प्रदूषण – मराठी निबंध | Pollution Essay in Marathi |

प्रदूषण हा मराठी निबंध (Pollution Essay In Marathi) लिहताना थोडेसे वास्तववादी स्वरूप स्पष्ट करायचे असते. प्रदूषणाचे परिणाम आणि त्याचे विश्लेषण योग्यरीतीने करून हा निबंध सुंदर बनवायचा असतो. अगदी सोप्या पद्धतीने हा निबंध कसा लिहू शकाल, ते पाहूया!

प्रस्तावना –

प्रदूषणाचे परिणाम सर्वांना ज्ञात आहेतच! त्याची कारणे आणि लक्षणे जाणून घेऊन त्यावर कायमस्वरूपी उपाय करण्याची गरज भासू लागली आहे. ही गंभीर समस्या जर विद्यार्थ्यांना शालेय जीवनात समजली तर भविष्यात ते विद्यार्थी एक सुजाण नागरिक बनून प्रदूषण कमी करण्याबद्दल उपाययोजना अंमलात आणतील.

Essay on Pollution in Marathi | प्रदूषण – एक गंभीर समस्या मराठी निबंध |

प्रदूषण हा प्रकार म्हणजे पर्यावरणात निर्माण झालेले दूषण! मुख्यतः प्रदूषण दोन प्रकारचे असते, एक म्हणजे जलप्रदूषण आणि दुसरे वायुप्रदूषण! सध्या ध्वनि आणि भूमि प्रदूषण देखील मानवास भेडसावत आहे.

प्रदूषणाचा परिणाम एवढा भेडसावणारा ठरला नसता, परंतु वाढत जाणारी अनियंत्रित लोकसंख्या, त्यांच्या गरजा पूर्ण करता करता होणारी धावपळ आणि व्यर्थ विकासाच्या आणि अति तंत्रज्ञानाच्या मागे पळत राहिल्याने आपण निसर्ग आणि मुक्त वातावरण यांपासून खूप दूर होत चाललो आहोत.

प्रथमतः हवेचे प्रदूषण पाहूया. आपण श्वास घेताना ऑक्सिजन घेत असतो आणि कार्बन डायऑक्साइड बाहेर सोडत असतो. परंतु हवेत कार्बन व इतर विषारी वायूंचे प्रमाण खूप वाढले आहे. त्यामुळे हवा प्रदूषित झालेली आहे. परिणामी आपला स्वच्छ हवेशी संपर्क तुटलेला आहे.

शहरात अफाट लोकसंख्या वाढ झाली आहे. त्यांच्या प्राथमिक गरजा पूर्ण करतानाच निसर्गाची मोठी हानी होत असते. तसेच असंख्य वाहने आणि अमाप रासायनिक उद्योग यामुळे हवा प्रदूषित होत असते.

लोकसंख्या गतिमान आणि प्रगत दाखवण्यासाठी गाड्या, उद्योग, नानाविध प्रकारचे कारखाने सुरू झाले. ज्यातून बाहेर सोडले अपायकारक वायू हे शरीरासाठी आणि पर्यावरणासाठी घातक ठरत आहेत.

निसर्गात सहज उपलब्ध होणारे आरोग्य आज आपण दवाखान्यात शोधत आहोत. अनावश्यक वायू निसर्गात शोषले न गेल्यामुळे ओझोनचा थर कमी होऊ लागला आहे. मानव त्याचे परिणाम अनेक विकारांमार्फत भोगत आहे.

आता दुसरा मुद्दा म्हणजे जलप्रदूषण! पाणी जगण्यासाठी अत्यंत आवश्यक असा घटक असल्याने त्याचे प्रदूषण होणे हे सजिवांसाठी हितावह नाही. आज नदी, नाले, झरे असे नैसर्गिक स्त्रोतच दूषित होत चालले आहेत. त्याचे कारण म्हणजे शहरीकरण व औद्योगिकीकरण आणि त्यामधून अयोग्यरीतीने केले जाणारे कचरा व्यवस्थापन!

जमिनीवरील कचरा निर्मूलन करताना नदीच्या, पाण्याच्या स्त्रोतांजवळ सरळ सरळ कचरा टाकला जातो. त्यामुळे त्याचे विघटन पाण्यात होते आणि पाणी दूषित बनते. कारखान्यातून येणारे सांडपाणी, रसायने हीदेखील पाण्यात सहज सोडली जातात.

जल प्रदूषणाचा परिणाम सर्वांना आरोग्याची किंमत चुकवून भोगावा लागतो. वाढत्या लोकसंख्येमुळे पाण्याची गरजही वाढत आहे. स्वच्छ पाणी पुरवण्यासाठी उपाययोजना केल्या जातात पण जे मोठे पाण्याचे स्त्रोत आहेत त्यांना कोणी स्वच्छ करत नाही. त्यांचे प्रदूषण सर्रास होत आहे.

मानवी अवास्तव भौतिक सुख आणि तंत्रज्ञान विकासाची आस यामुळे भौतिक यंत्रे आणि उद्योगांची वाढ तर झालेली आहेच परंतु त्यामुळे वातावरणातील गोंगाट खूपच वाढला आहे. त्यामुळे एक घातक असे ध्वनी प्रदूषण सुद्धा वाढत चालले आहे.

भुप्रदुषण हादेखील प्रदूषणाचाच प्रकार आहे. मातीची घटत चाललेली प्रत आणि मातीची होणारी धूप ही लक्षणे या प्रदूषणात येतात. जंगल तोड आणि रासायनिक पदार्थांचा वापर व विल्हेवाट या दोन कारणांमुळे भुप्रदुषणही आता डोके वर काढत आहे.

प्रदूषणाचे वाढते दुष्परिणाम म्हणजे डोळ्यांचे, त्वचेचे, श्वसनाचे रोग, हृदयाचे रोग वाढत चालले आहेत. शरीर संपूर्णतः दूषित बनत चालले आहे. स्वार्थ आणि जागतिक सत्तेच्या विकासाखाली आपला देश तर स्वास्थ्याच्या बाबतीत अत्यंत खालच्या पातळीवर आहे.

आजची विकासाची संकल्पना ही संपूर्ण मानवजातीचा विकास नाही तर फक्त भौतिक आणि नैसर्गिक संसाधने यांचा वापर वाढवणे यावर आधारित आहे. त्यामुळे प्रदूषण आणि अनारोग्य हे त्याचे दुष्परिणाम म्हणता येतील.

भौतिक वस्तू आणि त्यांचा वापर वाढवण्याकरिता जनसंख्या वर्षानुवर्षे वाढणे गरजेचे आहे आणि तेच मुख्य प्रदूषणाचे कारण आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी निसर्गप्रेमी शिक्षण निर्माण होण्याची गरज भासू लागली आहे.

आपण जाणत असलेले उपाय हे तात्पुरते आहेत. अनावश्यक आणि पूर्ण न होणाऱ्या उपाययोजना अंमलात आणण्याचा व्यर्थ संकल्प न करता लोकसंख्या नियंत्रण आणि भौतिक विकासदेखील नियंत्रणात करण्याचा निश्चय केला पाहिजे म्हणजे निसर्गाशी एक सुसंगत व्यवहार निर्माण होईल आणि प्रदूषण कायमचे नाहीसे होईल.

तुम्हाला प्रदूषण हा मराठी निबंध (Pollution Essay In Marathi) आवडला असल्यास नक्की तुमचा अभिप्राय कमेंट बॉक्समध्ये कळवा…

प्रदूषण – निबंध क्रमांक 2 | इयत्ता ५वी, ६वी, ७वी |

आजचे युग विज्ञान युग मानले जाते. या विज्ञान युगामध्ये मानवाचे जीवन अत्यंत सुलभ झाले आहे. परंतु विज्ञानाच्या दुरुपयोगामुळे मानवाला अनेक तोटे सहन करावे लागत आहेत. त्यातीलच एक भाग म्हणजे प्रदूषण. विज्ञानाच्या क्रांतीतून प्रदूषण जन्माला आले आहे.

प्रामुख्याने प्रदूषणाचे तीन प्रकार पडतात. जसे की वायू प्रदूषण, जल प्रदूषण व ध्वनी प्रदूषण आणि काही इतर प्रकार देखील आहेत जसे की मृदा प्रदूषण व प्रकाश प्रदूषण इत्यादी.

जलप्रदूषण म्हणजे अशुद्ध होत असलेले पाणी! कारखान्यातील सांडपाणी हे जेव्हा नदी-नाले यांमध्ये सोडले जाते तेव्हा संपूर्ण पाणी दूषित होते. पाणी दूषित झाल्यामुळे ते वापरणे योग्य किंवा पिण्यायोग्य राहत नाही असे पाणी पिल्यामुळे अनेक रोग व आजार पसरतात तसेच पाण्यातील जीवसृष्टी देखील नष्ट होते.

वायु प्रदूषण म्हणजे हवेमध्ये विषारी वायू मिसळणे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे कारखान्यातून निघणारा धूर आणि रस्त्यावर चालणाऱ्या अन्य प्रकारच्या वाहनांमधून निघणारा धूर हवेमध्ये मिसळला जातो. या धुरामध्ये विविध प्रकारचे घातक घटक असतात. त्यामुळे हवा प्रदूषित होते अशी प्रदूषित हवा श्वसन केल्यास आरोग्य धोक्यात येते व वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात.

ध्वनी प्रदूषण म्हणजे नको असलेला किंवा मोठा आवाज. काही लोक कार्यक्रमाच्या वेळी लाऊडस्पीकर लावतात, त्यातून मोठा आवाज बाहेर पडतो त्यामुळे मानवाच्या कानाला तो आवाज सहन होत नाही. तसेच फटाके, कारखाने इत्यादी मधून देखील ध्वनिप्रदूषण होते त्यामुळे बहिरेपणा येतो.

प्रदूषणावर नियंत्रण मिळवणे काळाची गरज बनली आहे. वातावरणाचा एक भाग म्हणून मानवाने काळजी घेणे गरजेचे आहे. कचरा निर्मूलन, सार्वजनिक स्वच्छता, सार्वजनिक वाहनांचा वापर, सांडपाणी व्यवस्थापन, प्लास्टिकचा कमी वापर अशा काही योजना राबवल्या गेल्या पाहिजेत.

प्रत्येक व्यक्तीने सक्तीने नव्हे, तर कर्तव्याने प्रदूषण थांबवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. चला तर मग सर्वजण मिळून प्रदूषण संपवूया व देशाचा विकास घडवून धरतीला पुन्हा एकदा सुजलाम-सुफलाम बनवूया.

Leave a Comment