महाराष्ट्रात सणाला कुठला पदार्थ बनवला जात असेल तर तो म्हणजे पुरणपोळी! पुरण पोळी सर्व ठिकाणी आवडीने खाल्ली जाते. पुरणपोळी-गुळवणी आणि भाताबरोबर लसूण खोबऱ्याचा कटयुक्त रस्सा ! असा आस्वाद घेणे म्हणजे पोटपुजाच म्हणायची. ही पुरणपोळी बनवण्यासाठी थोडीशी काळजी घ्यावी लागते. पोळी जास्त गोड न बनवता सहजरीत्या कशी बनवू शकता याबद्दल या लेखामध्ये सांगितले आहे.
Ingredients for puranpoli recipe
साहित्य:
१ – चणाडाळ १ वाटी
२ – गूळ १ वाटी बारीक किसलेला
३ – वेलची पूड १ चमचा
४ – गव्हाचे पीठ
५ – तेल
Puran poli recipe process –
कृती :
१) चणाडाळ स्वच्छ धुवून कुकरमध्ये शिजवून घ्यावी. डाळ जास्त शिजता कामा नये. डाळ शिजल्यावर पाणी निथळून घ्यावे.
२) आता डाळीत किसलेला गूळ टाकावा. मंद आचेवर हे मिश्रण आटवून घ्यावे. मिश्रण आटवताना ढवळत राहावे. मिश्रण भांड्याला चिकटणार नाही याची काळजी घ्यावी.
३) आता मिश्रणात वेलची पूड टाकावी.
४) सर्व मिश्रण घट्ट झाल्यावर त्याला पाट्यावर वाटून घ्यावे किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यावे. या मिश्रणाला पुरण असे म्हणतात.
५) गव्हाचे पीठ मळून घ्यावे. चपाती करताना मळतो तसे. ( थोडा मैदा मिक्स केला तरी चालेल )
६) गव्हाचे कणिक घेवून त्याचे बारीक गोळे बनवावे. ते गोळे पातळसर लाटून त्यामध्ये पुरण ठेवावे. आता लाटलेल्या गोळ्याला बंद करून घ्यावे.
७) हलकेसे लाटून घ्यावे. गोळ्यातील पुरण बाहेर येणार नाही याची काळजी घ्यावी. तव्यावर आता पुरण पोळी खरपूस भाजून घ्यावी.
८) पुरण पोळी गुळवणी सोबत सर्व्ह करू शकता. गुळवणी बनवण्यासाठी पाण्यात गूळ टाकून चांगला कढवून घ्यावा. गूळ पूर्णपणे विरघळू द्यावा.