माझे आवडते फुल – गुलाब | Rose Essay in Marathi | Gulab – Marathi Nibandh|

संपूर्ण पृथ्वीवर सर्वात कोमल आणि सुंदर फुल जर कुठले असेल तर ते म्हणजे गुलाब! गुलाब सर्वांना आवडतो. त्याचा सुगंध खूपच छान असतो. त्यामुळे या फुलाची प्राथमिक माहिती लहानपणी कळण्यासाठी गुलाब या विषयावर प्राथमिक शाळेत असताना निबंध लिहायला लावतात. हा निबंध सर्वांनाच खूप उपयोगी ठरेल अशी आशा करतो. चला तर मग पाहुयात, माझे आवडते फुल – गुलाब!

My Favourite Flower – Rose | Marathi Essay | गुलाब – निबंध!

गुलाब फुल दिसायला खूप छान असते. विविध प्रकारचे आणि विविध रंगाचे गुलाब अस्तित्वात आहेत. त्यापैकी मला लाल गुलाब खूप आवडतो. गुलाबाचा रंग तसा गुलाबी आणि लाल असतो परंतु आता जैविक तंत्रज्ञानामुळे आणि कलम प्रकारामुळे गुलाब विविध रंगात उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी कलम केलेले झाड विकत आणावे लागते. 

गुलाब हे एक कोमल फुल आहे ज्याला खूप पाकळ्या असतात. कळी अवस्थेत असताना त्याची सुंदरता एवढी दिसून येत नाही परंतु पूर्ण खुलल्यानंतर मात्र ते मनमोहक असे फुल बनते. त्याचा सुगंध म्हणजे पूर्ण अस्तित्वाला सुखावणारा अनुभव असतो. 

गुलाब लाल, पिवळा, केशरी, गुलाबी, निळा, पांढरा, जांभळा अशा विविध रंगात उपलब्ध असलेला आढळतो. गुलाबाला एकमेकांच्या वर अशा जेमतेम दहा पंधरा पाकळ्या असतात. लहानपणी सर्वजण अशा पाकळ्या आपल्या वहीत साठवून ठेवत असतात. 

गुलाबाचे झाड काटेरी असते. त्याची पाने हिरवी आणि टोकदार असतात. झाड जर वारंवार कापले नाही तर त्याची उंची खूप वाढते. उंची वाढली तर फुलंदेखील तेवढीच सुंदर आणि मोठी येतात. परंतु फुलं तोडताना परत आपल्यालाच त्रास, म्हणून माणसाच्या उंचीपेक्षा जास्त झाडाची उंची होऊ देत नाहीत. 

गुलाबाची फांदी पुन्हा जमिनीत रोवली तरी पुन्हा त्याचे रोप वाढीला लागते. आमच्या घरी असलेले गुलाबाचे झाड कलम केलेले आहे. त्याला पिवळी आणि केशरी रंगाची फुले येतात. फुल आल्याबरोबर दोन तीन मिनिटे तरी मी त्याच्याकडे बघत राहतो. निसर्गाची किमया मला त्या गुलाबात जाणवते.

गुलाबाचा उपयोग हा लग्न समारंभात केला जातो. वधू पक्ष आणि वर पक्षाचे लोक गुलाबाचे फूल नवीन पोशाखात अडकवून असतात. लग्नात सुगंधित वातावरण निर्मितीसाठी गुलाब जल शिंपडले जाते. नवीन नवरा आणि नवरी हातात गुलाब घेऊन किंवा गुलाबगुच्छ घेऊन उभी असतात.

गुलाबाला नेहमीच स्नेहाचे आणि प्रेमाचे प्रतिक मानले गेले आहे. आदर – सत्कार समारंभात गुलाब देऊनच स्नेहभाव व्यक्त केला जातो. स्त्रिया आणि मुली विशेषकरून गुलाबाचा उपयोग करतात. आपल्या वेणीत आणि केसात गुलाबाला अडकवतात. 

गुलाबाचा उपयोग आयुर्वेदिक दृष्टीनेसुद्धा केला जातो. पंचकर्म करताना आणि विविध लेप बनवताना गुलाबजलाचा वापर केला जातो. गुलाब हे आल्हाददायक आणि स्वभावाने शीत असल्याने मानवी शरीरात तापमान नियंत्रित ठवण्याचे काम गुलाबजल करते. गुलाबाची शेतीसुद्धा काही देशात केली जाते. 

सौंदर्यप्रसाधने तयार करताना तर आवर्जून गुलाब वापरतात. नैसर्गिक लाली आणि गुलाबी प्राप्त करण्यासाठी बाजारात क्रीम आणि पावडर मिळतात, त्यामध्ये गुलाब अर्काचा समावेश असतो. खाद्य संस्कृतीत देखील गुलाब फुलाच्या काही रेसिपी आहेत. गुलकंद रेसिपी ही त्यामधीलच एक! गुलाबाच्या पाकळ्या सुकवून डब्यात बंद करून त्यामध्ये खडीसाखर टाकली जाते. हा गुलकंद उन्हाळ्यात खूप गुणकारी असतो.

गुलाबजलाचा वापर करून सरबतही बनवला जातो. डोळ्याच्या विकारात गुलाबजल डोळ्यांना लावल्याने फायदा होतो. असा हा  बहुगुणकारी गुलाब सुंदर तर आहेच शिवाय त्याला “फुलांचा राजा” असेही संबोधले जाते. 

2 thoughts on “माझे आवडते फुल – गुलाब | Rose Essay in Marathi | Gulab – Marathi Nibandh|”

Leave a Comment