Veer Sawarkar Information। स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर !

भारतीय क्रांतीकारक, राजकारणी, वकील, कवी, लेखक, नाटककार, समाजसुधारक असे विविधरंगी व्यक्तिमत्त्व, जीवनाच्या विकासात्मक आणि वास्तववादी आयामाला स्पर्श करणारे विनायक दामोदर सावरकर हे एक परखड आणि ध्येयनिष्ठ व्यक्ती होते. विनायक सावरकरांचा जन्म २८ मे १८८३ साली नाशिक जिल्ह्यातील भगूर या ठिकाणी झाला. हिंदू तत्वज्ञान स्पष्टपणे आणि विश्लेषक पद्धतीने ते मांडू शकत होते. धर्मातील कच्चे दुवे आणि वैज्ञानिक दृष्टिकोन ते जाणून होते. विज्ञानाचा पुरस्कार आणि जातिव्यवस्थेचा तिढा असणारे एक प्रतिभावंत साहित्यिक म्हणून त्यांची ख्याती होती.

• कौटुंबिक माहिती आणि प्रारंभिक जीवन

दामोदर सावरकर यांना तीन मुलगे होते. बाबाराव, विनायक आणि नारायण अशी तिन्ही मुलांची नावे होती. विनायक नऊ वर्षांचे असताना त्यांची आईचे निधन झाले. सावरकरांचे प्राथमिक शिक्षण नाशिकच्या शिवाजी विद्यालयामध्ये झाले. वक्तृत्व आणि काव्यरचना यांत सावरकरांना लहानपणापासून रस होता. ते अत्यंत कुशाग्र बुद्धीचे होते. स्वदेशीचा फटका, आणि स्वतंत्रतेचे स्त्रोत ह्या रचना त्यांनी वयाच्या अवघ्या तेराव्या वर्षी रचल्या. चाफेकर बंधूंना फाशी दिल्याचे वृत्त समजताच सावरकरांनी घेतलेली शपथ अजरामर ठरली. ती शपथ अशी “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा केतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन.”

इ.स. १८९९ मध्ये सावरकरांच्या वडिलांचा प्लेगच्या साथीने मृत्यू झाला. मार्च १९०१ मध्ये विनायक सावरकरांचा विवाह यमुनाबाई यांच्याशी झाला. लग्नानंतर त्यांनी इ.स. १९०२ साली फर्ग्युसन महाविद्यालयात प्रवेश घेतला. श्यामजी कृष्ण वर्मा ह्यांनी ठेवलेली शिवाजी शिष्यवृत्ती मिळवून कायद्याच्या अभ्यासासाठी सावरकर इ.स. १९०६ साली लंडनला गेले.

• राष्ट्रभक्ती आणि जीवन कार्य –

सावरकर क्रांतिकारी विचारांनी पेटून उठले होते. कॉलेज जीवनात राष्ट्रभक्त समूह ही गुप्त संघटना सावरकरांनी स्थापन केली. पुढे या संघटनेचे प्रकट रूप म्हणून मित्रमेळा संघटना स्थापन केली. पागे आणि म्हसकर हे साथीदार सोबत घेऊन या संस्था त्यांनी स्थापन केल्या होत्या. हीच संघटना पुढे ” अभिनव भारत ” या नावाने उदयास आली. इटालियन क्रांतिकारक जोसेफ मॅझिनी यांच्या विचारांचा प्रभाव सावरकरांवर होता. जोसेफ यांची संघटना “यंग इटली” च्या नावावरून “अभिनव भारत” असे नाव या संघटनेस देण्यात आले होते. विदेशी कापडांची होळी सावरकरांनी पुण्यात १९०५ मध्ये केली होती.

उच्च शिक्षणासाठी लंडनमध्ये असताना जोसेफ मॅझिनीच्या आत्मचरित्राचे मराठी भाषांतर केले. अनेक युवक त्या आत्मचरित्राचा अभ्यास करत. महाराष्ट्रातील खूप मोठा तरुणवर्ग त्या भाषांतराने प्रेरित झाला होता. कित्येक जणांना तर त्याची प्रस्तावना देखील पाठ होती. लंडनला असताना इंडिया हाऊस मध्ये अभिनव भारत संघटनेचे क्रांतिकार्य सुरू झाले होते.

बाबाराव यांना राजद्रोहपर लिखाण प्रसिद्ध केल्याने अटक करण्यात आली होती आणि जन्मठेपेची शिक्षा देऊन काळया पाण्यावर धाडले होते. त्याचा प्रतिशोध म्हणून मदनलाल धिंग्राने कर्झन वायली या ब्रिटिश अधिकाऱ्याला लंडनमध्ये मारले आणि हसत-हसत फाशी स्वीकारली. सावरकरांचा पहिला हुतात्मा शिष्य म्हणजे ‘ मदनलाल धिंग्रा.’ सावरकर आणि त्यांचे सहकारी बापट यांनी अनेक रशियन क्रांतिकारी गटांशी संपर्क वाढवत बॉम्ब तयार करण्याचे तंत्रज्ञान आत्मसात केले. बॉम्ब बनवण्याचे तंत्रज्ञान आणि २२ पिस्तुले त्यांनी भारतात पाठवली. त्यापैकी एका पिस्तुलाने १६ वर्षीय अनंत कान्हेरे याने नाशिकचा कलेक्टर जॅक्सन याला ठार केले. या प्रकरणात अनंत कान्हेरे, कृष्णाजी कर्वे व विनायक देशपांडे या युवकांना फाशी झाली. जॅक्सनचा वाढत चाललेला अन्याय आणि बंधू बाबाराव यांना झालेला तुरुंगवास यालादेखील जॅक्सनच जबाबदार होता. या अशा कारणांनी जॅक्सनला ठार केले.

जॅक्सनला मारण्यासाठी वापरलेले पिस्तुल हे सावरकरांनीच पाठवलेले होतं याचा सुगावा लागताच ब्रिटिश सरकारने त्यांना तात्काळ अटक केली. इ. स. १९१० मध्ये समुद्रमार्गाने त्यांना भारतात आणले जात होते, तेव्हा मॉर्सेलिस बेटाजवळ बोटीतून त्यांनी उडी मारली. पोहत पोहत ते फ्रान्सच्या समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पोहोचले. फ्रान्स सरकारच्या परवानगीशिवाय ब्रिटिश सरकार त्यांना पकडू शकणार नाही असा त्यांचा अंदाज होता. परंतु तसे झाले नाही आणि ब्रिटीश सरकारने त्यांना पुन्हा एकदा अटक करून भारतात आणले. त्यांच्यावर खटला भरून इ. स. १९११ मध्ये त्यांना दोन जन्मठेप म्हणजे सुमारे ५० वर्षे काळ्या पाण्याची शिक्षा करण्यात आली.

सावरकरांना अंदमानच्या तुरुंगात अनेक प्रकारे छळण्यात आले. तो छळ म्हणजे सहन न करण्यासारखा होता. खूप संकटे आणि असह्य वेदना देत काळ जणू त्यांची परीक्षाच पाहत होता. असे सर्व असताना देखील त्यांनी नानाविध लेखन केले. कमला हे महाकाव्य रचले. भारतातील राजकारण बदलत होते. ब्रिटिश सरकार आपली नीती सोडून वागत होती. अशातच स्वतःचे राष्ट्र मात्र हिंदुत्ववाद सोडता कामा नये असे त्यांना मनोमन वाटत होते. ब्रिटिश कधी ना कधी सोडून जातीलच परंतु राष्ट्रातील इतर जातींचे मुजोरीपण वाढू नये आणि अखंड हिंदुत्व टिकून राहावे यासाठी ते सतत प्रयत्नशील होते.

विठ्ठल भाई पटेल, रंगस्वामी अय्यंगार यांसारखे नेते सावरकरांची सुटका व्हावी म्हणून प्रयत्नशील होते. अखेर स्वतःच्या काही संकल्पासाठी आणि देशहितासाठी त्यांनी ब्रिटिशांच्या काही अटी मान्य केल्या आणि त्यांची १९२१ मध्ये अंदमान तुरुंगातून सुटका करण्यात आली.

त्यानंतर तीन वर्ष ते रत्नागिरीतील तुरुंगात होते. १९२४ मध्ये दोन अटींवर त्यांची सुटका करण्यात आली. पहिली अट म्हणजे ते रत्नागिरीत स्थानबद्ध राहतील आणि राजकारणात सक्रिय होणार नाहीत. त्यांनी या अटी मान्य करीत रत्नागिरीत आपले समाजकार्य सुरू केले. अंदमानातील क्रांतिकारी आणि लेखकी पेशा आता सामाजिक रूप घेऊ लागला होता. त्यांनी विविध धार्मिक आणि सामाजिक कार्य सुरू केले. अस्पृश्यता निवारण, त्यांचे शिक्षण, आणि समान वागणूक यासाठी ते झटले. धर्मांतर करून गेलेल्या अनेक लोकांना हिंदू धर्मात आणले. अस्पृश्यांना त्या काळी मंदिर प्रवेशबंदी होती म्हणून १९३१ साली भागोजी शेठ यांच्या मदतीने “पतितपावन” या मंदिराची स्थापना केली.

हिंदू धर्म आणि हिंदूंची व्याख्या काय? याचे विश्लेषण त्यांच्या हिंदुत्व या ग्रंथातून दिसून येते. त्यांचे विज्ञानवादी विचार अनेकांना प्रेरित करत होते. हिंदू ही जगण्याची आणि माणुसकीची पद्धत त्यांनी व्यवस्थित समजावण्याचा प्रयत्न केला. हिंदुधर्म प्रबोधन चळवळ उभी केली. अन्य परकीय भाषेचे आपल्या मायदेशातील भाषांवर होत असलेले आक्रमण सावरकरांना मान्य नव्हते. भाषाशुद्धी, लिपिशुद्धी या चळवळी देखील चालू केल्या. 

१० मे १९३७ रोजी त्यांना मुक्त करण्यात आले. त्यानंतर ते हिंदुमहासभेत गेले. तेथे त्यांनी अनेक निशस्त्र लढे दिले. त्यापैकी भागानगर हा  निजामविरूध्द आणि भागलपूर हा लढा इंग्रजांविरुद्ध लढला. सशस्त्र क्रांतीचा त्यांचा दृष्टिकोन बदललेला नव्हता. जर वेळ आली तर भारतीय तरुणांनी इंग्रजांविरुध्द लढण्यासाठी सशस्त्र तयार राहावे अशी त्यांची धारणा होती. १९३८ मध्ये ते अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. 

त्यानंतरच्या काळात ते कवी, लेखक, समाजसुधारक म्हणून खूप प्रसिद्धीस येत होते. १९४७ ला मिळालेल्या स्वातंत्र्यानंतर त्यांना अत्यंत आनंद झाला होता. परंतु फाळणीनंतर झालेले अत्याचार त्यांना मान्य नव्हते. अखंड हिंदुत्ववादी विचारधारा त्यांची कायम होती. १९४७ साली महात्मा गांधींच्या हत्येनंतर त्यांचा सहभाग असू शकतो या कारणावरून त्यांना पुन्हा अटक करण्यात आली. परंतु नंतर त्यांची निर्दोष सुटका करण्यात आली. 

१८५७ चा उठाव हे केवळ एक बंड नसून तो इंग्रजांविरुद्ध योजलेली पहिली सशस्त्र लढाई होती. त्याचे साधार लेखन सावरकरांच्या १८५७ चे स्वातंत्र्य समर या ग्रंथात सापडते. हा ग्रंथ ब्रिटिश काळात प्रसिद्ध होऊ शकला नव्हता. सावरकरांचे मित्र कुटिन्हो यांनी त्याची प्रत सांभाळून ठेवल्यामुळे स्वातंत्र्यानंतर तो प्रकाशित झाला. अंदमानच्या तुरुंगात असताना त्यांनी काही उर्दू गझला लिहल्या होत्या त्या जुलै २०१३ मध्ये सापडल्या. त्या गझला अमिताभ बच्चन यांच्या आवाजात ध्वनिमुद्रित झाल्या. 

त्यांची भाषाशुद्धी चळवळ खूप वाखाणण्याजोगी आहे. प्राध्यापक, मुख्याध्यापक, चित्रपट, बोलपट, दिग्दर्शक, प्राचार्य, वेशभूषा, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, क्रीडांगण, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शैक्षणिक, राजकीय, आणि चित्रपट सृष्टीला साजेसे शब्द त्यांनीच सुचवले आहेत. भारतीय घटना समितीला केलेल्या त्यांच्या सूचना देखील पाळण्यात आल्या. त्यांनी केलेल्या सूचना पुढीलप्रमाणे, १ – भारत हे देशाचे नाव असावे.२ – हिंदी ही राष्ट्रभाषा असावी.३ – नागरीलीपी ही राष्ट्रलीपी असावी. या सूचनांचे देखील पालन करण्यात आले. उतारवयात त्यांची प्रकृती ढासळत चालली होती. त्यांनी १९६६ साली प्रायोपवेशन करून जीवनाचा अंत करण्याचा निर्णय घेतला. मग २६ फेब्रुवारी १९६६ रोजी त्यांचा मृत्यू झाला. पूर्व प्रधानमंत्री अटलजींच्या काळात सावरकरांना भारतरत्न देण्यात यावा अशी मागणी करण्यात आली होती. परंतु ती फेटाळली गेली. 

मराठी लेखक म्हणून त्यांचे जे लिखाण आहे असे क्वचितच कोणी लिहलेले असेल. त्यांचा दर्जा आणि समज आपल्याला त्यांच्या लिखाणावरून कळते. सागरा प्राण तळमळला”, “हे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजी राजा”, “जयोस्तुते” त्यांच्या या कविता खूपच प्रसिद्ध आहेत. सावरकरांचे लेखन म्हणजे वाचकांसाठी एक जिवंत अनुभव असतो. त्यांच्या लेखनातील खालील पुस्तके तुम्ही नक्की वाचू शकता.

• संगीत उत्तरक्रिया • संगीत उ:शाप • ऐतिहासिक निवेदने • काळे पाणी • अखंड सावधान असावे • १८५७ चे स्वातंत्र्यसमर •अंदमानच्या अंधेरीतून • अंधश्रद्धा भाग १ • अंधश्रद्धा भाग २ • क्रांतिघोष • गरमा गरम चिवडा • गांधी आणि गोंधळ • जात्युच्छेदक निबंध • जोसेफ मॅझिनी • माझी जन्मठेप • माझ्या आठवणी – नाशिक • माझ्या आठवणी – पूर्वपीठिका • माझ्या आठवणी – भगूर • मोपल्यांचे बंड • तेजस्वी तारे • प्राचीन अर्वाचीन महिला • भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने • भाषा शुद्धी • महाकाव्य कमला • महाकाव्य गोमांतक • रणशिंग • लंडनची बातमीपत्रे • विविध भाषणे • विविध लेख • स्फुट लेख • हिंदुत्व • हिंदुत्वाचे पंचप्राण • हिंदुपदपादशाही • हिंदुराष्ट्र दर्शन • क्ष – किरणे • विज्ञाननिष्ठ निबंध • शत्रूच्या शिबिरात • संन्यस्त खड्ग आणि बोधिवृक्ष • सावरकरांची पत्रे • सावरकरांच्या कविता

Leave a Comment