेत. विविध वेबसाइट्स आणि सॉफ्टवेअर या माध्यमावर उपलब्ध आहेत.

सोशल मीडिया हा शब्द मागील दशकात उदयास आला. कुठलीही गोष्ट किंवा स्वतःचे मत हे सहजरीत्या व्यक्त करता येऊ लागले. लोकांची, समाजाची कम्युनिटी होऊ लागली. शारीरिकदृष्ट्या एकत्र येऊन समस्या निराकरण करण्यासाठी सोशल साईट्सचा वापर होऊ लागला. वेळ आणि पैसा यांची मोठ्या प्रमाणावर बचत होऊ लागली.

माहितीचे आदानप्रदान झपाट्याने होऊ लागले त्यासाठी व्हिडिओ व टेक्स्ट ब्लॉग्स तयार होऊ लागले. स्वतःचे मत किंवा माहिती दुसऱ्या देशातदेखील पोहचवण्याची किमया या सोशल साईट्सद्वारे शक्य होऊ लागली आहे. बातम्या, पुस्तके, चित्रपट सर्वकाही सहज उपलब्ध होऊ लागले. ज्ञानाचे एक मोठे भांडार लोकांसमोर उपस्थित झाले. प्रत्येक जण आपल्या आवडीनुसार सोशल मिडियाचे क्षेत्र निवडू लागला.

तुम्ही सकाळी उठायचं आणि मोबाईल हातात घ्यायचा. आपोआप तुम्हाला हवे ते मनोरंजन आणि हवी ती कोणत्याही क्षेत्रातील माहिती सहज मोबाईल स्क्रीनवर ओपन होऊ शकते. पण अशा तंत्रज्ञानाचे आणि विशेषकरून सोशल साईट्सचे फायदे आणि नुकसान देखील जाणून घेतले पाहिजेत नाहीतर एका वैज्ञानिक विकासात मानवी क्षमतांचा पूर्ण विनाश होऊन जाईल.

सोशल मीडियामुळे सर्व समाज, लोक एकत्र आले. विचारांची आणि संस्कृतीची देवाणघेवाण शक्य झाली. देशातील व्यक्ती जगात कुठल्याही व्यक्तीशी सहज मैत्री करू लागला. मानवी आणि नैसर्गिक समस्यांचे निराकरण होऊ लागले. एका विचारांचे लोक भारावून जाऊन ग्रुप बनवू लागले मग कृतीसाठी देखील एकत्र येऊ लागले. राजकीय व्यक्ती, अभिनेते, सामाजिक संस्था असे सर्वजण सोशल मीडियावर कार्यरत झाले त्यामुळे त्यांची लोकांपर्यंत झेप वाढली. आपले मत सर्वदूर पसरवता येऊ लागले.

वरील फायदे वरवरचे आहेत जर तुम्ही फक्त सोशल साईट्सचा वापर मनोरंजनासाठी करत असाल. असे मनोरंजन मग वेळखाऊ देखील ठरू शकते. पूर्ण दिवस लोक मोबाईल आणि संगणकावर बसून असतात. त्यामुळे आरोग्य धोक्यात येऊ शकते. डोळ्यांचे विकार, पाठदुखी, डोकेदुखी असे विकार जडू शकतात. सोशल मीडिया जास्त फोफावल्यामुळे चुकीच्या बातम्या आणि अफवा यांचा ऊत येऊ लागला आहे. लहान मुले तर संस्कारित न होता मनोरुग्ण होऊ लागली आहेत.

शांतता आणि स्थैर्य या सोशल मीडियामुळे धोक्यात आले आहे. सामाजिक अस्थिरता जाणवू लागली आहे. लोक कृतीपेक्षा मतांवर जास्त भरवसा ठेऊ लागली आहेत. सामाजिक व वैयक्तिक समस्या निराकरण, शिक्षण किंवा थोडीशी करमणूक असा उद्देश जर ठेवला तर काही चुकीचे नाही परंतु त्याव्यतिरिक्त तासनतास जर चॅटिंग, व्हिडिओ बघत बसलात तर मात्र मानसिक स्थिरता गमावून बसाल. त्यामुळे अतिरेक होऊ न देता नियंत्रित गरजेपुरता सोशल मीडियाचा वापर फायदेशीर ठरेल.

तुम्हाला सोशल मीडिया निबंध (Social Media Essay in Marathi) कसा वाटला? याबद्दल नक्की कमेंट करा. तुमचा आणखी काही अभिप्राय असल्यास जरूर कळवा… धन्यवाद!

Leave a Comment