शिवप्रताप दिन – संपूर्ण माहिती ! Shiv Pratap Din Information in Marathi|

शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din) हा पूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमान आणि शौर्याचा दिवस आहे. स्वराज्यावर आक्रमण करून आलेला अफजलखान आणि योजना बनवणारा आदिलशाह यांच्यासाठी राजा शिवबा एकटाच पुरेसा होता. अत्यंत युक्तीपूर्ण पद्धतीने आणि प्रसंगावधान राखून अफजलखानाचा केलेला वध उभा महाराष्ट्र कधीच विसरू शकत नाही.

शिवप्रताप दिन – Shiv Pratap Din |

शिवरायांचा प्रतापगडावरील पराक्रम | अफजलखानाचा वध ! Shivaji Maharaj and Afjal Khan History |

शिवराय स्वराज्य चालवत असल्याची चाहूल विजापूर दरबारी कळली होती. आदिलशाही ताब्यातील अनेक गडकिल्ले शिवाजी महाराज स्वतःच्या ताब्यात घेत होते. त्यामुळे एक दिवस शिवरायांचा बिमोड करायचा म्हणून आदिलशाही दरबारात योजना आखल्या जात होत्या. आदिलशाहीतील सर्व सरदार, बहादुर सेनानी, वजीर सर्वजण उपस्थित होते.

बडी बेगम त्यावेळी दरबारात उपस्थित होत्या. त्यावेळी त्यांनी प्रश्न उपस्थित केला. “कोण करणार शिवाजीचा बंदोबस्त?” सर्वजण एकमेकांकडे बघू लागले. शिवाजी महाराजांचा बंदोबस्त आक्रमण करून करणे आणि सह्याद्रीच्या कुशीत जाऊन शिवरायांना ललकारणे तेवढे सोप्पे नव्हते.

यावर तोडगा म्हणून अफजलखान नावाचा धिप्पाड सरदार पुढे आला. शिवाजीला जिवंत किंवा ठार मारून घेऊन येण्याचे वचन भर दरबारात अफजलखानाने दिले. कारण अफजलखानाची ताकद म्हणजे पोलादी! लोहाची हत्यारे आपल्या हातांनी वाकवणारा असा हा अफजलखान शिवरायांना पकडण्यासाठी स्वराज्यावर आक्रमण करण्यास तयार होतो.

अफजलखानाला सह्याद्री आणि आसपासचा प्रांत बऱ्यापैकी माहीत होता. राजगडावर असताना शिवरायांना ही बातमी कळली. खानाचा मुकाबला भर युद्धात आपण करू शकत नाही याची जाणीव शिवरायांना होती. शिवरायांचे सैन्य आणि राज्य सध्या लहान होते. त्याचा निभाव खानाच्या फौजेपुढे लागणे शक्य नव्हते.

अफजल खानाशी मुकाबला हा युक्तीनेच होऊ शकतो हे शिवरायांना समजले होते. कारण अफजल खान मोठे सैन्यबळ घेऊन चालून आला होता. शिवराय त्यांची योजना आखून प्रतापगडावर रवाना होतात. शिवराय प्रतापगडावर गेल्यावर खान चांगलाच चिडला. त्याला भलेमोठे सैन्य प्रतापगडावर नेणे शक्य नव्हते. प्रतापगड डोंगरात वसला असल्याने तिथे पोहचणे म्हणजे चांगलेच अडचणीत आणणारे काम होते.

शिवाजी महाराज स्वतः उतरून खाली यावे यासाठी खानाने रयतेचा छळ करण्यास सुरुवात केली. असे केल्याने शिवराय खाली येतील असा खानाचा समज खोटा ठरला. मोठा संयम दाखवत शिवाजी महाराजांची ही चाल यशस्वी ठरली. खानाने मग शिवरायांना भेटण्यासाठी संदेश पाठवला.

“आमचे किल्ले परत द्या आणि आदिलशाहीत सामील व्हा आम्ही तुम्हाला सरदारकी देऊ इच्छितो.” असा संदेश शिवरायांना कळताच ते आणखीनच सावध झाले. मोठ्या बुद्धीने परतीचा संदेश म्हणून शिवराय खानास घाबरतात आणि खानाने खुद्द शिवाजींना भेटण्यासाठी प्रतापगडावर यावे असे सांगितले.

अफजलखान मोठमोठ्याने हसू लागला, “हा शिवाजी तर डरपोक निघाला. आम्ही त्याच्या पराक्रमाच्या ऐकलेल्या कथा खोट्या होत्या, आम्हीच जातो त्याला भेटायला आणि चिरडून टाकतो,” असे म्हणत खान “प्रतापगडावर भेटू!” असा संदेश पाठवतो. प्रतापगड येथील खालची माची येथे भेटण्याचा बेत ठरला.

भेटीच्या वेळी दोघांचेही एक एक अंगरक्षक सोबत असतील आणि बाकीचे अंगरक्षक शामियान्याच्या बाहेर असतील असे ठरले. छान असा शामियाना उभारण्यात आला. भेटीची वेळ ठरवण्यात आली. आपल्याबरोबर काही दगा झाला तर किल्ल्यावरील बाकीचे सैन्य आक्रमण करेल आणि अफजल खान देखील माघारी जाता कामा नये, याची पुरेपूर व्यवस्था शिवाजी महाराज करतात.

भेटीचा दिवस उजाडला. शिवराय भवानी देवीचे दर्शन घेतात. अंगात चिलखत, डोक्यावर जिरेटोप आणि पट्टा, वाघनखे आणि बिचवा अशी शस्त्रे शिवराय परिधान करत त्यावरून आपला पोशाख चढवतात. सर्व सरदार आणि सेवकांना सूचना देत शिवराय भेटीसाठी तयार झाले. शामियान्यात जिवाजी महाला याला शिवराय सोबत नेण्याचा बेत करतात. अफजलखान बडा सय्यद नामक आपल्या सेवकासोबत बसलेला असतो.

शिवराय शामियान्याच्या दाराशी येऊन थांबतात. “शिवाजी आत का येत नाही?” असे अफजलखान महाराजांचा वकील पंताजी गोपीनाथ यांना विचारतात. “शिवाजी राजे बडा सय्यदला घाबरतात”, असे उत्तर मिळताच बडा सय्यद थोडा दूर झाला. “या राजे, भेटा आम्हाला.” असे म्हणत अफजलखान उभा राहतो.

अफजलखान शिवरायांना आलिंगन देण्याच्या उद्देशाने पुढे सरकतो. शिवराय त्याचे आलिंगन स्वीकारतात. शिवराय अफजलखानापुढे खूपच लहान होते. त्यांना मिठीत घेऊन चिरडून टाकावे असा मनसुबा खानाचा होता. शिवराय मिठीत येताच त्यांच्या पाठीवर कट्यारीचा वार केला. अंगात चिलखत असल्याने शिवराय बचावले. प्रसंगावधान राखून शिवरायांनी वाघनख्या आणि बिचवा काढून अफजलखानाचा पोटळा बाहेर काढला.

खानाचा वकील कृष्णाजी भास्कर पुढे सरसावताच एका पट्ट्याच्या वारातच शिवराय त्यांना ठार करतात. सय्यद आता वार करणार एवढ्यात जिवाजी महालाने त्याला ठार केले. संभाजी कावजी, जिवाजी महाला आणि शिवराय हे तिघे या संघर्षात सहभागी होते. या घटनेनंतर “होता जिवा म्हणून वाचला शिवा” ही म्हण प्रचलित झाली.

शिवरायांनी केलेली विजयी सूचना सगळे मावळे ऐकतात आणि खानाच्या फौजेवर तुटून पडतात. अफजलखानाचा मुलगा फाजलखान या चकमकीत निसटतो आणि विजापूरला पोहचतो. विजापूरच्या दरबारात एवढ्या बलाढ्य सरदाराचा मृत्यू संपूर्णपणे हाहाकार उडवून देतो. शिवरायांच्या पराक्रमाची गाथा आता सर्वदूर पसरली. स्वराज्याचा राजा शिवछत्रपती म्हणून उदयास येऊ लागला होता.

वाचक कॉर्नर –

शिवप्रताप दिन (Shiv Pratap Din) कसा साजरा केला जातो?प्रतापगड (Pratapgad) कोठे आहे? घडलेल्या प्रसंगाची आठवण म्हणून प्रतापगडावर कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला फक्त थोडीशी सर्च करण्याची मेहनत घेऊन मिळतील. खालील keywords वापरून तुम्ही नेटवर सर्व माहिती मिळवू शकता.

Shivaji Maharaj – Afjal khan Incident.
Shiv Pratap Din History.
Shiv Pratap Din real history.
Shiv Pratap Din Date.
Pratapgad Location in Maharashtra.
Afzal khan kabar.
Hota jiva mhanun vachla shiva.
Chhatrapati Shivaji Maharaj History on Pratapgad.
प्रतापगड उत्सव (Pratapgad Utsav)

Leave a Comment