संत ज्ञानेश्वर – मराठी निबंध • Sant Dnyaneshwar Nibandh Marathi •

प्रस्तुत लेख हा संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar Nibandh Marathi) यांच्या जीवनावर आधारीत मराठी निबंध आहे. संत ज्ञानेश्र्वर यांचे अध्यात्मिक जीवन व त्यांचे जीवन कार्य यांविषयी प्राथमिक स्वरूपाची माहिती या निबंधात देण्यात आलेली आहे.

संत ज्ञानेश्र्वर – मराठी निबंध | Sant Dnyaneshwar Nibandh Marathi

ज्ञानदेव, माऊली या नावांनी प्रसिध्द असणारे तेराव्या शतकातील एक महान संत म्हणून संत ज्ञानेश्वर यांची ओळख आहे. संत ज्ञानेश्वर यांचे संपूर्ण नाव ज्ञानेश्वर विठ्ठलपंत कुलकर्णी असे होते. त्यांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमी म्हणजेच दिनांक २२ ऑगस्ट १२७५ ला आपेगाव या ठिकाणी झाला.

ज्ञानेश्वरांचे वडील विठ्ठलपंत यांनी विवाहित असूनही संन्यास घेतल्याने त्यांच्या गुरूंनी पुन्हा त्यांना गृहस्थाश्रम स्वीकारण्यास सांगितले. विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांचा संसार पुन्हा एकदा सुरू झाला आणि त्यांना निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान व मुक्ताबाई अशी चार अपत्ये झाली.

ज्ञानेश्वर व इतर भावंडांना त्यावेळी सर्व समाज संन्याशाची मुले म्हणून चिडवत असत.
विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाई यांच्या मृत्यू नंतरही चारही भावंडांना गावापासून वाळीत टाकण्यात आले. ज्ञानेश्वर व इतर भावंडांनी आपली विद्वत्ता पैठण येथे सादर केली. विद्वत्तेचा आधार देऊन त्यांना पुन्हा एकदा समाजाचा हिस्सा बनवण्यात आले.

समाजाचा त्रास सहन न झाल्यामुळे कुटीत रुसून बसलेल्या ज्ञानाला बहीण मुक्ताई कशी समजावते ही कथा खूपच रंजक आहे. तसेच रेड्याकडून वेद वदवणे, भिंत चालवून चांगदेव योगी यांना नम्र बनवणे असे चमत्कार ज्ञानदेवांनी केल्याच्या दंतकथा आजही लोकप्रिय आहेत.

ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू निवृत्तीनाथ हेच ज्ञानेश्वरांचे गुरु होत. गुरुचरणी ज्ञान ग्रहण करून त्यांनी ज्ञानेश्वरी (भावार्थदीपिका) लिहिली. संस्कृत भाषेतील गीता या ग्रंथाचे अमूल्य असे ज्ञान त्यांनी मराठी भाषेत आणले. ‘अमृतानुभव’ या ग्रंथ लेखनानंतर त्यांनी तीर्थयात्रा केल्याचा इतिहास आहे.

संत ज्ञानेश्वर यांनी मराठी भाषेत विपुल आणि अत्यंत महत्त्वपूर्ण असे लिखाण केले आहे. त्यांचे ज्ञानेश्वरी, अमृतानुभव, हरिपाठाचे अभंग, चांगदेवपासष्टी असे ग्रंथ प्रसिद्ध आहेत. त्यांनी लिहलेले पसायदान हे तर संपूर्ण विश्वभर ज्ञात असलेली प्रसिद्ध अशी प्रार्थना आहे.

संत ज्ञानेश्वर यांची संजीवन समाधी ही खूपच प्रचलित अशी घटना आहे. आळंदी, पुणे येथे इ. स. १२९६ साली त्यांनी आपले गुरू निवृत्तीनाथ यांना अखेरचे वंदन करून समाधी घेतली. समाधीचे वर्णन संत नामदेव यांनी अत्यंत हृदयस्पर्शी शब्दांत केलेले आहे. समाधी घेतली तेव्हा ज्ञानदेवांचे वय अवघे एकवीस वर्षे एवढे होते.

ज्ञानेश्वर हे महान अध्यात्मिक संत व तत्त्वज्ञ होते. त्यांच्या काव्य स्वरूपातील लेखणीतून द्वैत व अद्वैत भाव झळकतो. अध्यात्मिक क्षेत्रातील त्यांच्या कर्तुत्वाने पुढील कितीतरी पिढ्यांना प्रेरणा मिळाली आणि आजही मिळत आहे. अशा आपल्या माऊली स्वरूप ज्ञानदेवांना साष्टांग प्रणाम!

तुम्हाला संत ज्ञानेश्र्वर हा मराठी निबंध (Sant Dnyaneshwar Nibandh Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

Leave a Comment